
संपादकीय पान बुधवार दि. २ जुलै २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
मुंबई महानगरपालिकेत
पुन्हा लाल बावटा!
-----------------------------------
मुंबई महानगरपालिकेच्या चित्ता कॅम्प या प्रभागातून झालेल्या पोटनिवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार खैरुनिसा हुसैन या विजयी झाल्या आहेत. अशा प्रकारे शेकापच्या लाल बावट्याने मुंबई महानगरपालिकेत प्रवेश केला आहे. मुंबई महानगरपालिकेत गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत लाल बावट्याचा एकही नगरसेवक निवडून आला नव्हता. ऐकेकाळी मुंबई शहर हलवून सोडणार्या लाल बावट्याचे प्रतिनिधीत्व करणारा एकही सदस्य मुंबई महानगरपालिकेत नसणे ही कष्टकर्यांसाठी शरमेची बाब होती. दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचा एकही सदस्य निवडून न येण्याची मुंबई महानगरपालिकेतील आजवरच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ होती. असे असताना आता मात्र झालेल्या पोटनिवडणुकीत शेकापच्या उमेदवाराचा प्रचंड मतांनी विजय झाल्याने देशातील सर्वात मोठ्या असलेल्या या महापालिकेत लाल बावट्याचा प्रवेश होणे ही महाराष्ट्रातील पुरोगामी शक्ती मजबूत होत असल्याचे निदर्शक म्हणावे लागेल. अणुशक्ती नगर या विधानसभा मतदारसंघातील चित्ता कॅम्प या प्रभाग क्रमांक १३५ मधील अपक्ष नगरसेविका अनिसा बी यांच्या निधनामुळे झालेल्या या पोटनिवडणुकीत शेकापच्या उमेदवार खैरुनिसा हुसैन यांनी तब्बल ४५९३ मतांनी दणदणीत विजय मिळविला. चित्ता कॅम्प हा विभाग मुस्लिमबहुल असून येथे प्रामुख्याने मुंबईतील विविध प्रकल्पातील निर्वासितांची स्थापन करण्यात आलेली वस्ती आहे. मुंबईसारख्या मायानगरीत गरिबी काय असते याचे दर्शन या प्रभागात होऊ शकते. खर्या अर्थाने कामगार, कष्टकरी यांची वसाहत असलेल्या भागातून शेकापचा उमेदवार आणिती ही मुस्लिम महिला उमेदवार विजयी होणे याला विशेष महत्व आहे. मुंबईत पक्ष वाढण्यासाठी शेकापचे आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रयत्न गेले वर्षभर सुरु होते. आमदार विवेक पाटील यांच्या या प्रयत्नांना आता पहिले फळ या विजयामुळे लाभले आहे असे म्हणता येईल. मुंबईचा चेहरा मोहरा गेल्या दोन दशकात झपाट्याने बदलला आहे. एकेकाळी कष्टकर्यांची मुंबई असे जे चित्र होते ते आता झपाट्याने बदललेे. प्रामुख्याने गिरणी कामगार हा मुंबईचा कणा होता. डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली १९८१ साली झालेल्या बेमुदत संपातून गिरणी कामगार संपुष्टात येण्याची प्रक्रिया सुरु झाली. हा कामगार देशोधडीला लागला. गिरणी कामगाराने आपल्या कष्टातून गिरण्यातून सोन्याची धूर ओकला आणि भांडवलदारांनी या गिरण्यातून कमविलेला फायदा अन्य उद्योगात म्हणजे रसायन, अभियांत्रिकी या जास्त नफा मिळवून देणार्या उद्योगात गुंतविला. मुंबईत व परिसरात सुरु झालेल्या या रसायन व अभियांत्रिकी उद्योगातील कामगारांना गिरणी कामगारांपेक्षा जास्त पगार मिळू लागले. त्यामुळे गिरणी कामगारांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी डॉ. दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली संप पुकारला खरा मात्र त्याचवेळी गिरणी मालकांनी गिरण्यांना टाळे लावणे पसंत केले. कारण त्यावेळी मुंबईतील जागांना सोन्याचा भाव येऊ लागला होता. यात एकेकाळचा क्रांतीकारी असलेला गिरणी कामगार भरडला जाऊन अखेर मुबंईतून हद्दपार झाला. मुंबई ही कष्टकर्यांची राजधानी होती. गावाकडील लोकांना हक्काचे रोजगार मिळवून देणारी मुंबई होती, आजही आहेच. मुंबईची लोकसंख्या आता सव्वा कोटींच्या घरात गेली असली तरीही त्यातील ७० टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टीत राहाते. त्यामुळे आज मुंबईत झगमगणारे आपल्याला टॉवर्स दिसले तरीही कामगार, कष्टकर्यांची मुंबई आहे ती झोपटपट्टीतच आहे. गावाला दुष्काळ पडला किंवा कोणतेही संकट आले तरी ही मुंबई कष्टकर्यांना आपल्यात सामावून घेते. गिरणी संपानंतर मुंबईच काय किंवा एकूणच कामगार चळवळ संपुष्टात आली असल्याचे चित्र दिसत असले तरीही येथील कामगार, कष्टकर्यांचे प्रश्न काही राज्यकर्त्यांनी सोडविलेले नाहीत. केवळ मराठीचा झेंडा खांद्यावर घेऊन या शहराचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी मुंबईचा नियोजनबध्द विकास करण्याची आवश्यकता आहे. मुंबईत हक्काचे घर घ्यावयाचे म्हणजे कोट्यावधी रुपये आता मोजावे लागतात. मात्र अजूनही येथेे कष्टकर्यांसाठी निवासी योजना उभारली जाऊ शकते. सर्वसामान्य लोकांना कमी किंमतीत घरे मिळावीत यासाठी राज्याच्या निर्मितीनंतर म्हाडाची स्थापना झाली. मात्र सरकारने खासगी बिल्डरांच्या हिताचा विचार केल्याने म्हाडाच्या उदिष्टांनाच हरताळ फासला गेला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्कृष्टरित्या उभारुन मुंबईतील रस्त्यावरील गर्दी कमी करता येऊ शकते. त्यासाठी मेट्रो रेल्वेचा केलेला मार्ग योग्च आहे. मात्र या मेट्रोच्या चाव्या अंबानींच्या हातात दिल्याने सर्वसामान्यांना ही सेवा परवडणारी नाही. मुंबईसारख्या महानगरात आज झोपडपट्टीचा प्रश्न संपवायचा असेल तर सुरु करण्यात आलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन योजनेतील भ्रष्टाचार संपवावा लागेल. आजचे मुंबईचे स्वरुप हे पैसेवाल्यांची मुंबापुरी असे होत चालले आहे. मुंबईत ज्याच्याकडे पैसा आहे तोच सुखाने जगू शकतो, हक्काचे घर घेऊ शकतो, असे आहे. मुंबई ही कष्टकर्यांची आहे आणि तिच्यावरील ही मालकी सिध्द करण्यासाठी कामगार, कष्टकर्यांच्या फायद्याचे राजकारण करण्याची आवश्यकता आहे. मुंबईचे हे रुप पालटण्याची सुरुवात चित्ता कॅम्पमधील या निवडणुकीच्या निकालाने झाली आहे असे म्हणावयास हरकत नाही. मुंबईत या निवडणुकीच्या निमित्ताने कष्टकर्यांचा प्रतिनिधी या देशाच्या आर्थिक राजधानीला मिळाला आहे. जात, धर्म, पंथ, प्रादेशिकता याच्या पलिकडे जाऊन केवळ कष्टकर्यांचे राजकारण आज करण्याची गरज आहे, आणि त्याचे प्रतिनिधीत्व शेकापचा महापालिकेतील हा शिलेदार करील असा आम्हाला विश्वास वाटतो.
-----------------------------------
-------------------------------------------
मुंबई महानगरपालिकेत
पुन्हा लाल बावटा!
-----------------------------------
-----------------------------------
0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा