-->
पाकपुरस्कृत दहशतवाद

पाकपुरस्कृत दहशतवाद

संपादकीय पान शनिवार दि. ०८ ऑगस्ट २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पाकपुरस्कृत दहशतवाद
पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे माजी संचालक तारिक खोसा यांनी मुंबई हल्ल्यातील सहभागाबाबत दिलेली कबुली व जम्मू-काश्मीर येथे नुकताच पकडलेला दहशतवादी या सर्व घटना म्हणजे भारतातील दहशतवाद हा पाकपुरस्कृत असल्याच्या आजवरच्या आरोपाला पुष्टी मिळणार्‍या आहेत. पाकिस्तानने कितीही याबाबत इन्कार केले तरीही भारतातील हल्यामागे पाकच आहे व भारत अस्थिर व्हावा यासाठी अतिरेकी कारवाया या त्यांच्या मार्फतच केल्या जात आहेत हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. मुंबईवर २०११ साली झालेला दहशतवादी हल्ला व त्याचा कट हा पाकिस्तानपुरस्कृत असल्याचे तारिक खोसा यांनी तेथील नामवंत दैनिक डॉनमधील एका ताज्या लेखात म्हटले आहे. खोसा यांनी हा लेख लिहिण्याचा उद्देश काय आहे हे अद्याप समजले नसले तरीही एक जऴजऴीत वात्सव त्यांनी स्पष्टपणे या लेखात मांडले आहे. कदाचित त्यांनी हा लेख राजकीय दबावातून लिहिला असण्याची शक्यता जास्त आहे. पाकिस्तान सरकारमध्ये काम केलेल्या एका जबाबदार व्यक्तीने आपल्याच देशाच्या मुंबई हल्ल्‌यातील सहभागाबद्दल सरकारला खडे बोल सुनावणे ही एक मोठी घटना आहे. अर्थात हा आरोप त्यांनी लेखात मोघम केला नसून एकूणच हा हल्ला कसा आखण्यात आला, त्यामागची सुत्रे कशी हलली, कसाब व त्याच्या सहकार्‍यांना कशा प्रकारे मुंबईत कानार्‍यावर पोहोचविण्यात आले याचे सर्व इथ्यंबूत वर्णन करण्यात आले आहे. यासंबंधी त्यांनी पाकिस्तानने आपली चूक मान्य करुन यासाठी जबाबदार लोकांना शिक्षा ठोठवावी असाही सल्ला त्यांनी दिला आहे. पाकने सातत्याने मुंबई हल्ला कट आमच्या भूमीत रचला गेला नसल्याचे प्रतिपादन करत मुंबई हल्ल्याातील पुरावे व समझौता एक्स्प्रेस घटनेतील पुरावे यांची सांगड घालत एकूणच शांततेची प्रक्रिया थांबविली आहे. गेल्या महिन्यात नरेंद्र मोदी व नवाझ शरीफ यांची जी भेट झाली, त्या भेटीत मुंबई हल्ल्‌याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता. मुंबई हल्ल्‌यासंदर्भात पाकिस्तानमध्ये जे खटले चालू आहेत, त्यांचा वेगाने निकाल लावण्यासाठी शरीफ सरकारने प्रयत्न करावेत, तसेच या खटल्यातील पुराव्यांची देवाणघेवाण करावी यावर सहमती झाली होती. आता मोदी पाकिस्तानचा दौरा जेव्हा करतील त्या वेळी अनेक तपशिलांवर चर्चा होईल व भारताला खोसा यांच्या कबुलीचा एक राजनैतिक दबाव पाकिस्तान सरकारवर टाकावा लागेल. एकीकडे खोसा यांचा लेख प्रसिध्द झालेला असताना तिकडे जम्मू-श्रीनगर महामार्गावरील उधमपूरजवळ सीमासुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला करणार्‍या दोन दहशतवाद्यांपैकी एकाला जिवंत पकडण्यात आले. पाच तासांच्या चकमकीनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्याला ग्रामस्थांच्या मदतीनं अटक केली. २६/११च्या हल्ल्यातील दहशतवादी कसाबनंतर जिवंत पकडलेला हा पहिलाच अतिरेकी आहे. कासिम खान असं या दहशतवाद्याचं नाव असून, तो पाकिस्तानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. उधमपूरपासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या सिमरौली येथे बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दोन दहशतवाद्यांनी बीएसएफच्या ताफ्याला लक्ष्य केलं. विरुद्ध दिशेनं येणार्‍या ट्रॅकमध्ये हे दहशतवादी होते. त्यांनी आधी ताफ्यावर ग्रेनेड हल्ला केला आणि नंतर बेछूट गोळीबार सुरू केला. या मार्गावर गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी कारवाया घटल्या होत्या. मात्र, अचानक झालेल्या या हल्ल्याने सुरक्षा यंत्रणा हादरल्या. या हल्ल्यातून सावरत, बीएसएफनं दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. त्यानंतर, दुसर्‍या दहशतवाद्यानं दोन ग्रामस्थांना ओलीस धरून गोळीबार सुरूच ठेवला होता. ही धुमश्‍चक्री सुमारे पाच तास चालली. जवानांनी दहशतवाद्याला अक्षरशः जेरीस आणलं होतं. अखेर, तो पळून जात असताना चिरडी ग्राम रक्षा समितीच्या सदस्यांच्या मदतीनं जवानांनी या दहशतवाद्याला पकडलं. हे जवानांचं खूपच मोठं यश मानलं जातं आहे. अर्थात हा अतिरेकी म्हणजे पाक पुरस्कृत दहशतवाद कशाप्रकारे सुरु आहे त्याचे एक उत्तम उदाहरण ठरावे. एकीकडे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर दहशतवादाने थैमान घातले असताना हाच पाक भारतालाही अस्थिर करण्यासाठी नेहमी तत्पर असतो. त्यासाठी सतत सीमेवरील ज्या भागातून अतिरेकी घुसविता येतील तेथून त्यांना शस्त्रांसह घसविण्याचा प्रयत्न केला जातो. धर्माच्या नावाखाली या अतिरेकी तरुणांची माथी भडकावून जिहादसाठी भारतात पाठविले जाते. गेल्या महिन्यात गुरुदासपूर दहशतवादी हल्ल्‌यात भारताने पाकिस्तान नव्हे तर तेथील दहशतवादी संघटनांकडे अंगुलिनिर्देश करून समंजस भूमिका घेतली. हे उभय देशांमधील वातावरण गढूळ होऊ नये यासाठी गरजेचे होते. एकमेकांवर दोषारोप करणे, न्यायालयीन चौकशा लांबवणे यापेक्षा दोन्ही देशांनी एकत्रित चर्चा करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत भारतानेही संयम पाळण्याची गरज आहे. नुकतेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देशाच्या सर्वोच्च हितासाठी हिंसेचे समर्थन केले होते व लोकशाहीत बहुमत असणारे ते ठरवत असतात, असे वक्तव्य केले होते. अशा वक्तव्यावर पलीकडूनही तशीच उग्र प्रतिक्रिया येऊ शकते. त्यामुळे नुकसान शांतता प्रक्रियेचे होते हे समजून घेतले पाहिजे. आपल्या देशात सध्या भाजपाचे सरकार आहे. भाजपा पाकिस्तानला चुचकारण्याच्या यापूर्वीच्या सरकारवर धोरणावर नेहमी टीका करीत असे. मग आता हे सरकार का बरे संयम बाळगत आहे याचे उत्तर सरकारने देण्याची आता वेळ आहे.
----------------------------------------------------------------------

0 Response to "पाकपुरस्कृत दहशतवाद"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel