-->
चीनवर मात, पण कशात?

चीनवर मात, पण कशात?

शनिवार दि. 24 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
चीनवर मात, पण कशात?
चीनला आपण लवकरच मागे टाकणार आहोत. मात्र कशात टाकणार आहोत? तर लोकसंख्येबाबत. एैकून काहीसे आश्‍चर्य वाटले असेल, पण हे खरे आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या ताज्या अहवालानुसार, 2040 सालापर्यंत भारत लोकंसख्येत चीनला मागे टाकणार आहे. 2030 पर्यंत भारताची लोकसंख्या दीडशे कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या चीनची लोकसंख्या 141 कोटी इतकी आहे. तर भारताची लोकसंख्या 134 कोटी इतकी आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 19 टक्के लोक चीनमध्ये, तर 18 टक्के लोक भारतात राहतात. सध्याचा लोकंसख्येच्या वाढीचा विचार करता भारत हा 2040 साली जगातील लोकंसख्येतील सर्वात मोठा देश ठरणार आहे. संयुक्त राष्ट्राकडून 2015 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये भारत 2022 मध्येच चीनला मागे टाकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र यंदाच्या अहवालानुसार भारत 2024 च्या आसपास चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकू शकतो. 2030 मध्ये भारताची लोकसंख्या 150 कोटींवर जाऊन पोहोचेल. 2050 सालापर्यंत भारताची लोकसंख्या 166 कोटी इतकी प्रचंड असेल. तर चीनची लोकसंख्या 2030 पर्यंत स्थिर होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्राने व्यक्त केला आहे. यानंतर चीनची लोकसंख्या काही प्रमाणात कमी होईल. जगातील 10 देशांची लोकसंख्या 2017 ते 2050 दरम्यान मोठ्या प्रमाणात वाढेल आणि या जगाच्या लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या याच 10 देशांमध्ये वास्तव्यास असेल. या दहा देशांमध्ये भारत, नायजेरिया, कांगो, पाकिस्तान, इथिओपिया, टांझानिया, अमेरिका, युगांडा, इंडोनेशिया आणि इजिप्त यांचा समावेश आहे. यामधील नायजेरियाची लोकसंख्या सर्वाधिक वेगाने वाढते आहे. नायजेरिया लवकरच अमेरिकेला मागे टाकण्याची शक्यता आहे. आपल्याकडे लोकसंख्या झपाट्याने वाढू शकते. कारण आपल्याकडील राज्यकर्ते असलेल्या पक्षातीलच खासदार जाहीरपणे हिंदुंना आपली लोकसंख्या वाढविण्यासाठी दहा मुले काढण्याचे आवाहन करतात. अशा स्थितीत आपल्याकडे लोकसंख्या वाढणारच! तर तिकडे चीनने आपल्या लोकसंख्येत घट होण्यासाठी गेली चार दशके एक मुलाची सक्ती केली होती. आता कुठे त्यांनी यात ढिलाई दिली आहे. अर्थात आपण चीनपासून धडा घ्यावयाचा की, खासदारांनी हिंदूंना मुले जास्त जन्मास घालण्याचा दिलेला संदेश मनावर घ्यायचा हे जनतेने ठरवावे.
----------------------------------------------------------------

0 Response to "चीनवर मात, पण कशात?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel