-->
संपादकीय पान--चिंतन--११ नोव्हेंबर २०१३च्या अंकासाठी--  
-------------------------------------
जुन्या कार्टुन पुस्तकांना सुवर्णमूल्य
--------------------------
सध्याच्या काळात कोणत्या वस्तुला कधीही सुवर्णमूल्य प्राप्त होईल हे सांगता येत नाही. १९४७ साली स्वातंत्र्यमिळाले त्यावेळी १०० रुपयांनी सोने ज्यांनी खरेदी केले त्यांना आज सोन्याचा दर ३० हजारांवर मिळत आहे. परंतु याहून सर्वात झपाट्याने किंमत येते ती चांगल्या चित्रांना. नामवंत चित्रकारांची चित्रे काही वर्षात लाखो व कधीकधी करोडो रुपये देऊन जातात. परंतु एकाद्या जुन्या पुस्तकांनाही असो सुवर्णमूल्य मिळते असे म्हटल्यास कुणाला पटणार नाही. मात्र ही वस्तुस्थिती आहे. १९६०च्या दशकात जी कार्टुन्सची लहान मुलांची पुस्तके ६० पैशाला मिळत होती आज त्या पुस्तकांना ७० हजार रुपयांचे मूल्य मिळत आहे. पूर्वीच्या काळी लोकप्रिय असलेली लहान मुलांची कार्टुन्सची मासिके सध्या ऑनलाईन खरेदी करण्याची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे आणि यातूनच त्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. १९६०च्या दरम्यान टी.व्ही. नव्हते की मोबाईल, त्यामुळे मुलांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी विविध प्रकारची माहिती देणारी तसेच कथा चित्ररुपाने सांगणारी पुस्तके हे एक मोठे साधन होते. अशा या साठीच्या काळात मुलांच्या पुस्तकांना चांगलीच मागणी होती. त्याकाळी त्यांची लोकप्रियता अफाट असल्याने ही पुस्तके किंवा लहान मुलांची मासिके तुफान खपत होती. खरे तर आता यातील काही पुस्तके प्रकाशित होतात परंतु जुनी प्रकाशित झालेली मासिके खरेदी करण्याकडे लोकांचा कल आहे. त्यामुळे त्याकाळी प्रकाशित झालेली इंद्रजाल, अमर चित्र कथा, व्टिंकल, चांदोबा, चित्र भारती कथामाला यांच्या जुन्या आवृत्या खरेदी करण्यात अनेक जण उत्सुक आहेत. अमेरिकेत देखील अशा प्रकारे जुनी पुस्तके संग्रही ठेवण्यात अनेकांना उत्साह असतो. आता हा कल आपल्याकडे आला आहे. अमेरिकेत २०११ साली अशाच एका ऑनलाईन लिलावात सुपरमॅनच्या पुस्तकाला २,६१,००० डॉलर आले होते. आता हा कल आपल्याकडे आला आहे. बंगलोरस्थित एका इतिहासाचे शिक्षक व ग्राफिक्सचे संग्राहक अरुण कुमार यांचे असेच एक कार्टुनचे पुस्तक ७० हजार रुपयांना विकत गेले. त्यांच्याकडे अशा प्रकारे अमूल्य १५ हजार पुस्तकांचा ठेवा आहे. आज या पुस्तकांचे मूल्य सुमारे १.७ कोटी रुपयांवर जाते. मुलांच्या पुस्तकाचे जग हे पूर्वीपासून खूप मोठे होते. त्याची एक मोठी बाजारपेठ पूर्वीपासून आपल्याकडे होती व आजही आहे. आता या बाजारपेठेला ऑनलाईनचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सध्या ऑनलाईन पुस्तके विकाणार्‍यांची मोठी चंगळ झाली आहे. एक मोठा ग्राहक त्यांना उपलब्ध झाला आहे. खरे तर हा ग्राहक पूर्वीपासूनच होता मात्र आता ऑनलाईन कंपन्यांनी ही बाजारपेठ बरोबर ओळखून या पुस्तकांची विक्री वाढविली आहे. सध्या मुलांची केवळ पुस्तकाची नव्हे तर मुलांच्या कोणत्याही वस्तूंची बाजारपेठ झपाट्याने विस्तारली आहे. कार्टुन फिल्म ही मुलांमध्ये सध्या फार लोकप्रिय झाली आहेत. मुलांसाठी खास चॅनेल्सही सुरु करण्यात आली आहेत ती मुलांमध्ये लोकप्रियही झाली आहेत. असे असताना मुलांची पुस्तकेही वाचण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे मुले फक्त कार्टुन फिल्म पहातात हा समज खोटा ठरतो. त्यामुळे सध्याची मुले कार्टुन फिल्म चॅनेल्सवर पाहत असताना दुसरीकडे कार्टुन्सची पुस्तकेही वाचत आहेत हे चांगले आहे. त्यात जुन्या पुस्तकांची मागणी वाढल्याने त्यांना सोन्याची किंमत आली आहे, हे तर त्याहून जास्त स्वागतार्ह ठरावे.
---------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel