-->
महाराष्ट्राची अस्मिता जपा!

महाराष्ट्राची अस्मिता जपा!

रविवार दि. 19 फेब्रुवारी 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
महाराष्ट्राची अस्मिता जपा!
-----------------------------------------
एन्ट्रो- बैलगाडी शर्यतींसाठी नियमावली निश्‍चित करणे आणि त्याच्या काटेकोर पालनावर भर देणे हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातून बैलगाडी शर्यतीची परंपराही सुरू राहील आणि या शर्यतींच्या नावाने प्राण्यांचा छळ होत असेल तर तोही थांबण्यास मदत होईल. यामध्ये बैलगाडीवर एकच माणूस बसेल. बैलांना पराणी अथवा कोणत्याही इजा होईल अशा काठीने मारु नये. शर्यतीचे अंतर दोन किमी पेक्षा जास्त असू नये व बैलगाडी हकलणर्‍या माणसाच्या हातात ठराविक वजनाचीच काठी असावी. अशा प्रकारच्या अटींचा समावेश करावा. मात्र या शर्य्तीच बंद कराव्यात हे काही त्यावरचे उत्तर नाही....  
-----------------------------------------------
संपूर्ण महाराष्ट्रात प्रामुख्याने ग्रामीण भागात बैलगाड्यांच्या शर्यती भरविणेे ही अस्मिता आहे, त्यात शेतकर्याची केवळ करमणूक होते असे नव्हे तर त्यावर काही बागातील अर्थकारण अवलंबून आहे. मात्र प्राणीप्रेमाचा पुळका आलेल्या पेटा या संघटनेने यावर बंदी घालण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आणि न्यायालयाने ते मान्यही केले. मात्र न्यायालयाचा हा निर्णय मान्य करुन शेतकरी मात्र हिरमुसला झाला आहे. ग्रामीण भागातील ही एक सर्वसामान्यांची अस्मिता प्राणीप्रेमाचे निमित्त करुन गाढली जात आहे. प्राणीप्रेमाचे जर निमित्त केले जात आहे तर श्रीमंतांच्या रेसकोर्समध्ये करोडो रुपयांचा सट्टा लावण्यात येणारी घोड्यांची शर्यत का सुरु आहे? मग श्रीमंतांचे जर चोचले सरकार खपवून घेते तर गरीब शेतकर्‍यांच्या बैलगाडीच्या शर्यतीवरच का बंदी असाही प्रश्‍न उपस्थित होतो. आपल्याक़डे एकीकडे माणूस सुरक्षित नसताना प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी भांडणारे तथाकथित प्राणी मित्र संघटना या खर्या अर्शाने शेतकर्‍यांच्या विरोधात आहेत, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे.
तामीळनाडूत न्यायालयाचा आदेश धुडकावून राज्य सरकारने तामीळनाडूतील जल्लीकटू सुरु करण्याचा मार्ग मोकळा केला. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील राज्य सरकारने  वटहुकून काढून बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा सुरु कराव्यात, ही शेकापने हजारोंचा मोर्चा जिल्हाधिकारी कचेरीवर काढून केलेली मागणी समर्थनीय ठरते.
प्राणी मित्रांच्या संघटनानांनी शर्यतीत उतरणारा बैलगाडीचा मालक आपल्या बैलाला कशा प्रकारे पोटच्या पोराप्रमाणे जपतो, त्याला खाऊ घालतो, हे पाहिले पाहिजे. जर या शर्यती पुन्हा सुरु जाल्या नाहीत तर शेतकर्‍यांना या बैलांना पोसणे कठीण जाणार आहे. परिणामी बैलांची रवानगी कत्तलखान्यात होण्याचा धोका आहे. सध्याचे सरकार गाईंच्या संरक्षणासाठी अनेक उपाय योजेल पण बैलांसाठी काही करण्यास पुढे येणार नाही. अलिबागमध्ये मोठ्या संख्येने बैलगाडी शर्यत प्रेमी आहेत व त्यांची हौस आता तरी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या सरकारने जर पुन्हा एकदा याबाबत नकारघंटा दिली तर संघर्षासाठी पावले टाकावी लागणार आहेत. यासठी आपल्याला तामीळनाडूचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा लागणार आहे. तेथील जल्लीकटूसाठी आक्रमक आंदोलन पाहता मराठी अस्मिता कधी पेटून उठणार हा सवाल आहे. तामिळनाडूवासी त्यांची अस्मिता जपत, सणाला महत्व देत रणांगणात उतरले. न्यायालयाचा विरोध झुगारुन आंदोलन उठविले. इतकेच नाही तर चक्क सेलिब्रिटींनीही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मग असे असताना मराठी माणसांचे रक्त का थंडावले, मराठी माणसांनी आपल्या अस्मितेसाठी का एकत्र येऊ नये असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. बैलगाडी शर्यतीसाठी मैदानात उतरविण्याची धमक मराठी माणसांमध्येही आहे. गरज आहे ती केवळ एकत्र येऊन लढण्याची.
महाराष्ट्राला बैलगाडी शर्यतींची शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे परंपरा जपण्यासाठी भ्याड सरकारपुढे नतमस्तक न होता त्यांना नमविण्याचे आव्हान प्रत्येकावरच आहे. महाराष्ट्र हे शेतकर्‍यांचे राज्य असल्याने बैलांना या राज्यात अनन्यसाधारण महत्व आहे. शेतकरी आपल्या बैलजोडीला जीवापाड जपत असतो. त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करणारा शेतकरी खर्चही वारेमाप करतो. असे असताना आपल्या बैलांना जीवघेण्या यातना तो कसा देऊ शकेल, असा सवाल गाडीवानांकडून केला जात आहे. सध्या बैलगाडी शर्यत हा चर्चेचा विषय बनला आहे. कधी बैलगाडी शर्यत सुरु करण्याचा निर्णय दिला जातो तर कधी पुन्हा बैल शर्यतीवर स्थगिती आणली जात आहे. बैलगाडी शर्यत सर्वसामान्यांचा व्यवसाय नसून केवळ मनोरंजन आणि बैलांच्या दृष्टिने शेतीच्या कामातून निर्माण झालेला थकवा दुर करण्याचा एक उपक्रम असाच अर्थ आहे. एकीकडे अशा साध्या पद्धतीची बैलगाडी शर्यत तर दुसरीकडे रेसकोर्स. दिवसाकाठी कोट्यावधी रुपयांची उलाढाल रेसकोर्सच्या माध्यमातून होत असते. फरक फक्त इतकाच की, रेसकोर्समध्ये सहभागी होणारे धनवान आहेत. आणि बैलगाडी शर्यतीवाले गरीब शेतकरी आहे. इतकेच कशाला प्राण्यांना मारहाण होत असल्याचा आरोप करुन प्राणी मित्रांनी शर्यत बंद करावी अशी मागणी केली होती. मग रेसकोर्समध्ये प्राण्यांना मारले जात नाही का? याशिवाय जिवावर बेतणारे खेळ किंवा मनोरंजन यावर आक्षेप असेल तर मग सर्कसवर बंदी का नसावी.
संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडी मालकांची संख्या हजारांच्या आसपास आहे. शर्यतीत धावणर्‍या बैलांची किंमत कमीत कमी 30 हजारांपासून तीन लाखांपर्यंत आहे. बैलगाडी शर्यतीत धावणर्‍या बैलांना उत्तम खुराक दिला जातो. त्यात दररोज हिरवा चारा, कडवळ, मका, लसूण घास, शेंगदाणा पेंड, मक्याचा भरडा, अंडी, नारळाच्या पोग्या आदींचा समावेश असतो. या खुराकाचा रोजचा खर्च 500 ते 1000 रुपयांच्या दरम्यान असतो. अशा पद्धतीने जोपासलेले बैल शर्यतींसाठी तयार असतात. विशेष म्हणजे शर्यतींसाठी चांगल्या बैलाची किंमत लाखो रुपयांच्या घरात असते. यातून होणारी उलाढाल संबंधित शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. साहजिक शर्यतीच्या काळात छोट्या व्यावसायिकांना, कारागिरांना चांगला रोजगार उपलब्ध होतो. या शर्यतीच्या माध्यमातून रोजगार निर्मितीलाही चालना मिळत असते. असे असताना बैलगाड्यांच्या शर्यतींवर बंदी आणल्याने ही रोजगारनिर्मिती ठप्प झाली. त्यामुुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसणे साहजिकच आहे. शर्यतीवर बंदी आणल्याने बैलगाडी मालकांना बैलांची जोपासना शर्यतीच्या दृष्टिने करणे कठीण झाले आहे. शर्यतीच्या बैलांना लागणर्‍या मालाचा खप होत नसल्याने मका, शेंगदाणा अदी उत्पादनाद्धारे बैलांचे खाद्य बनविणार्‍या शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. जर्सी, देसी, गावठी, खिल्लारी असे बैलांचे विविध प्रकार आहेत. बैल हा प्राणी पाळीव असून अगदी इतिहासात डोकावून पाहिले तर भगवान शंकराच्याही सोबतीला नंदी होता. खिल्लारी जातीचा बैल शर्यतीसाठी उत्तम समजला जातो. पुणे, सातारा, कर्नाटक, म्हैसूर, कोल्हापुर आदी ठिकाणी खिल्लारी बैलांची पैदास केली जाते. बैलगाडी शर्यत प्रेमींकडून खिल्लारी प्रकारच्या बैलांना विशेष मागणी असल्याने बैलांची पैदास करणारे शेतकरी आठवडा बाजारात बैलांची विक्री करतात. चाकण, बेला, पुशेगांव, किणवी, साजगांव आदी ठिकाणी भरणार्‍या यात्रा किंवा आठवडा बाजार बैल विक्रीसाठी प्रख्यात आहेत. चाकण आणि पुशेगांव येथे भरणार्‍या पारंपारिक यात्रांमध्ये देशातून शेतकरी आपले बैल विक्रीसाठी व खरेदीसाठी येतात. मात्र बैलगाडी शर्यतीवर बंदी आणल्याने शेतकर्‍यांना आपले बैल विकणे कठीण झाले आहे. साहजिकच त्याचा परिणाम पैदास करण्यावर होत आहे. कारण खिल्लारी बैल पैदास करण्यासाठी शेतकर्‍याला त्याच दर्जाचा खुराक गायीला द्यावा लागतो. एवढे करुनही जर बैलाची विक्री होत नसेल तर पैदास करण्याला काय अर्थ? बैलगाडी शर्यतीवर बंदी आल्याने लोहार, सुतार या कारागीरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शर्यतीसाठी लागणार्‍या एका गाडीची किंमत साधारणतः 30 ते 40 हजार रुपये आहे. तर गाडीच्या रिंगा व इतर लोखंडाचे काम लोहार करतो. बैलगाडी शर्यतीवर बंदी आल्याने एका सुताराची चार ते पाच लाखाची उलाढाल पुर्णतः बंद पडली. आहे. तर गाडीचे लोखंडी साहित्य बनविण्यासाठी लोहार पाच ते सहा हजार रुपये मजुरी घेतो. त्यामुळे त्याच्या कुटूंबावरही उपासमारीची वेळ आली आहे. इतकेच नाही तर एका बैलगाडीला 10 ते 12 किलो लोखंडाची आवश्यकता लागते. बैलगाडी शर्यतच बंद पडल्याने गाडया बनविणे किंवा त्यांची दुरुस्ती करणे अशी कोणतीही कामे सुतार व लोहाराकडे जाणे पुर्णतः बंद पडले आहे. केवळ एका गावाचा विचार न करता संपुर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज बैलगाडी शर्यतीवर आलेल्या बंदीमुळे 100 ते 200 कोटी रुपयांची उलाढाल पुर्णतः बंद पडली आहे. सध्या सर्वत्रच बाजारूपणा वाढीस लागला आहे आणि त्याचा परिणाम स्पर्धांना अनिष्ट रूप प्राप्त होण्यात दिसून येत आहे. तसे बैलगाडी शर्यतींबाबतही होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बैलगाडी शर्यतींसाठी नियमावली निश्‍चित करणे आणि त्याच्या काटेकोर पालनावर भर देणे हाच मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. त्यातून बैलगाडी शर्यतीची परंपराही सुरू राहील आणि या शर्यतींच्या नावाने प्राण्यांचा छळ होत असेल तर तोही थांबण्यास मदत होईल. यामध्ये बैलगाडीवर एकच माणूस बसेल. बैलांना पराणी अथवा कोणत्याही इजा होईल अशा काठीने मारु नये. शर्यतीचे अंतर जावून येऊन दोन किमी पेक्षा जास्त असू नये व बैलगाडी हकलणर्‍या माणसाच्या हातात ठराविक वजनाचीच काठी असावी. अशा प्रकारच्या अटींचा समावेश करावा. मात्र या शर्य्तीच बंद कराव्यात हे काही त्यावरचे उत्तर नाही.

0 Response to "महाराष्ट्राची अस्मिता जपा!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel