-->
नवी विटी, नवा दांडू...

नवी विटी, नवा दांडू...

रविवार दि. 17 डिसेंबर 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
नवी विटी, नवा दांडू...
----------------------------------
एन्ट्रो- 1998 मध्ये जेंव्हा सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या तेंव्हा काँग्रेस पक्ष खिळखिळा बनला होता. परंतु त्यांनी पक्षाला पुन्हा एकदा सत्तेच्या स्थानी नेले. पंतप्रधानपदी विराजमान होण्याची वेळ आली त्यावेळी मात्र सौजन्याने त्याला नकार दिला, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. काँग्रेसच्या इतिहासात सर्वाधिक काळ म्हणजे 19 वर्षे त्या अध्यक्षपदावर राहिल्या आहेत. आता त्यांच्या पुत्राकडे राहूल गांधींकडे आता पक्षाची सुत्रे आली आहेत. काँग्रेसला संजिवनी देण्यासाठी त्यांना मातोश्री सोनियाप्रमाणे कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. सध्या कॉग्रेस केवळ पराभवच पाहत आहे, मात्र एखादा चांगला विजय झाल्यावर कॉग्रेसला एक प्रकारचा तेजेला येऊ शकतो. राहूल गांधी तो विजय मिळविण्यास किती काळ घालवितात त्यावरही पक्षाचे व त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे...
-----------------------------------------------
शतकाहून मोठी परंपरा असलेल्या कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहूल गांधी यांची निवड झाल्याने आता कॉग्रेसमध्ये नवे राज्य सुरु झाले आहे, म्हणजे नवी विटी नवा दांडू या म्हणीला साजेसे असेच आहे. गेली 19 वर्षे त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी या अध्यक्षपदी होत्या. सोनिया गांधी यांनी ज्यावेळी अध्यक्षपदाची सुत्रे होती घेतली त्यापेक्षा काकणभर जास्त आव्हाने आज राहूल गांधी यांच्यापुढे आहेत. तरुणपणात त्यांच्यावर ही जबाबदारी आली आहे. गांधी-नेहरु घराण्यातील राहूल गांधी हे कॉग्रेस पक्षाचे सहावे अध्यक्ष ठरले आहेत. आजवर गांधी-नेहरु घराण्यातील व्यक्ती राजकारणात फेल ठरलेली नाही. त्यांनी पक्षाना अनेकदा कठीण काळातून बाहेर काढले आहे. आता त्यादृष्टीनेच राहूल गांदी यांच्याकडे कॉग्रेसजन मोठ्या आशेने पहात आहेत. विरोधकांकडून या घराण्यावर व कॉग्रेस पक्षावर नेहमीच घराणेशाहीचा आरोप होतो. मात्र घराणेशाही सर्वच पक्षात आहे, त्यामुळे या आरोपात काहीच तथ्य नाही. उलट गांधी-नेहरु घराण्याचा हा करिश्मा गेली सात दशकाहून जास्त काळ भारतीय राजकारणावर कसा टिकून आहे याचा विचार या मंडळींनी करण्याची वेळ आहे. असो. सध्या कॉग्रेस अत्यंत कठीण काळातून प्रवास करीत आहे. गेल्या तीन वर्षात सत्ता नसल्यामुळे पक्षाचे बरेच मोठे नुकसान झाले आहे. आता आणखी नुकसान होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे आता जे काही कॉग्रेस कमवत जाईल ते यश राहूल गांधींच्या पदरात पडत जाईल. गुजरात निवडणुकीत अगदी कॉग्रेसची सत्ता नाही आली तरी भाजपाच्या नाकात नऊ आणले हे एक मोठे यश राहूल गांधींसाठी ठरेल. त्यामुळे गेल्या वेळपेक्षा कॉग्रेसला जरी गुजरातमध्ये वीस जागा जास्त पडल्या व भाजपाला त्यांनी शंभरच्या जवळपास आणले तर तो एक मोठा विजय राहूल गांधींसाठी असेल. गांधी-नेहरू घराण्याचे वर्चस्व असलेला हा पक्ष संपला अशीच आरोळी देशभर काँग्रेस विरोधक देत होते. अशीच आरोळी यापूर्वीही अनेकदा देण्यात आली पण, हा पक्ष संपला नाही. फिनीक्स पक्षाप्रमाणे तो राखेतून उठून पुन्हा भरारी घेत आला. 19 वर्षापूर्वीही काँग्रेस संपली असे म्हणत असताना भारतीय राजकारणाच्या क्षितीजावर सोनिया नावाचे वादळ आले आणि पुन्हा काँग्रेस सत्तेत आली. ज्या ज्या वेळी काँग्रेस अडचणीत येते तेंव्हा तारण्यासाठी गांधी घराण्यातील व्यक्ति धावून येते आणि पक्षाला संजीवनी देते असा आजवरचा इतिहास आहे. आपली आजी इंदिरा गांधी व वडिल राजीव गांधी यांच्या हत्या झालेल्या असतानाही गांधी घराण्यातील एक तरुण व्यक्ती पुढे येते, यात केवळ सत्तेचा ध्यास आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. 91 साली राजीव गांधींच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांनी तब्बल सात वर्षे पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले नव्हते. त्यावेळी तर त्या आपल्या मुलांना घेऊन देशातून जातील अशीही चर्चा करण्यात आली होती. परंतु हे काही खरे ठरले नाही. या घराण्याभोवती असलेल्या या वळलामुळेच कॉग्रसचे विरोधक त्यांना दचकतात. एप्रिल 1998 मध्ये जेंव्हा सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या तेंव्हा काँग्रेस पक्ष खिळखिळा बनला होता. परंतु त्यांनी पक्षाला पुन्हा एकदा सत्तेच्या स्थानी नेले. पंतप्रधानपदी विराजमान होण्याची वेळ आली त्यावेळी मात्र सौजन्याने त्याला नकार दिला. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. काँग्रेसच्या इतिहासात सर्वाधिक काळ म्हणजे 19 वर्षे त्या अध्यक्षपदावर राहिल्या आहेत. आता त्यांच्या पुत्राकडे राहूल गांधींकडे आता पक्षाची सुत्रे आली आहेत. काँग्रेसला संजिवनी देण्यासाठी त्यांना मातोश्री सोनियाप्रमाणे कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. सध्या कॉग्रेस केवळ पराभवच पाहत आहे, मात्र एखादा चांगला विजय झाल्यावर कॉग्रेसला एक प्रकारचा तेजेला येऊ शकतो. राहूल गांधी तो विजय मिळविण्यास किती काळ घालवितात त्यावरही पक्षाचे व त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. त्याचबरोबर काँग्रेसमधील सध्या असलेले ज्येष्ठ नेते व त्यांची मक्तेदारी यातून बाहेर पडून राहूल गांधी तरुण पिढीस कसा वाव देतात त्यावरही पक्षाचे भवितव्य् अवलंबून असेल. कारण आता पक्षात तरुण रक्ताला वाव देण्याची नितांत आवश्यकता आहे. आजवरचा इतिहास पाहिला तर गांधी नेहरु घराण्यातील व्यक्तीचे नेतृत्व आजवर फेल गेलेले नाही, हा करिश्मा विद्यमान अध्यक्ष करुन दाखविणार का असाही सवाल आहे. काँग्रेसचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जात होते तेथे म्हणजे महाराष्ट्र, हरियाणा, उत्तरप्रदेश , उत्तराखंड, गोवा, आसाम आदी राज्यात भाजपने करीत काँग्रेसला चारीमुंड्या चित केले आहे.
जर काँग्रेसला पूर्ववैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर प्रत्येक राज्यात पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग सारखा चेहरा पुढे आणावा लागेल. भ्रष्ट नेत्यांना बाजूला सारावे लागेल. त्याचबरोबर भाजपाशी लढताना आता समविचारी पक्षांना सोबत घेऊनच कॉग्रेसला पुढे जावे लागणार आहे. भाजपशी टक्कर द्यायची असेल तर कार्यकर्त्यांना बळ देण्याचीही गरज आहे. सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन जाताना प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन जावे लागेल तरच कॉग्रेसला सुगीचे दिवस येऊ शकतात. कारण सध्याच्या काळात जातियवादी पक्षांनी जो उन्माद मांडला आहे त्याला जर चाप लावायचा असेल तर कॉग्रेसला समविचारी पक्षांना बरोबरीने घेऊन जावे लागणार आहे. भाजपाच्या आक्रमकवादाविरुध्द शांत चित्ताने त्यांना सामोरे जावे लागेल. गुजरातच्या निवडणुकीत त्यांनी अनेक देवळांना भेटी दिल्याने एक नवा संदेश गेला आहे. कॉग्रेस केवळ अल्पसंख्यांचे लांगूनचालन करीत नाही तर आपण हिंदू आहोत व त्याचा सार्थ अभिमान बालगण्यात काहीच गैर नाही. त्याचा अभिनिवेश नसावा व त्यातून दुसर्‍याला कमी लेखण्याची वृत्ती नसावी. राहूल गांधी यांची प्रतिमा नको तेवढी भाजपाने मलिन केली होती. अर्थात यात भाजपाने अतिशय खालच्या पध्दतीचे राजकारण केले. मात्र या टिकेलाही राहूल गांधी डगमगले नाहीत. अतिशय निश्‍चयाने त्यांनी काम केले व गुजरातमध्ये भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले. राहूल गांधी यांच्याकडे संयम चांगला आहे, कार्यकर्त्यांना एैकून घेण्याची त्यांची क्षमता आहे, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे त्यांनी नक्की केले आहे, त्यामुळेच कॉग्रेसला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यात ते यशस्वी होतील किंवा नाही ते काळ ठरवील.
---------------------------------------------------- 

0 Response to "नवी विटी, नवा दांडू..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel