-->
जीवेत् शरद: शतम् !

जीवेत् शरद: शतम् !

संपादकीय पान शनिवार दि. १२ डिसेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
जीवेत् शरद: शतम् !
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा, देशाची माजी संरक्षणमंत्री व माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या वयाला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. आजही वयाच्या ७५व्या ़वर्षी कोणा तरुणाला लाजवतील एवढे कार्यक्षम आहेत. राजकारणाशी ते जसे सतत जोडलेले असतातच त्याप्रमाणे अत्याधुनिकता, नवीन तंत्रज्ञान, नवीन पुस्तके, तरुण कलाकार यांच्याशीही ते जहजरित्या या वयातही जोडले गेलेले आढळतात. ७५ वर्षांपैकी त्यांची राजकीय कारकिर्द ५० वर्षांची आहे. या ५० वर्षात त्यांनी आयुष्यात अनेक चढउचार पाहिले, सत्ता आलेली पाहिली व गेलेलीही अनुभवली. परंतु सत्ता असो वा नसो शरदरावांनी महाराष्ट्रात आपल्या नावाचा एक दबदबा निर्माण केला आहे, असे त्यांचे शत्रू देखील मान्य करतील. प्रत्येक क्षेत्रात म्हणजे अगदी विरोधकांपासून ते सर्व पक्षीय, उद्योजक, साहित्यिक, कलाकार, पत्रकार यांच्यात अनेक जणांशी वैयक्तीक पातळीवर मैत्री केली व ती जपली. पक्षाच्या एखाद्या तालुका पातळीवरच्या कार्यकर्त्यालाही ते बर्‍याच वर्षांनी भेटले तरी त्याचे नाव घेऊन विचारपूस करणे हा त्यांचा गुण आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेला आहे. त्यांच्या याच ताकदीच्या बळावर त्यांनी १५ वर्षापूर्वी कॉँग्रेस पक्षापासून फारकत घेऊन आपला नवीन राष्ट्रवादी पक्ष स्थान केला. अस्सल बारामतीकर असलेल्या शरदरावांनी मुंबई पहिल्यांदा पाहिली ती वयाच्या २०व्या वर्षी. त्यावेळी त्यांना मुंबईत येऊन ट्राम, समुद्र व मंत्रालय बघण्याचे जबरदस्त आकर्षण होते. त्यांचे घराणे हे शेतकरी कामगार पक्षाचे. परंतु सुरुवातीपासूनच शरद पवार कॉँग्रेसच्या प्रचाराने प्रभावीत झालेले होते. अर्थातच त्यांच्या घरात शेकापचे राजकीय वातावरण असल्याने त्यांच्या मनात डावा विचार रुजला होता. त्याकाळी कॉँग्रेसमध्याही डावा विचार मानणारा एक गट मोठ्या संख्येने होता. शरद पवार कॉँग्रेसच्या युवक आघाडीत १९६० साली सामिल झाले व १९६७ साली सर्वात प्रथम आमदार झाले. त्यानंतर आज तागायत ते आमदार किंवा खासदार या नात्याने कार्यकरीत आहेत. एवढ्या प्रदीर्घ काळ लोकप्रतिनिधी म्हणून राहाणारे फारच कमी लोक आहेत त्यात आता शरदरावांचा उल्लेख होतो. १९७७ साली जनता पार्टीच्या लाटेत त्यांनी यशवंतराव चव्हाणांची साथ दिली. पुढे काळाच्या ओघात त्यांनी याच यशवंतरावांचे सरकार पाडले व ३८व्या वर्षी मुख्यमंत्रीपदी आरुढ झाले. यशवंतरावांच्या पाठीत खंजीर खुपसला असे वर्णन त्याकाळी केले गेले. त्याबाबत शरदरावांनी वेळेवेळी आपण हे सरकार का पाडले याचे स्पष्टीकरण केेले असले तरीही त्यांच्या मागे लागलेला हा डाग काही फुसता आलेला नाही. इंदिरा गांधीच्या निधनानंतर राजीव गांधीना तीन चतुर्थांश बहुमत मिळाले व शरदराव पुन्हा १९८६ साली कॉँग्रेसमध्ये परतून राज्याचे मुख्यमंत्री झाले. राजीव गांधींच्या काळात त्यांचे त्यांच्याशी संबंध चांगले असले तरीही त्यांच्याबद्दल एक अविश्‍वास निर्माण झाला तो कायमचाच. १९९९ साली सोनिया गांधीच्या विदेशी मुद्यावरुन ते पुन्हा एकदा पक्षाच्या बाहेर पडले व त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसला जन्म दिला. त्यानंतर कॉँग्रेस बरोबर त्यांची तब्बल दहा वर्षे आघाडी होती. आजही केंद्रात व राज्यातली सत्ता गेली असली तरीही त्यांची आघाडी कायम आहे. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीत चढउतार मोठ्या प्रमाणात झाले. अगदी त्यांच्यावर दाऊदचा एजंटपासून ते भ्रष्टाचाराचे विविध आरोप झाले परंतु विरोधी पक्ष सत्तेत आले तरी त्यांना त्यांच्या विरोधात पुरावे काही उभे करता आले नाहीत. त्याचबरोबर त्यांचा पक्ष मोठा नसल्याने सतत आघाडीचे राजकारण करावे लागले. परंतु त्यांनी राज्य किंवा देशपातळीवर भाजपाची कधीच साथ दिली नाही. भाजपामध्ये त्यांचे अनेक वैयक्तीक पातळीवर चांगली मैत्री असणारे मित्र आहेत, नरेंद्र मोदींशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत, मात्र त्यांनी भाजपाशी कधीच हातमिळवणी केली नाही, हे विसरता येणार नाही. धर्मनिरपेक्ष राजकारणाच्या बाजूनेच ते नेहमी राहिले, हे त्यांच्या राजकारणाची जमेची बाजू ठरावी. सर्व पक्षातील नेत्यांना अगदी भाजपा पासून ते डाव्या पक्षांना शरद पवार आपले वाटतात, परंतु पवार आपली झाकली मूठ सव्वा लाखाची असे भासवत कोणत्या पक्षाच्या बाजूने जायचे ते नेमके ठरवितात. काही बाबतीत त्याची मते ठाम असतात. अगदी ज्यावेळी एन्रॉनचा प्रकल्प देशात आला त्यावेळी त्यांनी सर्वात पहिल्यांदा या विदेशी गुंतवणुकीचे स्वागत केले होते. विरोधात असताना एक भूमिका व सत्तेत असताना दुसरी भूमिका असे त्यांनी अर्थकारणाबाबत तरी केले नाही. म्हणूनच ज्येष्ठ उद्योगती राहूल बजाज शरदरावांविषयी विषयी म्हणाले होते, द बेस्ट पीएम इंडिया न्व्हर हॅड! हे खरेच आहे, कारण आजवर मराठ्यांनी इतिहासात दिल्लीच्या तख्ताला धडका देण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला परंतु ते यशस्वी ठरले नाहीत. अलिकडच्या काळात शरद पवारही यात अपयशी ठरले, हे महाराष्ट्राचे दुदैव.
---------------------------------------------------------------------------

0 Response to "जीवेत् शरद: शतम् !"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel