-->
एक अनोखा महोत्सव

एक अनोखा महोत्सव

संपादकीय पान शनिवार दि. २२ ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
एक अनोखा महोत्सव
आपल्याकडे विविध प्रकारचे महोत्सव भरतात. आता महोत्सवाचा हंगाम सुरु झाला आहे. मात्र यंदा आगळा वेगळा महोत्सव तळकोकणात आयोजित करण्यात आला आहे. आंबोलीत २१, २२, २३ ऑक्टोबर रोजी फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जैव विविधतेच्या दृष्टीने संपन्न असलेल्या आंबोलीत आतापर्यंत २०४ हून अधिक प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद फुलपाखरू अभ्यासक हेमंत ओगले यांनी केली आहे. ही संख्या आज महाराष्ट्रात सर्वात अधिक आहे व त्यात अनेक दुर्मीळ प्रजातींचा समावेश आहे. यात दक्षिणेत सापडणार्‍या फुलपाखरांच्या प्रजातींची पहिल्यांदाच महाराष्ट्रात नोंद आंबोलीतून झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर व मार्च-एप्रिल या महिन्यात विशेषत: फुलपाखरांचा वावर जास्त असतो. त्या अनुषंगाने पर्यावरणपूरक पर्यटनाच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. या महोत्सवात  फुलपाखरू संवर्धन व जनजागृती यावर मुख्य भर दिला जाणार आहे. यात फुलपाखरू उद्यान निर्मितीबद्दल व त्यामागचे वनस्पतीशास्त्राची माहिती देण्यात येणार आहे, तसेच फुलपाखरू व पतंगांच्या जीवन, अधिवास, खाद्य व पर्यावरणबद्दल अभ्यास चर्चा होणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आंबोलीतील लहान किटकांपासून मोठया प्राण्यांबाबतीतील जैव विविधतेचे व पर्यावरण अधिवासाचे महत्त्व अधोरेखित होऊन त्याच्या संवर्धनास मदत होईल. बेळवई उडपी येथील मोठया व्यावसायिक फुलपाखरू उद्यानाचे संचालक, संमेलन शेट्टी व ओवळेकरवाडी येथील महाराष्ट्रातील पहिल्या फुलपाखरू उद्यानाचे निर्माते राजेंद्र ओवळेकर हे दोघे फुलपाखरू उद्याननिर्मितीबद्दल मार्गदर्शन करतील तर गोव्याच्या फुलपाखरांच्या पुस्तकांचे लेखक व गोवा जैवविविधता मंडळाचे सदस्य पराग रांगणेकर हे फुलपाखरांविषयीच्या विविध पैलूंवर बोलतील. प्रख्यात कीटक अभ्यासक डॉ. अमोल पटवर्धन कीटकांच्या वैशिष्टयपूर्ण जगाची माहिती देतील. कोल्हापूर वन्यजीव विभागाचे मानद वन्यजीव रक्षक, रमण कुलकर्णी संवेदनशीलपणे फुलपाखरांचे छायाचित्रण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करतील. डॉ. मिलिंद भाकरे त्यांच्या फुलपाखरू अभ्यासांचे अनुभव व उद्यानाबद्दल माहिती देतील. आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जैव विविधतेचा अभ्यास फारसा करीत नाही. त्यासाठी तरुणांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. यातून पर्यटनाला हातभार तर लागेलच शिवाय एक अनोखा प्रकल्प हाती घेता येईल.
-------------------------------------------------------------------

0 Response to "एक अनोखा महोत्सव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel