-->
पाकचे बेताल वक्तव्य

पाकचे बेताल वक्तव्य

संपादकीय पान मंगळवार दि. ३१ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पाकचे बेताल वक्तव्य
अण्वस्त्रधारीपाकिस्तान मनात आल्यास दिल्लीला पाच मिनिटांत लक्ष्य करू शकतो एवढी आपल्या देशात क्षमता आहे, असे बेताल वक्तव्य पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे जनक डॉ. अब्दुल कादर खान यांनी केले आहे. पाकिस्तानच्या अण्वस्त्र चाचणीच्या १८ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात खान बोलत होते. १९९८ मध्ये खान यांच्या नेतृत्वाखाली पहिली चाचणी घेण्यात आली होती. खरे तर देशाला अगोदरच अण्वस्त्रधारी देश होण्याची इच्छा होती; परंतु १९८४ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झिया उल हक यांनी त्यास विरोध दर्शवला होता. झिया हे १९७८ ते ८८ दरम्यान राष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी पाकिस्तानला परदेशातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत होती. ही मदत बंद झाली असती, त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे खान म्हणाले. १९८४ मध्ये पाकिस्तानकडे अण्वस्त्र निर्मितीचे तंत्र आणि योजना तयार होती; परंतु हा कार्यक्रम झियांच्या विरोधामुळे बारगळला होता. पाकिस्तान अवघ्या पाच मिनिटांत दिल्लीवर हल्ला करू शकतो. रावळपिंडीजवळील काहुतामधून दिल्लीला लक्ष्य केले जाऊ शकते. काहुतामध्येच पाकिस्तानची महत्त्वाच्या युरेनियम साठ्याची उपलब्धता आहे. २००४ मध्ये खान यांना अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा प्रचार केल्याच्या कारणावरून घरातच स्थानबद्ध करण्यात आले होते. परंतु २००९ मध्ये मात्र इस्लामाबाद उच्च न्यायालयाने खान यांना देशात कोठेही जाण्याचे स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. त्यानंतर आता त्यांनी वादग्रस्त विधाने सुरू केली आहेत. त्यांच्या या वक्त्यव्यामागे बोलविता धनी कोण आहे याचा विचार केला पाहिजे. कदाचित पाकचे सरकारच त्यांना बोलावयास लावत असल्याची शक्यता काही फेटाळता येणार नाही. भारताच्या पराराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने अजूनही मौन पाळले गेले आहे. खरे तर याचा तातडीने निषेध करण्याची आवश्यकता होती. सत्तेत आल्यास पाकिस्तानला धडा शिकवू असे निवडणुकीच्या प्रचारात म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मात्र पाकच्या बाबतीत नरमाईचे धोरण अवलंबित आहेत. सत्तेत आल्यावर मात्र पाकला धडा शिकविण्याचे तर दूरच परंतु मोदीसाहेब पाकचे दौरे करीत आहेत व चर्चेचे दळण दळत आहेत. त्यामुळे पाकचे आपल्याविरोधात कारवाई करण्याचे धारिष्ट्य वाढले आहे. सीमेवर दररोज जवान धारार्तीथी पडत आहेत. तसेच पाठाणकोटसारखी घटना घडली आहे. सरकारने आता चर्चा न करता कारवाई करण्याची वेळ आली आहे.
----------------------------------------------------------

0 Response to "पाकचे बेताल वक्तव्य"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel