-->
तामीळनाडूतील बंड

तामीळनाडूतील बंड

संपादकीय पान गुरुवार दि. 9 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
तामीळनाडूतील बंड
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूनंतर येथील राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गढूळ होताना दिसत आहे. राजीनामा द्यायला सांगितलेले पनीरसेल्वम यांनी बंडाचे निशान फडकाविले आहे. आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला असे त्यांनी स्पष्ट निवेदन करुन बंडाचे निशाण रोवले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक असलेल्या व सध्या पक्षाची सुत्रे सांभाळत असलेल्या शशिकला यांनी पन्नीरसेल्वम यांची पक्षाच्या खजिनदारपदावरुन हकालपट्टी केली आहे. शशिकला यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकवल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या प्रयत्नांना वेग आला. या सर्व घडामोडींच्या मागे भाजपा असल्याची चर्चा जोरात आहे आणि यात बरेच तथ्यही आहे. सध्या मात्र भाजपाने फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे. अण्णाद्रमुकचे लोकसभेत 37 आणि राज्यसभेत 13 खासदार आहेत. जर अण्णाद्रमुकमध्ये फूट पाडण्यात भाजपा यशस्वी ठरली तर काही खासदार या बंडाचे निशाण फडकावून आपल्या तंबूत येतील अशी भाजपाची अटकळ आहे. निदान त्यांनी तशी प्रकारची फिल्डिंग तरी लावली आहे. अर्थात यात भाजपा पूर्णपणे यशस्वी होईलच असे नाही. मुळात अण्णाद्रमुक पक्षाचे आमदार व खासदार हे शशिकला यांच्या मागे उभे राहातात की पन्नीरसेल्वम यांच्या मागे ठामपणे उभे ठाकतील हे अजून स्पष्ट झालेले नाही. पन्नीरसेल्वम यांनी आपण बहुमत सिध्द करु शकतो असा केलेला दावा खरा आहे की खोटा हे विधानसभेत सिध्द करावे लागेल. जर विधानसभेच्या संख्याबळाच्या गणितात पन्नीरसेल्वम यशस्वी झाले तर शशिकला या एकट्या पडू शकतात. तामीळनाडूत भाजापाची ताकद मुळातच क्षीण आहे. मात्र तेथे भाजपाची उडी मोठी आहे. आपण स्वबळावर सत्तेच्या दारात काही पोहोचणार नाहीत हे त्यांना माहित आहे, मात्र त्यांना अण्णाद्रमुकमध्ये फूट पाडून आपली राज्यसभेतील व लोकसभेतील संख्याबळ वाढवायची आहे. कारण त्यामुळे राज्यसभेत सध्या जे संख्याबळ कमी पडत आहे त्याचा फायदा होऊ शकतो. परंतु भाजपाचे ही स्वप्न पूर्ण होतील का? असा सवाल आहे. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी पनीरसेल्वम यांच्या सरकारच्या पाठिशी उभे राहण्याचे गुप्तपणे आदेश दिले होते. त्यामुळेच पनीरसेल्वम यांनी शशिकला यांच्याविरोधात बंड करण्याची हिंमत दाखविल्याची चर्चा आहे व त्यात तथ्यही असू शकते. पन्नीरसेल्वम यांना मुक्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावयाची नाही. मग अशा वेळी भाजपाची मदत घेऊन का होईना त्यांना सत्ता राखण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. खरे तर जयललिता यांच्या मृत्यूनंतर अण्णाद्रमुकमध्ये फूट पाडून येथील सत्तेची सूत्रे स्वत:च्या हातात घेण्याचा भाजपचा डाव होता. याची कुणकुण लागल्यामुळेच शशिकला यांनी पनीरसेल्वम यांची मुख्यमंत्रिपदावरून उचलबांगडी केली. अण्णाद्रमुकमधील शशीकलाविरोधी घटकांना एकत्र येण्यास पुरेसा वेळ मिळावा, जेणेकरून त्यांना शशीकला यांच्याविरोधात कायदेशीर बंड करता येईल, अशी रणनीती आता भाजपा पन्नीसेल्वम यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आखीत आहे. गेल्या महिन्यात शशीकला यांचे पती एम. नटराजन हे दिल्लीत तळ ठोकून होते. यावेळी त्यांनी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपमध्ये तामिळनाडूतील सत्ताकारणाविषयी विचारमंथन झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने शशीकला यांच्यासंदर्भातील खटल्याचा निकाल दिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्विकारावीत, अशा भाजपचा सध्याचा पवित्रा आहे. तामीळनाडूतील हे बंड कुणती दिशा घेते ते पहायचे.

0 Response to "तामीळनाडूतील बंड"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel