-->
संघाची नाराजी भोवणार?

संघाची नाराजी भोवणार?

संपादकीय पान सोमवार दि. 20 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
संघाची नाराजी भोवणार?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे नाते काय हे आता सांगण्याची गरज राहिलेली नाही. संघाने आपली आजवरची सर्व शक्ती भाजपाच्या मागे लावून हा पक्ष कसा सत्तेवर येईल ते पाहिला आहे. संघ हा राजकीय विचारांचा पुरस्कार करीत नसला तरी अप्रत्यक्षपणे आपली सर्व रसद भाजपाला पुरवित असतो ही बाब काही छुपी राहिलेली नाही. अर्थात ही मदत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष असते. आता अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या काळात संगाने आपली सर्व शक्ती अण्णांच्या मागे लावून त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपाला कसा होईल ते पाहिले होते. गेल्या लोकसभेला व विदानसभेला अशाच प्रकारे संघाने आपली सर्व ताकद भाजपाच्या मागे लावून त्यांना सत्तास्थानी पोहोचण्यसाठी सढळ हस्ते मदत केली होती. आता मात्र संघाची नाराजी भाजपावर आहे. नागपुरातील अनेक संघ स्वयंसेवकांना भाजपाने तिकिट नाकारले आहे. अर्थात संघाची नाराजी आपल्याला तिकिट नाकारल्याबद्दल नाही, तर एका रात्रीत बाहेरुन आलेल्या अन्य पक्षांच्या नेत्यांना तिकिट देऊन पक्षाच्या निष्ठावानांवर अन्याय केल्याबद्दल त्यांच्यात नारजी आहे. अर्थात संघ स्वयंसेवकांची ही नाराजी कुणासही मान्य होईल. मात्र सत्तेच्या राजकारणात सद्या भाजपांने जी अन्य पक्षातून नेत्यांची व कार्यकर्त्यांची आयात सुरु करुन कोणत्याही थराला जाऊन सत्ता काबीज करण्याचा जो सपाटा लावला आहे त्याबद्दल संघात नाराजी आहे. संघाच्या निष्ठावान स्वयंसेवकांनी, आपल्या वैचारिक बैठकीवर पक्ष वाढविण्याचा प्रयत्न केला त्यांना ही बाब पटणारी नाही. पूर्वीचे सत्ताधारी व सध्याचा भाजपा यात फरक तो काय राहिला असा त्यांचा सवाल काही चुकीचा नाही. त्यामुळे नागपुरातील सुमारे आठ स्वयंसेवकांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. भाजपाच्या मते ती बंडखोरी आहे, मात्र स्वयंसेवकांसाठी ती तत्वाची लढाई आहे. सध्या सत्तेची झूल पांघरलेल्या भाजपाला निष्ठावान किंवा सर्वसामान्य कार्यकर्ते दिसत नाहीत. त्यांना दिसते ती फक्त सत्ता. त्यात स्वयंसेवक नाराज होणे स्वाभाविकच आहे. पुण्यात तर संघाच्या स्वयंसेवकांनी पुणे महापालिकेच्या प्रचारात सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पक्षाचे कमळ चिन्ह घेऊन संघ स्वयंसेवक आता घरोघरी जाणार नाहीत. भाजप हा आता मोठा पक्ष झाला आहे. त्याला दर वेळी संघाच्या मदतीची गरज नाही, अशी अधिकृत भूमिका संघाचे पदाधिकारी मांडत आहेत. प्रत्यक्षात पुण्यातील उमेदवारी वाटपात संघाच्या शिफारशी भाजप नेत्यांनी काही ठिकाणी धुडकावलेल्या असल्याने संघाची नाराजी कायम दिसून येते आहे. भाजपने चांगल्या उमेदवारांना संधी द्यावी यासाठी पुण्यात संघाचा आग्रह होता. संघाने कोणाला उमेदवार द्यावी अथवा नाकारावी याबाबत थेट नावे सांगितली नसली तरी योग्य तो संदेश दिला होता. मात्र संघाने शिफारशी करूनही काही ठिकाणी विशेषतः कोथरूडमध्ये वादग्रस्त उमेदवार दिले. भाजपच्या निष्ठावंतांची उमेदवारी अखेरच्या क्षणी कापण्यात आली. अगदी मुख्यमंत्री कार्यालयाने तिकीट कापल्याचे या निष्ठावंतांना सांगण्यात आले. तेसच नेत्यांच्या नातेवाइकांना उमेदवारी न देण्याबाबतही संघ आग्रही होता. स्थानिक आमदारांनी संघाच्या कार्यकर्त्यांऐवजी इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना पायघड्या अंथरल्या, अशा प्रकारच्या तक्रारी झाल्या. अर्थात संघाची ही नाराजी भाजपाला यावेळी भोवणार, हे नक्की.

0 Response to "संघाची नाराजी भोवणार?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel