-->
संपादकीय पान गुरुवार दि. ३ जुलै २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
सोशल नेटवर्किंगच्या प्रणेत्याचा अखेरचा रामराम!
----------------------------------
जग हे झपाट्याने बदलत चालले आहे. जगातील तंत्रज्ञान हे वेग घेत आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग एवढा जबरदस्त आहे की, कालची गोष्ट आता आज जुनी ठरु शकेल. सोशल नेटवकिर्ंंग सुरु करुन जगात एका नव्या क्रांतीची पहाट करणार्‍या ऑर्कुटला तंत्रज्ञानाने मागे टाकले आणि त्याला जगाचा निरोप घ्यावा लागला आहे. केवळ दहा वर्षात या सोशल नेटवर्किंग साईटने रामराम म्हणावा आणि त्यानंतर आलेल्या सोशल नेटवर्किंग साईट त्यांच्यापेक्षा झपाट्याने पुढे जाव्यात हे काहीसे अजब वाटणारे आहे. पण हे सत्य आहे. फेसबुक, ट्विटर आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्समुळे मागे पडलेले ऑर्कुट बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला. १० वर्षांपूर्वी गुगलने ऑर्कुट ही सोशल नेटवर्किंग साईट आणून इंटरनेट विश्वात नवी क्रांतीच घडवली. अवघ्या काही वर्षांतच ऑर्कुट जगभरात लोकप्रिय झाले. मात्र गेल्या काही वर्षांपासून फेसबुक, ट्विटर यासारख्या साईट्सने ऑर्कुटला मागे टाकले. २०११ मध्ये गुगलने गुगल प्लस ही नवी सोशल नेटवर्किंग सुविधा सुरु केली त्यावेळीच ऑर्कुट बंद होणार असे संकेत देण्यात आले होते. सोमवारी गुगलचे डायरेक्टर पॉलो गोल्घेर यांनी अधिकृतपणे ऑर्कुट बंद करण्याची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०१४ पासून ही सुविधा बंद करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. भविष्यात गुगल प्लस, युट्यूब यावर भर देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पूर्वी मोबाईल येण्याच्या अगोदर पेजर आपल्याकडे होते. हे पेजर म्हणजे एस.एम.एस.चाच प्रकार होता. परंतु मोबाईल बाजारात आल्यावर हे पेजर कालबाह्य झाले आणि एका वर्षातच गायब झाले. तंत्रज्ञानाचे असेच आहे. हीच आफत फेसबूकवरही येण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. फेसबुक जेव्हा सुरू झाले तेव्हा त्याचा उद्देश जगाच्या कानाकोपर्‍याात राहणार्‍यांनी ज्ञात-अज्ञाताशी ओळख करावी व संवाद करावा असा होता. हा मीडिया सार्वजनिक जीवन किंवा व्यक्तिगत जीवनातील घटनांचे आदानप्रदान करत असला तरी या माध्यमातील व्यक्तींचे खासगीपण जपण्याला सर्वेच्च प्राधान्य दिले जाईल, असे आश्‍वासन वेळोवेळी फेसबुक देते. पण प्रत्यक्षात तसे होतेच असे नाही. फेसबुकने २०१२ मध्ये सुमारे सात लाख युजरना अंधारात ठेवून त्यांच्या भावभावनांचा मोठा डेटाबेस युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया व कॉर्नेल युनिव्हर्सिटीला अभ्यासासाठी दिला. हा डेटाबेस म्हणजे खोट्या न्यूजफीडवर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया होत्या. अर्थात याची वाच्यता  झाल्यानंतर फेसबुकवर जगभरातून जोरदार टीका झाली व युजरच्या संमतीविना त्याच्या खासगी जीवनात हस्तक्षेप केल्याबद्दलही लोकांनी संतापही व्यक्त केला. लोकांची ही तीव्र प्रतिक्रिया पाहून फेसबुकला या प्रकरणी माफी मागावी लागली. पण या घटनेच्या निमित्ताने सोशल मीडियातील खासगीपण व लोकांचा बदलणारा मूड हा मुद्दा पुन्हा चर्चेस आला आहे. सोशल मीडियाचा अभ्यास करणार्‍यांच्या मते फेसबुक हे लोकांच्या मूडवर हेलकावे खाणारे माध्यम असल्याने या माध्यमात येणार्‍या सकारात्मक व नकारात्मक माहितीद्वारे लोकांच्या भावभावनांचा अभ्यास करता येऊ शकतो. सोशल मीडियात भावभावनांचा संसर्ग वेगाने पसरतो हे काही नवे नाही. लोक कोणताही सारासार विचार न करता या मीडियातील व्यक्त होणार्‍या कोणत्याही भावनांच्या डोहात स्वत:ला झोकून देत असतात. पण मुद्दा भावभावनांचा अभ्यास करण्यापुरता मर्यादित नाही तर या मीडियात खासगीपण खरोखरीच जपले जाते का, हा आहे. फेसबुकने जर हे खासगीपण पुढील काळात जपले नाही तर त्याचाही लोकांना विट येऊल व त्याचे महत्व कमी होत जाईल. त्यामुळे फेसबुककर्त्यांना आता भविष्यात आपला ग्राहक टिकविणे त्याला सातत्याने काही ना काही तरी नाविण्यपूर्ण बाबी देणे हे एक मोठे आव्हान ठरणार आहे.
--------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel