-->
संपादकीय पान बुधवार दि. २ जुलै २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
उपग्रह प्रक्षेपणातील एक महत्वाचा टप्पा
---------------------------
भारताने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने आपल्या पूर्णपणे भारतीय बनावटीच्या पीएसएलव्ही या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे एकाच वेळी पाच उपग्रह यशस्वीरित्या अवकाशात सोडून एक महत्वाचा पल्ला गाठला आहे. भारताने १९७५ मध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह रशियन अग्निबाणाच्या मदतीने अवकाशात सोडला. त्यानंतर, स्वयंपूर्णतेकडे झेप घेत चांद्र व मंगळ मोहिमेसह तब्बल १०० अंतराळ यशस्वी मोहिमा केल्या आहेत. त्यात ३५ उपग्रह आजवर अवकाशात सोडले असून त्यातून आपल्याला परकीय चलन मिळाले आहे. कारण ज्या देशांना उपग्रह पाहिजे आहे त्यांच्याकडे ते अवकाशात सोडण्याचे अग्निबाणाचे तंत्रज्ञान अवगत नाही, अशा देशांना भारताने मदतीचा हात दिला आहे. पीएसएलव्हीच्या साह्याने १९९९ मध्ये उपग्रह अवकाशात झेपावण्यास आपण सुरवात केली. आत्तापर्यंत, पीएसएलव्हीकडून ३५ विदेशी उपग्रह अंतराळात सोडले. सोमवारच्या उड्डाणानंतर ही संख्या चाळीसवर पोहोचली आहे. अशा प्रकारे श्रीहरीकोटा येथे स्थापन झालेले हे इस्त्रोचे रोपटे आता बरेच मोठे झाले आहे आणि भविष्यात ते याहून मोठे होणार आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी सोमवारी पाच विदेशी उपग्रहांचे आपल्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे (पीएसएलव्ही-सी २३) अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले आणि या सर्व उपग्रहांना त्यांच्या नियोजित कक्षांमध्ये सोडले. अवकाशात असणारा कचरा प्रक्षेपणाच्या मार्गात येण्याची शक्यता असल्याने इस्रोने तीन मिनीट उशिराने प्रक्षेपण घेण्याचा निर्णय घेतला होता. पीएसएलव्ही सी-२३ द्वारे फ्रान्सच्या स्पॉट- ७ या ७१४ किलो वजनाच्या उपग्रहासह जर्मनीचा १४ किलोचा एआय सॅट, प्रत्येकी १५ किलोंचे कॅनडाचे एनएलएस ७.१ व एनएलएस ७.२ हे दोन उपग्रह आणि सिंगापूरचा ७ किलोंचा व्हेलॉक्स-१ असे पाच उपग्रह सोडण्यात आले. इस्रोने आजपर्यंत १९ देशांचे ३५ उपग्रह अवकाशात सोडले आहेत. या देशांमध्ये अल्जेरिया, अर्जेंटिना, बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इस्राईल, इटली, जपान, कोरिया, लक्झेनबर्ग, सिंगापूर, स्वित्झर्लंड, नेदरलँड्‌स, तुर्कस्तान आणि ब्रिटन यांचा समावेश आहे. ज्या देशाकडून आपल्याला स्वातंत्र मिळाले त्या ब्रिटनकडेही उपग्रह अवकाशात सोडण्याचे तंत्रज्ञान नाही. त्यामुळे त्यांचाही आपण उपग्रह यापूर्वी अवकाशात सोडला ही देखील एक मोठी अभिमानाची बाब ठरावी. भारतीय उपखंडातील विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान मोदी यांनी इस्रोला सार्क देशांसाठी उपग्रह तयार करण्यास सांगितलेे. हा उपग्रह आपल्या शेजारील देशांना भारताकडून भेट असेल, असे मोदी या वेळी म्हणाले. भारताने उपनिषद ते उपग्रह अशी प्रगती केली आहे. आता ये दिल मांगे मोर असे म्हणत सार्क उपग्रह तयार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. या उपग्रहाद्वारे मिळणार्‍या सेवांचा भारताच्या शेजारील देशांना फायदा होण्याच्या दृष्टीने तो तयार करण्यास मोदींनी शास्त्रज्ञांना सांगितले. या उपग्रहाचा उपयोग सार्क देशांना गरिबी आणि निरक्षरता या समस्यांवर मात करण्यासाठी होईल, तसेच या देशांमधील युवकांनाही नव्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करता येतील, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी जे म्हणाले ते खरेच आहे. कारण उपग्रहामुळे आपल्याला दळणवळण सहज व सुलभ करता येते. एकदा का तुमचे दळणवळण सुधारले की, तुम्ही विकासाची गंगा आपल्या दारी वेगाने आणू शकता. कोणत्याही वादळाचा आगावू सुचना आपल्याला याच उपग्रहांच्या मदतीने मिळून आपण आपली हानी वाचवू शकतो. यातून मनुष्याला आपला विकास साधणे शक्य होणार आहे. इस्त्रोने हातात घेतलेली आणखी एक महत्वाची योजना म्हणजे मंगळावरची स्वारी. सुमारे सात कोटी ३० लाख डॉलर खर्चाची ही मोहीम यशस्वी झाल्यास मंगळावर पोहोचणारा भारत हा आशियातील पहिला देश ठरेल. आपल्यासारख्या गरीब देशाने हा खर्च करावयाचा का असा प्रश्‍न उपस्थित होतो. परंतु इस्त्रोच्या या सर्व मोहिमा विकासाला हातभार लावणार्‍याच आहेत.
----------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel