-->
धनदांडग्यांची मग्रुरी

धनदांडग्यांची मग्रुरी

संपादकीय पान शनिवार दि. 5 नोव्हेेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
धनदांडग्यांची मग्रुरी
थळ गावाचे नाव हे देशात पोहोचले ते तेथील आर.सी.एफ.च्या प्रकल्पामुळे. केवळ हेच थळचे वैशिष्ट्य नाही. तर येथील निळसर समुद्रकिनारा अनेक पर्यटकांना भुलवितो. त्यामुळे या समुद्रकिनार्‍याला लागून अनेक सेलिब्रेटींचे व मुंबईतील उद्योगपतींचे बंगले थळच्या सौदर्यात निश्‍चितच भर घालतात. अर्थात या गावचा मूळ रहिवासी असलेला कोळी बांधव सध्या तेथे परका झाल्यासारखा झाला आहे. चाळमळा येथील कोळी समाजाने समुद्रकिनारी ओली मच्छी सुकविण्यासाठी तयार केलेली खळी अनाधिकृत दाखवित त्यांच्या परंपरागत व्यवसायावर गदा आणण्याचा प्रयत्न थळ ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाने केला आहे. मात्र दुसरीकडे येथे सी.आर.झेड.मध्ये असलेल्या धनदांडग्यांच्या बंगल्यांना याच यंत्रणेकडून अभय दिले जात आहे. परिणामी आपल्या जीवनमरणाचा व रोजीरोटीचा प्रश्‍न असल्याने येथील कोळी बांधवांनी ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाविरोधात संघर्ष करण्यास सुरुवात केली आहे. येथील कोळी बांधवांचा मासेमारी हा परंपरागत व्यवसाय आहे. ओली मासळी सुकविण्यासाठी कोळी बांधवांच्या पुर्वजांनी थळ समुद्रकिनार्या लगत खळी बनविली आहेत. याच ठिकाणी आजही मासळी सुकविण्याचे काम कोळी समाजातील महिला उन्हाचे चटके खात करीत असतात. शेकडो कुटूंबाची ही खळी असून त्यामार्फत हजारो कुटूंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर आहे. जिल्हयातील अनेक समुद्रकिनारी कोळीवाड्यांमध्ये खळी तयार करून त्या ठिकाणी मासळी सुकविण्याचे काम केले जातेे. खरे तर ही खळी त्यांच्या नावावर करण्यात यावेत अशा सुचनाही शासनाने केल्या आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दहा वर्षापुर्वी खळी नावावर करण्याबाबत पत्र व्यवहारही करुनही प्रशासन लक्ष देत नाही. तसेच थळ ग्रामपंचायतीनेही ग्रामसभेमध्ये खळी तयार करण्याचे ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र याच कोळी समाजाचा परंपरागत व्यवसाय नष्ट करण्याचा घाट थळ ग्रामपंचायतीने जिल्हाधिकार्यांच्या मदतीने घातला असल्याची संतापजनक प्रतिक्रिया कोळी समाजाकडून व्यक्त करण्यात आली आहे. आता चाळमळा परिसरातील सर्व्हे नं. 345 या जागेत समुद्रकिनारी मासळी सुकविण्यासाठी तयार करण्यात आलेली खळी अनाधिकृत असून त्या काढण्यात याव्यात अशा नोटीसा थळ ग्रामपंचायतीने दिल्या आहेत. अन्यथा पोलीसांच्या मदतीने खळी जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात येतील अशा धमक्या देण्यात आल्या आहेत. सुकी मासळी येथील धनदांडग्यांच्या नाकात शिरली आहे. त्यांचे बंगले येथून जवळ असल्याने त्यांना सुक्या मासळीचा वास नको झाला आहे. परंतु मूळचे या गावचे रहिवासी असलेल्या कोळी बांधवांवर अशा प्रकारे आपल्या पैशाच्या जीवावर धाकदपटशा करण्याचे हे धंदे आहेत. येथील धनदांडग्यांचेच बंगले हे अनधिकृत आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई न करता येथील कोळी बांधवांच्या रोजीरोटीवर हे उठले आहेत. येथील कोळी बांधवांचा हा लढा गेली 30 वर्षे सुरु आहे. याचा उद्रेक बुधवारी झाला व सर्व कोळी समाज या विरोधात रस्त्यावर आला. 1983 साली तत्कालीन आमदार दत्ता पाटील यांनी हा प्रश्‍न जोरदारपणे विधीमंडळात मांडून या जमिनी स्थानिक कोळ्यांच्या ताब्यात राहातील यासाठी जी.आर. काढावयास सरकारला भाग पाडले. आता मात्र येथील जमीनी विकणारे दलाल, काही ग्रामपंचायतीचे सदस्य, महसूल खात्याचे अधिकारी येथील कोळी बांधवांच्या हक्कावर उठले आहेत. येथील शाहरुख खानच्या बंगल्याला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही, मात्र त्याचबरोबर येथील स्थानिकांचे हक्क डावलता कामा नयेत, हे देखील महत्वाचे आहे.

0 Response to "धनदांडग्यांची मग्रुरी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel