-->
कॉग्रेसला उभारी

कॉग्रेसला उभारी

बुधवार दि. 20 डिसेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
कॉग्रेसला उभारी
काँग्रेस मुक्त भारताचा नारा देत 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने आता काँग्रेसचे अस्तित्व अवघ्या चार राज्यांपुरते खाली आणले आहे, हे वास्तव आपण स्वीकारले तरी गुजरातमधील निकाल पाहता येते कॉग्रेसला सत्ता काबीज करता आली नसली तरीही जागात लक्षणीय वाढ झाल्याने शंभराहून जास्त वर्षे जुन्या असणार्‍या या पक्षाला चांगलीच उभारी येऊ शकते. भाजपाने गुजरात स्वतःकडेच राखताना हिमाचल प्रदेशात भाजपने काँग्रेसकडून सत्ता खेचून घेतल्याने काँग्रेसकडील राज्यांची संख्या आणखी आकुंचन पावली आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत केंद्रात सत्ता स्थापन केली त्यावेळी भाजपकडे सात राज्यांची सत्ता होती. आता ही संख्या वाढून 19 झाली वर गेली आहे. तर, काँग्रेसकडे 13 राज्ये होती आता ती संख्या अवघ्या चारवर खाली आली आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. भाजपने अनेक राज्यांमध्ये स्थानिक पक्षांशी आघाडी करून सत्ता मिळविलेली आहे. यामध्ये प्रमुख्याने जम्मू काश्मीर, बिहार, महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तमिळनाडूत अण्णा द्रमुक आणि केरळमध्ये डाव्या पक्षांचे सरकार आहे. कर्नाटक, पंजाब, मेघालय आणि मिझोराममध्ये काँग्रेसचे सरकार आहे. पुढील वर्षी मेघालय, नागालँड, त्रिपुरा, कर्नाटक, राजस्थान आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये विजय मिळविण्याचे आव्हान काँग्रेस नवनिर्वाचीत अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापुढे आहे. भाजपच्या 2014 पासूनच्या विजयाचा शिल्पकार हे प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे आहेत तसाच पक्षाध्यक्ष अमित शहा यांचाही वाटा त्यात मोठा आहे. कॉग्रेसने दिलेल्या आव्हानांचा मुकाबला करीत भाजपला गुजरातमध्ये विजय मिळवून देण्यात आणि हिमाचल प्रदेश काँग्रेसकडून हिसकावून घेण्यात अमित शहांचा मोठा वाटा आहे हे कुणीच नाकारु शकणार नाही. पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा हेच देश व सरकार चालवित आहेत असे सर्वत्र चित्र आहे. त्या दोघांच्या हातात सत्तेच्या सर्व किल्ल्या आहेत. अमित शहा हे व्यक्तिमत्व नेहमीच वादाच्या फेर्‍यात राहिले आहे. गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरण असो किंवा गुजरात दंगलीचे प्रकरण, महिलेवर टेहळणीचे प्रकरण असो किंवा लाचखोरीचे प्रकरण असा, यात अमित शहांचे नाव आजवर जोडले गेले. मात्र यातून आजवर तरी त्यांनी आपली सुटका करुन घेण्यात सध्या तरी यश मिळविले आहे. अमित शहांजी रणनिती विविध राज्यात वापरत आले आहेत ती आजवर कॉग्रेसने आपल्या राजकारणाचा भाग म्हणून वापरलेली आहे. मात्र अमित शहा त्याला हिंदुत्वाचा मुलामा दिला. उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या अगोदर अमित शहांनी त्या राज्याचे प्रभारीपद स्वतःकडे घेतले होेते. जाती-जमाती, त्यांच्यातल्या उपजाती, त्यातले प्रभावी नेते आणि त्यांच्याशी वैयक्तिक बैठका हा उत्तर प्रदेशच्या विजयाचा पाया होता. तब्बल 10,400 व्हॉटसअ‍ॅप ग्रुप अमित शहांच्या देखरेखीखाली उत्तर प्रदेशात कार्यरत होते. एखादी व्यूहरचना तळापर्यंत पोहोचवण्यासाठी अमित शहांनी उत्तर प्रदेशात एक यंत्रणा उभी केली होती. त्यांच्याकडे ही यंत्रणा गुजरातमध्ये आधीपासून अस्तित्वात होती. मतदानादिवशी मतदारांना मतदानकेंद्रापर्यंत आणण्याची व्यवस्था चोख ठेवली. परिणामी राहूल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर या तरूण रक्ताच्या विरोधकांना ते रोखू शकले. गेल्या तीन वर्षात कॉग्रेसला याच मोदी व शहांच्या जोडीने घायकुतीला आणले आहे. एक तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत असताना सर्व प्रकारची जातिय समिकरणे जुळवून आणण्यात हे दोघे पूर्णपणे तयार आहेत. नोटाबंदी व जीएसटीच्या मुद्द्यांवर भाजप वारंवार अडचणीत आला आहे. भाजपाचा हा फ्लॉप शो होत असताना निवडणुकीची गणिते मात्र त्यांनी बेमालूमपणाने जुळवून कॉग्रेससमोर कडवे आव्हान तयार केले आहे. मोदींनी गुजरातमध्ये 50 सभा घेतल्या, त्यावर भले टीका झाली, अख्खे मंत्रिमंडळ राज्यात उरविले, परंतु शहांच्या स्टॅस्टीजीमुळे पराभव होता-होता वाचला. आज कॉग्रेसला तरुण नेतृत्व लाभले आहे. परंतु राहूल गांधींना अशा प्रकारची रसद पुरविणारे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन लोकांपुढे जाणारे लोक आजूबाजूला ठेवण्याची आवश्यकता आहे. राहूल गांधींचा विचार करता त्यांच्या घराण्याची परंपरा व इतिहास ही त्यांच्यासाठी मोठी जमेची बाजू ठरणार आहे. घराणेशाहीचा कितीही आरोप केला तरी देशातील जनतेने गांधी-नेहरु घराण्यातील प्रत्येक व्यक्तीला आजवर स्वीकारले आहे. परंतु आता कॉग्रेसला सर्वांना सोबत घेऊन जाताना पारंपारिक राजकारणाच्या बरोबरीने जाऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही अवलंब करावा लागणार आहे. आता कॉग्रेसला राहूल गांधींच्या रुपाने तरुण अध्यक्ष सापडल्यामुळे हे त्यांना लवकर अवगत होऊ शकते. गुजरातमध्ये त्यांनी याची सुरुवात काही प्रमाणात केली आहे. परंतु त्याचे जाळे भविष्यात येऊ घातलेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत आत्तापासून विणावे लागेल. तरच गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने मिळालेली उभारी टिकू शकते. कॉग्रेसच्या आजवर झालेल्या नुकसानापेक्षा अजून काही नुकसान होऊ शकत नाही. त्यामुळे आता काँग्रेसला भविष्यात होणारा फायदा हा राहूल गांधींसाठी फायद्याचाच ठरु शकतो. मोदी सरकारचा फोलपणा व बोगस घोषणा ते लोकांना कशा प्रकारे पटवून सांगतात, यावर त्यांच्या भविष्यातील यश अवलंबून असेल.
-----------------------------------------------------   

0 Response to "कॉग्रेसला उभारी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel