-->
ट्रम्प यांना धक्का

ट्रम्प यांना धक्का

संपादकीय पान बुधवार दि. 8 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
ट्रम्प यांना धक्का
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांवर अमेरिकेत येण्यास 90 दिवसांची बंदी घातली होती. या बंदीला अमेरिकन फेडरल कोर्टाने स्थगिती दिली. यानंतर ट्रम्प प्रशासनाने ही स्थगिती उठवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावत हुकूमशहा बनू पाहात असलेल्या ट्रम्प यांना मोठा धक्का दिला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांचा तीळपापड झाला होता. ट्रम्प यांनी हा निर्णय राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांना असलेल्या सर्वोच्च विशेषाधिकारातून घेतला असून या निर्णयाला स्थगितीचे अधिकारच न्यायालयाला नसल्याचा दावा अमेरिकन विधी विभागाने केला होता. मात्र सॅन फ्रँसिस्को येथील 9 व्या सर्कीट कोर्टात याबाबतची याचिका दाखल केल्यानंतर ही याचिका फेटाळून लावण्यात आली. न्यायालयाच्या निर्णयानुसार, तूर्तास या सात देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करता येणार आहे. विमान कंपन्यांनी अजूनही या सात देशांतील नागरिकांना अमेरिकेत नेण्याची तयारी दर्शवली नसून त्यामुळे संभ्रमावस्था कायम होती. फेडरल कोर्टाने या निर्णयाला स्थगिती देताच अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने या सात देशांतील नागरिकांना थांबवण्यासाठी सुरू केलेल्या सुरक्षा चाचण्या थांबवल्या आणि सरकारला तसे कळवले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्लामिक दहशतवाद रोखण्यासाठी सीरिया, इराण, सुदान, लिबिया, येमेन आणि सोमालिया या सात देशांतील नागरिकांना अमेरिकेत येण्यास आणि वास्तव्य करण्यास तात्पुरती, 90 दिवसांची मनाई करणारे आदेश दिले होते. यामुळे जगभरातून ट्रम्प यांच्यावर टीका झाली असली, तरी ट्रम्प मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात जगभरात निदर्शनेही झाली. ट्रम्प यांच्या या निर्णयाविरोधात अजूनही जगभरात विविध देश आणि शहरांमध्ये निदर्शने सुरूच आहेत. ट्रम्प यांच्या वतीने स्थगितीला आव्हान देण्यात आल्याचे समजल्यानंतर लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन या शहरांमध्ये हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. लंडनमध्ये सर्वाधिक 10 हजार लोक या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. यावेळी ट्रम्पविरोधी घोषणा देण्यात आल्या. ऑनलाईन पद्धतीनेही हा लढा जगभरात मोठया प्रमाणात सुरू झाला आहे. सध्या तरी ट्रम्प यांना मोठा धक्का सहन करावा लागला आहे.
-----------------------------------------------------------------

0 Response to "ट्रम्प यांना धक्का"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel