-->
राम नामाचा पुन्हा जप

राम नामाचा पुन्हा जप

संपादकीय पान शुक्रवार दि. २१ ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
राम नामाचा पुन्हा जप
उत्तरप्रदेशात निवडणुका आल्या की तेथील लोकांच्या प्रश्‍नांची चर्चा करण्याएवजी सर्वात प्रथम राम नामाचा जप करण्यात येेतो. हा जप अर्थातच भाजपाकडून सुरु होतो. गेल्या तीन दशकभर हे सुरु आहे. आता देखील निवडणुका उत्तरप्रदेशात येऊ घातल्या आहेत व त्यासाठी मतांचे ध्रुव्रीकरण करण्यासाठी भाजपाने राम नामाचा जप सुरु केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची सुरुवात सहा महिन्यांपूर्वीच केली होती. आता प्रभू रामचंद्रांच्या नावाने संग्रहालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कडव्या हिंदुत्ववाद्यांनी त्याला विरोध केला आहे. आम्हाला राम मंदिर पाहिजे, संग्रहालय नको, अशा घोषणा सुरु झाल्या आहेत. मात्र रामाच्या नावाने मतांचे ध्रुवीकरण आता सुरु झाले आहे. १९८० साली मंदिर वही बनवायेंगे या घोषणेने भाजपाला एक गठ्ठा मते मिळवून दिली, तेव्हापासून त्यांना मते मिळविण्याची ही खाणच आहे, असे वाटू लागले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मधील लोकसभा निवडणुकीत अवघ्या दोन जागा जिंकू शकलेल्या भाजपला त्यावेळी या घोषणेने संजीवनी मिळाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छत्राखालील हिंदुत्ववादी संघटनांच्या रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनास देशभरातून मिळालेला उदंड प्रतिसाद बघूनच भाजपला या आंदोलनात उडी घेणे भाग पडले होते. याचा प्रारंभ लालकृष्ण अडवानी यांनी सोमनाथ से अयोध्या रथयात्रा काढून केला आणि त्याची परिणती हिंदुत्ववादी शक्तीच्या जोरावर अयोध्येतील बाबरी मशीद जमीनदोस्त करण्यात आणि पुढे भीषण दंगलीत झाली होती. भाजपाची सत्ता आली तरी त्यांनी काही त्या जागी मंदिर काही बनविले नाही. उलट हा प्रश्‍न सतत कसा तेवत ठेवता येईल हे पाहिले. आज या घटनेला तीन दशके झाली असली तरीही रामाचे मंदिर काही उभे राहिलेले नाही. उलट प्रत्येक निवडणुकीत राम नामाचा जप करुन मते पदरात पाडून घेतली गेली आहेत. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाच्या जाहीरनाम्यात राम मंदिराचा उल्लेख असतो. आता तर मोदी सरकारने त्यांच्या तोंडाला पाने पुसून, मंदिराऐवजी रामाच्या नावाने संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर मोदी सरकारकडे संपूर्ण बहुमत आहे, अशा बहुमतांच्या जोरावर मंदिर उभारणे शक्य आहे, परंतु ते काही उभारले जाईल असे दिसत नाही. भाजपच्या दृष्टीने तर उत्तरप्रदेशातील या निवडणुकीला विशेष महत्त्व असल्याने या पक्षाने पद्धतशीरपणे आखणी केल्याचे दिसते. त्यासाठी हिंदुत्व, राष्ट्रवाद, रामलल्ला असे भावनिक पत्ते बाहेर काढले आहेत. सर्जिकल स्ट्राइकनंतर राजकीय लाभ उठवण्यासाठी उत्तर प्रदेशात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी लावलेल्या फलकांचा मुद्दा प्रथम चर्चेला आला. त्यावरून वादविवाद घडले व त्यातून या कारवाईबाबत भाजपने जे श्रेय लाटण्याची कृती केली आहे त्याबाबत जनतेत नाराजीच व्यक्त झाली. यातच भरीस भर म्हणून की काय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दोनच दिवसांपूर्वी त्याबाबत संघ शिकवणुकीमुळेच आम्ही सर्जिकल स्ट्राइक करू शकलो, असे विधान करून नवा वाद ओढवून घेतला. सध्याच्या सरकारला हिंदुत्ववाद, संघ याशिवाय दुसरे काही दिसत नाही. देशातीछल सर्वच जनतेने भगव्या विचाराचे व्हावे अशी त्यांची समजूत आहे. हिंदुत्ववादी राष्ट्रवादाची मांडणी करण्याच्या प्रयत्नांचाच हा एक भाग असू शकतो. अर्थात, अशा महत्त्वाच्या कारवाईबाबत वारंवार वादग्रस्त विधाने करणे म्हणजे याचे गांभीर्य कमी करण्यासारखे आहे व यातून संरक्षण दलाचे महत्व कमी करण्यासारखे आहे. अर्थात हे किमानपक्षी संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणार्‍यांनी तरी लक्षात ठेवायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील या कारवाईची तुलना इस्रायलच्या रणनीतीशी करून हा मुद्दा चर्चेत ठेवला. संग्रहालय उभारण्याचा सरकारचा हा निर्णय अर्थातच राजकीय आहे आणि काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तो घेण्यात आल्यामुळे तर त्या निर्णयास अनेक पदर प्राप्त झाले आहेत. खरे तर मोदी हे विजयादशमीच्या मुहूर्तावर लखनौमधील रामलीला उत्सवास उपस्थित राहिले तेव्हाच जय श्रीराम अशी घोषणा देऊन त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले होते. कडवट हिंदुत्ववादी भाजप कार्यकर्त्यांचेही या निर्णयामुळे समाधान झालेले नाही. विश्‍व हिंदू परिषदेचे कट्टर कार्यकर्ते आणि खासदार विनय कटियार यांच्या टिप्पणीमुळे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून मंदिराऐवजी दाखवण्यात आलेल्या या लॉलीपॉपमुळे आमचे समाधान होणार नाही, अशी कडवट टीका त्यांनी स्वपक्षावरच केली आहे. मात्र, या योजनेस कोणताही राजकीय रंग प्राप्त होऊ नये, अशी दक्षताही सरकार घेऊ पाहत आहे. गौतम बुद्ध, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या नावाने या पर्यटनाच्या नावाखाली सरकार यात्रा आयोजित करणार असून, त्यासाठी शेकडो कोटींचा निधी घोषित करण्यात आला आहे. अर्थात, राम असो की बुद्ध वा श्रीकृष्ण यांच्या नावाची ही जपमाळ नेमक्या याच मुहूर्तावर हाती घेण्याचे कारण हे राजकीय हेतूंनी प्रेरित आहे, ही बाब लपून राहिलेली नाही. उत्तर प्रदेशातच मथुरा हे श्रीकृष्णाचे जन्मस्थान आहे आणि बुद्धांचे असंख्य अनुयायी हेही याच राज्यात आहेत. या सर्वांनाच खूश करून मतपेढी मजबूत करण्याचा हा डाव भाजपने केंद्र सरकारच्या माध्यमातून ऐन निवडणुकांच्या तोंडावर घेतला आहे. अशा प्रकारे भाजपाला सत्ता मिळविण्यासाठी राम नामच्या जपाने नेहमीच साथ दिली आहे. यंदा हा राजकीय डाव यशस्वी होतो का ते पहायचे.
--------------------------------------------------------------------

0 Response to "राम नामाचा पुन्हा जप"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel