-->
विभक्ततेच्या वाटेवर...

विभक्ततेच्या वाटेवर...

संपादकीय पान शनिवार दि. २२ ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
विभक्ततेच्या वाटेवर...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच मुंबई महानगरपालिकेसह आगामी येऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी शिवसेना भाजपापासून विभक्त होऊन स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यात भाजपाचा कोणताही नेता येतोत व शिवसेनेच्या टपलीत मारतो अशी केविलवाणी अवस्था शिवसेनेची भाजपाने केली आहे. अर्थात ही परिस्थिती भाजपाने जाणूनबुजून केली आहे. कारण भाजपाला केंद्रापासून ते पार ग्रामपंचायतीपर्यंत स्वबळावर सत्ता मिळविण्याची स्वप्ने पडत आहेत. त्यासाठी शिवसेनेशी आपला कधी घटस्फोट होईल याची त्यांना घाई झाली आहे. परंतु शिवसेनेला आपल्या ताकदीची कल्पना आहे. त्यामुळे ते केवळ युती तोडण्याची वरवर धमकी देतात. परंतु प्रत्यक्षात युती त्यांची मानहानी करुनही तोडत नाहीत अशी स्थिती आहे. मात्र आता बहुदा शिवसेना नेतृत्वावर आपणही एकला जाण्याचा नारा घ्यावा यासाठी दबाव वाढत असावा. निदान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अलिकडच्या विधानांवरपुन दिसते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पाश्वभूमीवर ठाकरे यांनी पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, प्रतोदांची बैठक मातोश्री निवासस्थानी बोलाविली होती. यावेळी ठाकरे यांनी नेत्यांची मते जाणून घेतली. भाजपने ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना संपविण्याचा प्रयत्न केला, पण ते पुरून उरले. तामिळनाडूत जयललिता तुरुंगात जाऊन आल्या, सध्या त्या आजारी आहेत, तरी त्यांच्या पक्षात एकजूट आहे. बिहारमध्ये लालूंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तरी जनतेने त्यांना निवडून दिले. मग आपणही काही कमी नाही. त्यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी ठेवून मित्रालाही हरविण्याची जिद्द ठेवावी, अशी भूमिका ठाकरे यांनी नेत्यांसमोर मांडल्याचे समजते. सरकार भाजपच्या नेतृत्वाखाली असल्याने त्यांच्याकडून सन्मानपूर्वक प्रस्ताव आल्यास विचार केला जाईल. युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार नाही. युतीच्या चर्चेसाठी भाजपने नेत्यांची नियुक्ती करावी व त्यांनी शिवसेनेशी बोलावे, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली आहे. निवडणुका स्वबळावर लढल्यास त्याचा फटका भाजपला बसण्याची भीती असल्याने त्यांच्याकडूनच युतीचा प्रस्ताव येईल, असे शिवसेनेला अपेक्षित आहे. मात्र भाजपा शिवसेनेला काही जुमानत नाही. फक्त युती झाली पाहिजे, एवढेच बोलते. परंतु प्रत्यक्षात युती तुटावी यासाठीच हालचाली करते आहे. अशा वेळी शिवसेना दोन दगडावर पाय ठेवून उभी आहे. कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. ठाकरे स्वबळाची भाषा करतात तर दुसरीकडे युती व्हावी यासाठी चर्चेला पुढे या असेही म्हणतात. मात्र भाजपाला हा घटस्फोट पाहिजेच आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय जिल्हा पातळीवरच घ्यावा. शक्य होतच नसेल, तर युती करू नका. शिवसेनेला पराभूत करण्याचे नव्हे, तर भाजपला निवडून आणण्याचे आपले लक्ष्य आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे यावेळी युती होणार नाही अशीच चिन्हे आहेत. परंतु शिवसेना शेवटपर्यंत त्यांना विजयाची खात्री नसल्यामुळे स्वबळावर जाण्याचे धारिष्ट्य करु पहात नाही. तर भाजपाला अतिविश्‍वास आहे. केंद्रानंतर राज्यात सत्ता आल्यावर नगरपालिकांपर्यंत ही सत्ता झिरपावी असा त्यांचा कयास आहे. ते शक्य होणार नाही हे खरे असले तरी त्यांना युती तोडायची आहे हे नक्की.

0 Response to "विभक्ततेच्या वाटेवर..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel