-->
शनिवारवाड्याच्या साक्षीने...

शनिवारवाड्याच्या साक्षीने...

संपादकीय पान गुरुवार दि. 12 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
शनिवारवाड्याच्या साक्षीने...
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शेतकरी कामगार पक्षात आज पुण्यातील एतिहासिक शनिवारवाड्याच्या साक्षीने राजमाता जिजाऊ भोसले यांच्या जयंतीच्या दिवशी प्रवेश करीत आहेत. त्यांच्या रा शेकापतील प्रवेशाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटणार आहेत. त्यामुळे परिवर्तनाच्या लढाईत ही घटना ऐतिहासिक ठरणार आहे, यात काहीच शंका नाही. समाजातील सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांचा कोणताही विचार सध्याचे राज्यकर्ते करीत नसताना देशात बहुजनांच्या म्हणजेच फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांशी प्रमाणिक राहून राजकारण करण्याची गरज आहे. केंद्रात व राज्यात सत्तेत आलेल्या हिंदुत्ववाद्यांच्या पक्षाने तर आपल्या देशाची स्वातंत्र्यानंतर स्थापन करण्यात आलेली सर्वधर्मसमभावाची चौकट मोडीत काढण्यचा डाव रचला आहे. शेतकरी कामगार पक्षाने आपल्या स्थापनेपासून बहुजनांच्या राजकारणाचा विचार जपला आहे, आपल्या कार्यकर्त्यांची फळी याच विचारांशी बांधिलकी ठेवून बांधली आहे. त्यामुळेच प्रविण गायकवाड यांची वैचारिक बैठक शेकापशी पक्की जुळली. वैचारिक बांधिलकी पक्की असलेल्या कोणत्याही संघटनांचे एकत्रिकरण करताना तसेच व्यक्ती त्यात समाविष्ट होत असताना वैचारिक जुळवाजुळव होणे ही गरज असते. ज्याप्रकारे राष्ट्रवादीतून भाजपात, कॉग्रेसमध्ये किंवा अन्य कोणत्याही पक्षात जाताना रातोरात बेडुकउड्या मारल्या जातात तशा प्रकारचे एकत्रिकरण हे संधीसाधू असते. त्याच वैचारिक बांधिलकी पक्की नसते. केवळ तत्कालीन फायद्यासाठी पक्षात अनेक लोक येतात व त्याच गतीने जातातही. मात्र बहुजनांचे भविष्यात राजकारण करताना त्याचा पाया हा पक्का असला पाहिजे हे ध्यानात घेऊन उभयतांमध्ये प्रदीर्घ काळ चर्चा झाल्या व आता त्याला मूर्त स्वरुप प्राप्त झाले आहे. खरे तर प्रविण गायकवाड सध्या केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपात सहभागी झाले असते तर त्यांना लगेचच एखादे मंत्रिपदही मिळाले असते. मात्र तसा विचार त्यांच्या मनालाही शिवला नाही. कारण त्यांनी शाहू-फुले-आंबेडकरांची जी वाचारिक बैठक स्वीकारली आहे त्याच्याशी प्रतारणा करण्याचा तो भाग झाला असता. त्यादृष्टीने त्यांनी राजकारण करण्यासाठी बहुजनांचे हित सांभाळणारा पक्ष म्हणून शेकापकडे पाहिले. मराठा समाजाला बहुजन चळवळीशी जोडण्यात मोठे योगदान असलेल्या प्रविण गायकवाड यांची वैचारिक बैठक पक्की आहे. आजवर मराठे राज्यकर्ते म्हणून वावरत असले तरी समाजात त्यांचे स्थान हे शुल्लकच राहिले. मराठा समाजातील काही मोजक्याच हाताच्या बोटावर मोजता येईल अशांचे यात भले झाले. यात सर्वसामान्य मराठा समाज भरडला गेला, आपला उध्दार करु शकला नाही, हे वास्तव त्यांनी आपल्या समाज बांधवांपुढे सातत्याने मांडले व यातून मराठा समाजाला आरक्षणाची का गरज आहे हे त्यांनी उदाहरणांसह दाखवून दिले. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यांनी लावून धरली व त्यातूनच गेल्या वर्षात मराठा समाजाचे मोर्चे निघाले. या चळवळीच्या जोडीने फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे एक पाईक म्हणून राज्यातील जनता गायकवाड यांच्याकडे पाहते. केवळ आपल्या समाजासाठीच ते झटतात असे नव्हे तर पुरोगामी चळवळींशी त्यांचे नाते घट्ट आहे. त्यातून ते बामसेफ चळवळीशी त्यांचे नाते दृढ झाले आहे. पुण्यातील बामसेफ भवनाला त्यांनी स्वत:ची जागा दिली आहे. एक अभ्यासू, पुरोगामी चळवळीशी एकनिष्ठ, उत्कृष्ट वक्ता अशी त्यांची राज्यात प्रतिमा आहे. पुरोगामी चळवळीशी असलेली त्यांची नाळ शेकापमध्ये आल्यावर अधिकच वृध्दींगत होईल. शेकापने आपल्या स्थापनेपासून मार्क्सवाद, लेलिनवादाचे तत्वज्ञान भारतीय भाषेत सांगणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकोबा, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी आपली बांधिलकी नेहमीच जपली आहे. मराठा, कुणबी, बहुजन, दलित, कष्टकरी यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी आजवर कार्य केले आहे. शेकापची ताकद किती हे पाहण्यापेक्षा त्यांचा विचार किती मोठा आहे व त्यातून बहुजन समाजाचा विचार किती प्रभावीपणे मांडण्याचे काम केले जाते याकडे राज्यातील जनता पाहते आहे. गेल्या वर्षात तळागाळातील मराठा समाज अस्वस्थ आहे. त्यातच संभाजी राजे यांना भाजपाने खासदारकी बहाल करुन आपल्या दावणीला बांधल्याने या ही अस्वस्थता वाढली. राज्यात मराठ्याचे मूक मोर्चे निघाले. या मोर्च्यांनाही बदनाम करण्याचे काम भाजपाने मागिल दाराने केले. मात्र त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यातून काही मराठा नेत्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न झाला. मात्र मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रश्‍न भिजतच ठेवला गेला. सरकारची इच्छा असेल तर मराठ्यांना आरक्षण देता येऊ सकते. त्यासाठी त्यांनी नच्चीपन समितीचा आहवाल केंद्राने स्वीकारणे आवश्यक आहे. त्यामुळे आरक्षण 50 टक्क्यांच्या पुढे नेता येईल. ओबीसींसाठी सध्या असलेले आरक्षण 27 टक्क्यांवरुन 52 टक्क्यांवर नेता येईल. यात मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करता येईल. परंतु असे करण्यासाठी सरकारची राजकीय इच्छााशक्ती हवी. प्रविण गायकवाड यांना जसे समाजातील तळागातील लोकांचा विचार करावयाचा आहे तसाच त्यांना आपला हा समाज पुरोगामी चळवळीशी बांधला गेला पाहिजे असेही ठाम मत होते. यातूनच त्यांनी शेकापची साथ घेण्याचा निर्णय घेतला. सध्या देशातील वारे पाहता, पुरोगामी चळवळीची दुदैवाने पडझड होते आहे. अशा स्थितीत प्रविण गायकवाड यांनी शेकापशी राजकीय बांधिलकी जोडणे ही पुरोगामी चळवळीतील मरगळ झटकण्याची घटना ठरणार आहे. एक नवा महाराष्ट्र जो शाहू-फुले-आंबेडकरांना अपेक्षित होता त्याची उभारणी करण्यासाठी पडलेले हे एक दमदार पाऊल ठरणार आहे.
------------------------------------------------------------

0 Response to "शनिवारवाड्याच्या साक्षीने..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel