-->
विजयातील पराभव!

विजयातील पराभव!

मंगळवार दि. 19 डिसेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
विजयातील पराभव!
भारतीय जनता पक्षाने गुजरातमधील आपली 22 वर्षांची राजवट कशीबशी कायम राखण्यात यश मिळविले आहे, त्याचबरोबर हिमाचल प्रदेशमध्ये मात्र कॉग्रेसकडून सत्ता खेचून घेऊन सत्ता काबीज केली आहे. हिमाचलप्रदेशातील निकाल हा अपेक्षितच होता, त्यामुळे या विजयाविषयी फारशी चर्चा झालेली कुठेच दिसत नाही. गुजरातबाबत मात्र संपूर्ण देशात उत्सुकता होती, यामागचे कारणही तसेच होते. एक तर गुजरात ही हिंदुत्वाची प्रयोगशाळा अशी तिची संबोधना होते व येथील भाजपाची सत्ता दंगलींपासून वादातीत ठरली होती तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हे होम ग्राऊंड असल्यामुळे हे राज्य भाजपाच्या ताब्यातून निसटते की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली होती. तसे झाले असते तर देशातील राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाली असती, मात्र 150 जागा जिंकण्याचा दावा करणार्‍या भाजपाचे हे स्वप्न काही पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे हा भाजपाचा विजयातील पराभवच म्हटला पाहिजे. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे नुकतीच अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतलेले कॉग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे एक मोठी लढाई होती. त्यांना सत्ता मिळविण्यात अपयश आलेले असले तरीही जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्यामुळे कॉग्रेससाठी हा एक मोठा आशेचा किरण ठरावा. गेल्या तीन वर्षात अपयशाने ग्रासलेल्या कॉग्रेससाठी हा एक शुभशकून ठरावा अशीच स्थीती आहे. पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी या निवडणुकीसाठी आपल्या जीवाचे रान केले होते. त्यांनी हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर या पाटीदार, दलित, आदिवासी नेत्यांची मोट बांधली व त्यातून काँग्रेस पक्षाला कसे बळ लाभेल हे पाहिले. त्यांचा हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला नसला तरीही भाजपाला व पंतप्रधानांना तेथे घाम आणला, हेच त्यांचे मोठे यश ठरावे. कारण 150 दावा जिंकण्याचा भाजपाचा दावा म्हणजे विरोधकांना कपटासमान मानणे व कॉग्रेसला हद्दपार करण्याचे स्वप्न भाजपाच्या अध्यक्षांचे होते. त्यासाठी पंतप्रधानांसह सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ त्यांनी गुजरातमध्ये उतरविले होते, त्यासाठी संसदेचे अधिवेशन लांबविले, पाकिस्तानला विनाकारण या राजकारण खेचले, हार्दिक पटेलची बनावट सी.डी. बाजारात आणून त्यांची बदनामी करण्यात आली. परंतु ही लढाई राहूल गांधी यांनी पटेल, ठाकोर व मेवाणी या तरुणांना एकत्र घेऊन जोमदारपणे लढविली आणि भाजपाच्या नाकी नऊ आणले. यातून एक नक्की झाले की, कॉग्रेसमुक्त भारत हे भाजपाचे स्वप्न काही भविष्यात पूर्ण होणार नाही. राहूल गांधी व कॉग्रेस पक्षाला सत्तेच्या चाव्या मिळाल्या नाहीत हे मान्य मात्र त्यांनी पराभव हा देखील योध्याच्या स्वरुपात स्वीकारला आहे. सध्याच्या पराभवाच्या मालिका झेलत असताना कॉग्रेससाठी पराभवातील हा विजय ठरावा अशी स्थीती आहे. गुजरात हे मुळात व्यापारी व उद्योजकांचे माहेर घर असलेले राज्य आहे. येथील व्यापार्‍यांचे अर्थकारण नोटाबंदी व जी.एस.टी.मुळे बिघडले होते. ज्यावेळी अर्थकारण बिघडते त्यावेळी राज्याची सर्वच घडी बिघडते आणि त्यामुळेच हा समाज मोठ्या प्रमाणावर सरकारवर नाराज होता. मात्र जी.एस.टी.चा दर कमी करुन नरेंद्र मोदींनी निवडणुकीची व्यूहरचना आखली होती. येथील पटेल समाजातील मोठा घटक सधन आहे, या समाजात अनिवासी बांधव मोठ्या संख्येने आहेत, मात्र हे एकीकडे वास्तव असताना येथील विषमताही मोठी आहे. त्यामुळेच या समाजातील राखीव जागांच्या प्रश्‍नांची मागणी होत होती. आपल्याकडे जसे मराठ्यांना आरक्षण पाहिजे आहे, तीच स्थीती या समाजात आहे. आज हा समाज मोठ्या प्रमाणावर कॉग्रेसच्या मागे उभा राहिला आहे. तसे पाहता ही निवडणूक गुजरातच्या प्रश्‍नांवर लढविली जाण्यापेक्षा मोदींनी अस्मितेच्या प्रश्‍नावर लढविली. लोकसभा निवडणुकीत बर्‍याच वेळा चर्चेत आलेल्या गुजरात मॉडेलची येथे फारशी चर्चा झालीच नाही. कारण हे मॉडेल म्हणजे भाजपाच्या प्रचाराचा एक भास आहे. हा मॉडेलची आकडेवारी कशी फसवी आहे हे अनेकदा प्रसिध्दही झाले आहे. त्यामुळे गुजराती माणसांचे याकडून लक्ष विचलीत करण्यासाठी मोदींनी ही निवडणूक गुजराती अस्मितेकडे वळविली. गुजरात मॉडेल जे आज दाखविले जाते ते शहरी भागात डोळ्यात भरते, मात्र गुजरातच्या ग्रामीण भागाचे पायाभूत प्रश्‍न हे सोडविले गेलेले नाहीत. रस्ते, पाणी, मोदींना अपेक्षित असलेले घरोघरी शौचालय हे ग्रामीण भागात नाही आहेत. त्यामुळेच आपली नाराजी व्यक्त करीत ग्रामीण भागातील जनतेने कॉग्रेसला मोठ्या प्रमाणात हात दिला आहे. शहरी भागात मात्र नेमके उलटे चित्र दिसते. येथे भाजपाला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. आता भाजपाची मतांची टक्केवारी घसरली आहे तर कॉग्रेसची वाढली आहे. कॉग्रेसच्या दृष्टीने ही जमेची बाजू ठरावी. खरे तर गेल्या 22 वर्षात कॉग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने गुजरातकडे फारसे लक्ष दिले नाही. हिंदुत्वाची ही प्रयोगशाळा होत असताना उदारपणाने काहीसा काणा डोळाच केला, त्याचा फायदा भाजपाने उठविला व आपले चांगलेच बस्तान मांडले. अगदी दंगलीच्या काळात व त्यानंतर सेक्युलर भूमिका घेऊन तेथील आपल्या कार्यकर्त्यंना जे पाठबळ दिले पाहिजे होते ते दिले गेले नाही. अशा स्थितीत काँग्रेसचाही लंबक उजवीकडे अप्रत्यक्षरित्या वळला. जर कॉग्रेसने एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून गेल्या दहा वर्षात काम केले असते तर आज वेगळे चित्र दिसले असते. असो, आता राहूल गांधींनी गेली सहा महिने मेहनत घेतल्यामुळे कॉग्रेसची बाजू भक्कम झाली आहे. इथून पुढे चांगली मेहनत घेतल्यास पुढील पाच वर्षांनी कॉग्रेस आता सत्ता काबीज करण्याचे स्वप्न पाहू शकते, असाच या निकालाचा अर्थ काढता येऊ शकेल.
------------------------------------------------------------   

0 Response to "विजयातील पराभव!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel