-->
मुंबईतील श्रीमंती

मुंबईतील श्रीमंती

संपादकीय पान सोमवार दि. २४ ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मुंबईतील श्रीमंती
भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर देशातील सर्वांत श्रीमंत शहर असून, जगातील १४ व्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे. मुंबईतील लोकांकडे एकूण ५५ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. या महानगरात ४५,००० कोट्यधीश आणि २८ अब्जाधीश राहतात. यानंतर या श्रीमंतीत दिल्ली दुसरे तर बंगळुरू तिसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे. न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार दाखविण्यात आलेली ही एकूण संपत्ती म्हणजे शहरात राहणार्‍या लोकांची खासगी संपत्ती गृहीत धरण्यात आली आहे. यात त्यांची सर्व संपत्ती, रोख, शेअर बाजारातील गुंतवणूक इत्यादींचा समावेश आहे. यातून देणी वगळण्यात आली असून सरकारी निधी वेगळा ठेवण्यात आला आहे. अहवालानुसार, येत्या दहा वर्षांत भारतात रिअल इस्टेट, वित्तीय सेवा, आयटी, स्वास्थ्य, मीडिया या क्षेत्रांत चांगली वृद्धी होईल. नफाही वाढेल. देशातील चार महानगरांपैकी फक्त चेन्नईचा टॉप-पाच श्रीमंत शहरांत समावेश नाही. हे शहर सातव्या स्थानी आहे. येथील लोकांपेक्षा अधिक संपत्ती पुण्यातील लोक बाळगून आहेत. मात्र, चेन्नईत २,३०० कोट्यधीश अधिक आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या शहरातील आघाडीच्या पाच शहरात लंडन, न्यूयॉर्क, टोकियो, सॅनफ्रान्सिको व बिजींग ही शहरे आहेत. यात अमेरिकेतील दोन शहरे आहेत तर चीन या आशियाई देशातील एक शहर आहे. मुदंबईचा या श्रीमंतीत १४ वा क्रमांक लागत असला तरी आपल्या देशातील एकूण गरीबी पाहता मुंबईत बहुतांशी श्रीमंती केंद्रीत झाली आहे असे म्हणता येईल. आपल्याकडे १२० कोटी लोकसंख्येपैकी सुमारे दोन टक्के लोक गर्भश्रीमंत आहेत असे म्हटले जाते. म्हणजे लोकसंख्येचा विचार करता अडीज कोटींच्या घरात देशातील श्रीमंतांची लोकसंख्या जाते. त्यातील ४५ हजार कोट्याधीस मुंबईत राहातात. सुमारे सव्वा कोटी लोकंसख्या असलेल्या मुंबईत ७० टक्के जनता ही झोपडपट्टीत राहाते. आज मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात झोपडपट्टीवासीयांचे वर्चस्व आहे. या लोकांना एकीकडे किमान गरजा मिळत नाहीत तर दुसरीकडे मुंबईतील हे कोट्याधीश लोक आलिशानपणाने राहातात, हा विरोधाभास आपल्याकडे बघावयास मिळतो. देशात जे श्रीमंत आहेत त्यांचा हेवा करण्याचे कारण नाही, मात्र आपण उदारीकरणानंतर ज्या झपाट्याने गरीबी करावयास निघालो होतो ते काही साध्य झालेले नाही. जगात नजर टाकल्यास विकसीत देशातही गरीबी आहे, मात्र तेथील गरीबीचे स्वरुप वेगळे आहे. आपल्याकडे गरीबांचा जो निचतम स्थर आहे तेवढा विकसीत देशातील गरीबांचा नाही. आपल्याकेडील गरीबीचा स्थर जरी उंचावला तरी हे गरीब दोन वेळ पुरेसे जेवू शकतील. मात्र स्वातंत्र्यांच्या सात दशकांनंतरही आपण गरीबी हद्दपार करु शकलेलो नाही. आपल्याकडील श्रीमंतांचे स्वागत करीत असताना देशातीची गरीबीची खंत व्यक्त करावी लागतेच, कारण हे आपल्याकडील वास्तव आहे.

0 Response to "मुंबईतील श्रीमंती"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel