-->
इतिहासाची चाके उलटी फिरत आहेत...?

इतिहासाची चाके उलटी फिरत आहेत...?

रविवार दि. 25 जून 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
इतिहासाची चाके उलटी फिरत आहेत...?
----------------------------------------
एन्ट्रो- सुमारे 50 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आणि 10 वर्षे तोट्यात असलेली एअर इंडिया ही राष्ट्रीय विमान कंपनी विकत घेण्यात टाटा उद्योग समूहाने स्वारस्य दाखविले असल्याचे वृत्त आहे. सिंगापूर एअरलाइन्सच्या भागीदारीत एअर इंडियाचे 51 टक्के भागभांडवल खरेदी करून ही विमान कंपनी ताब्यात घेण्याच्या इराद्याने टाटा समूहाने हालचाली सुरू केल्या आहेत. आता जर एअर इंडिया टाटांकडे खरोखीच गेल्यास ही कंपनी सुमारे 70 वर्षांनी मूळ मालकाकडे परत येईल. इतिहासाची चाके उलटी फिरत आहेत. परंतु सरकारने आपल्या घरातील पिढीजात सोने कवडीमोल किंमतीने विकण्याचा हा प्रकार ठरेल...
---------------------------------------------
सुमारे 50 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आणि 10 वर्षे तोट्यात असलेली एअर इंडिया ही राष्ट्रीय विमान कंपनी विकत घेण्यात टाटा उद्योग समूहाने स्वारस्य दाखविले असल्याचे वृत्त आहे. सिंगापूर एअरलाइन्सच्या भागीदारीत एअर इंडियाचे 51 टक्के भागभांडवल खरेदी करून ही विमान कंपनी ताब्यात घेण्याच्या इराद्याने टाटा समूहाने हालचाली सुरू केल्या आहेत. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सरकारी पातळीवर प्राथमिक स्वरूपाची बोलणीही केली आहे. खासगी विमान कंपन्यांच्या स्पर्धेत टिकाव धरू न शकलेल्या एअर इंडियाचा कारभार रुळावर आणण्यासाठी सरकारने कंपनीला 30 हजार कोटी रुपये देण्याचे ठरविले. त्यापैकी 24 हजार कोटी रुपये दिलेही आहेत. तरीही गळक्या हौदात पाणी ओतत राहून उपयोग नसल्याची सरकारला खात्री पटल्याने, वित्तमंत्री अरुण जेटली व विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा विचार बोलून दाखविला. एअर इंडियाचे मोठे कर्ज हा टाटांसाठीही काळजीचा विषय आहे, पण टाटांसारखा उद्योगसमूह सुकाणू हाती घेणार असल्यास, विक्रीपूर्वी हा बोजा कमी करण्यावरही सरकार अनुकूल असल्याचे समजते. सिंगापूर एअरलाइन्स आणि मलेशियाची एअर एशिया यांच्या भागीदारीत एअर एशिया व व्हिस्टारा या कंपन्या सुरू करून, टाटा समूह भारताच्या नागरी विमान वाहतूक उद्योगात शिरला आहेच. आता जर एअर इंडिया टाटांकडे खरोखीच गेल्यास ही कंपनी सुमारे 70 वर्षांनी मूळ मालकाकडे परत येईल. टाटा एअरलाइन्स ही कंपनी जेआरडी टाटांनी 1932 मध्ये सुरू केली. स्वातंत्र्यानंतर हीच कंपनी सरकार व खासगी भागीदारीत एअर इंडिया इंटरनॅशनल झाली. नंतर सरकारने विमान वाहतूक उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केल्याने, एअर इंडिया सरकारी झाल्याने टाटा त्यातून बाहेर पडले. आर्थिक उदारीकरण सुरु झाल्यावर केंद्र सरकारने हवाई उद्योग हे क्षेत्र खासगी उद्योगांना खुले केले आणि एअर इंडियाला खर्‍या अर्थाने स्पर्धा करावी लागली. यातून या कंपनीची जी अधोगती सुरु झाली ती आजपर्यंत काही थांबलेली नाही. गेल्या 10 वर्षांत एअर इंडियाची प्रवासी संख्या 20 टक्क्यांनी कमी झाली असली, तरी अजूनही त्यांचा वाटा 14 टक्क्यांचा आहे. टाटांना ही जमेची बाजू वाटते. निष्णात व्यावसायिक व्यवस्थापनाची जोड देऊन ही कंपनी चालविल्यास सौदा नफ्याचा ठरू शकेल, असेही टाटांना वाटते. अर्थात टाटांना हे जमू शकते मग सरकारला का नाही, असाही प्रश्‍न आपल्याला पडू शकतो. सरकारने उद्योगधंदे चालवू नयेत असे बोलले जाते. त्यातच विमान कंपनी हा उद्योग अत्यंत नाजूक आहे.  अनेकदा या कंपन्यांना तेजी-मंदीचे हेलकावे खावे लागतात. त्यामुळे विमान कंपन्या बहुतांशी तोट्यातच चालतात. मात्र सिंगापूर एअर लाईन्स ही कंपनी सरकारी असूनही ती चांगला फायदा कमविते. मग एअर इंडिया ही सरकारी कंपनी का नेहमी तोट्यात असते, असा प्रश्‍न पडतो. याचे उत्तर एकच आहे, सरकार ही कंपनी व्यावसायिकदृष्ट्या चालवित नाही. टाटांच्या ताब्यात ही कंपनी आल्यास 70 वर्षांपूर्वी जे.आर.डी. टाटा यांचे दुभंगलेले स्वप्न आता पुन्हा एकदा साकार होणार आहे. सरकारने टाटांच्या कंपनीचे राष्ट्रयीकरण केल्यावर टाटांनी विमान उद्योगात प्रवेश करण्याचे वारंवार प्रयत्न केले. मात्र, यात त्यांना काही यश लाभले नव्हते.
1995मध्ये रतन टाटा यांनी सिंगापूर एअरलाइन्स समवेत देशांतर्गत हवाई सेवा सुरूकरण्याचा प्रस्ताव सरकारला सादर केला होता. मात्र, त्या वेळी या क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीस परवानगी नसल्याने हा प्रस्ताव फेटाळला आणि टाटांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. त्यानंतर टाटांनी स्पाइस जेट या कंपनीत दहा टक्के भांडवल खरेदी केले. मात्र, त्यांची ही केवळ भांडवली गुंतवणूक होती. स्पाइस जेटच्या व्यवस्थापनात टाटांचा सक्रिय सहभाग नव्हता. आता मात्र आशिया खंडातली सर्वात मोठी लो कॉस्ट हवाई कंपनी एअर एशियासोबत टाटा समूहाने सहकार्य करार करून देशातील हवाई बाजारपेठ काबीज करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
अनिवासी भारतीय फ्रान्सिस फर्नांडिस यांनी स्थापन केलेली ही कंपनी लो कॉस्टमधील बादशहा कंपनी म्हणून आशिया खंडात ओळखली जाते. फर्नांडिस यांनी 2001मध्ये आपले मलेशियातील राहते घर गहाण टाकून हवाई कंपनी स्थापन केली आणि एक विमान विकत घेऊन आपला कारभार सुरू केला. आज एअर एशियाच्या मालकीची 92 विमाने आहेत आणि 20 देशांत विमान सेवा पोहोचली आहे. 2011मध्ये त्यांनी एअरबस 320 या जातीच्या 200 विमानांची खरेदी करण्याची ऑर्डर नोंदवून जगातील एअरलाइन्स उद्योगाला धक्का दिला होता. बारा वर्षांपूर्वी 9/11 झाल्यावर, जगातील हवाई उद्योग संकटात असताना एअर एशियाचा जन्म झाला. खरे तर त्या वेळी एखादी नवीन विमान कंपनी सुरू करणे म्हणजे एक मोठे धारिष्ट्यच म्हणावे लागेल; परंतु ही विमान सेवा कंपनी पहिल्याच वर्षात नफ्यात आली. तीन वर्षांनंतर त्यांनी आपल्या कंपनीचे समभाग जनतेला विक्रीस काढून कंपनीवर असलेला कर्जाचा बोजा पूर्णपणे हलका केला. एअर एशियाने आशिया खंडातील हवाई सेवेचे चित्र पूर्णपणे बदलण्याची किमया केली. सिंगापूर एअरलाइन्स, मलेशियन एअरलाइन्स, थाई एअरवेज यांची एकेकाळी आशिया खंडातील प्रमुख मार्गांवर असलेली मक्तेदारीची स्थिती एअर एशियाने मोडीत काढली आणि आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या विमानसेवेच्या विस्तारासाठी जे काही मार्केटिंगचे प्रयोग केले त्याची दखल जगातील कॉर्पोरेट क्षेत्राने घेतली. आता भारतातदेखील अनेक नवनवीन विक्रम करण्यासाठी एअर एशिया सज्ज झाली आहे. आता त्यांच्या जोडीला जर एअर इंडिया आली तर देशातील हवाई उद्योगाचे चित्र पार पालटून जाईल. जागतिक पातळीवर विचार करता सिंगापूर एअरलाइन्स, एअर फ्रान्स या सरकारी मालकीच्या हवाई कंपन्या मात्र काही अपवादात्मक काळ वगळता सातत्याने नफा कमवत आल्या आहेत. हवाई उद्योग हा नेहमीच जगात आर्थिक परिस्थितीनुसार हेलकावे खात आला आहे. मंदीचे वातावरण सुरू झाले की सर्वात पहिला फटका बसतो तो या उद्योगाला. कारण पर्यटन, व्यावसायिक उलाढाली या दोन्हीला ब्रेक लागला की या उद्योगाला बॅड वेदर चा सामना करावा लागतो. 2008 पासून अमेरिकेत सुरू झालेल्या आर्थिक मंदीच्या वातावरणामुळे हवाई उद्योगाच्या नाकी नऊ आले आहेत. गेली काही वर्षे या उद्योगातील कंपन्यांचा सरासरी नफा तीन टक्क्यांवर आला. जागतिक बाजारपेठेत भारतीय हवाई उद्योगाचे स्थान सध्या नवव्या क्रमांकावर आहे आणि देशातील हवाई उद्योगाची बाजारपेठ झपाट्याने वाढत असल्याने पुढच्या दहा वर्षात आपण जगात पहिल्या पाच क्रमांकात येऊ असा अंदाज आहे. हवाई कंपन्यांचा मुख्य खर्च असतो तो इंधनाचा. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमती झपाट्याने घसरत असताना विमान कंपन्यांना आता चांंगले दिवस अपेक्षित आहेत. त्याखालोखाल कर्मचार्‍यांच्या पगारावर मोठी रक्कम खर्च होत असते. अशा प्रकारे एकीकडे दिवसेंदिवस खर्च वाढत असताना विमान कंपन्यांतील स्पर्धेमुळे तिकिटांचे दर कमी ठेवावे लागतात. त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती त्यांच्यापुढे निर्माण झाली. अशा या विचित्र कात्रीत भारतीय हवाई कंपन्या अडकल्या आणि त्यांचे उड्डाण तोट्याच्या दिशेने होऊ लागले. एअर इंडियाचा तोटा हा प्रामुख्याने सरकारी गैरव्यवस्थापनामुळे झाला आहे. खासगी कंपनी असूनही विजय मल्ल्या यांच्या गैरव्यवस्थापनाने किंगफिशर दिवाळखोरीत गेली. त्यामुळे सर्वच खासगी कंपन्या फायद्यात असतात व त्यांच्यात गैरव्यवस्थापन नसते असे म्हणणे चुकीचे ठरेल. आता जर एअर इंडिया टाटांकडे खरोखीच गेल्यास ही कंपनी सुमारे 70 वर्षांनी मूळ मालकाकडे परत येईल. इतिहासाची चाके उलटी फिरत आहेत. परंतु सरकारने आपल्या घरातील पिढीजात सोने कवडीमोल किंमतीने विकण्याचा हा प्रकार ठरेल...
-------------------------------------------------------

0 Response to "इतिहासाची चाके उलटी फिरत आहेत...?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel