-->
चौपदरीकरणाला वेग द्या

चौपदरीकरणाला वेग द्या

संपादकीय पान शनिवार दि. १२ सप्टेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
चौपदरीकरणाला वेग द्या
गणपती येण्यास आता जेमतेम सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. कोकणातील चाकरमणी दरवर्षी प्रमाणे यंदाही आपल्या गावचे रस्ते आता पकडून गणपतीच्या आगमनासाठी सज्ज झाला आहे. येत्या तीन दिवसात मुंबई-गोवा महामार्ग आता गर्दीने फुलून जाण्यास सुरुवात होईल. गणमतीच्या आदल्या दिवशी तर गर्दीचा उच्चांग गाठला जाईल व सध्या खड्याने त्रस्त असलेल्या या रस्त्यांवर आणखी ताण येईल. दरवर्षी बिचारा कोकणी माणूस आपल्या गणरायाच्या स्वागतासाठी याच खड्यातून आपल्या गावी जातो. कोकण रेल्वे सुरु होऊन आता दोन दशकांहून जास्त काळ लोटला असला तरीही त्याला रेल्वेचा फारसा उपयोग होत नाही व शेवटी त्याला खड्याच्या रस्त्यांचाच गावी जाण्यासाठी आसरा घ्यावा लागतो. सरकारने या रस्त्यांची पुरेशा डागडुजी अजूनही केलेली नाही, त्यामुळे आता पुढील काही दिवसात तरी काय दुरुस्ती होणार असा प्रश्‍नच आहे. यंदाचे वर्ष तरी चाकरमन्यांना खड्यातच प्रवास करावा लागणार हे नक्की. मात्र पुढील वर्षी तरी रस्त्याचे काम मार्गी लागल्यास काही प्रवास तरी सुखकारक होईल अशी अपेक्षा आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच मुंबईत एक बैठक बोलाविली होती. यात त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झपाट्याने करु असे आश्‍वासन दिले आहे. रायगड जिल्ह्यातील या महामार्गाचे कामकाज झपाट्याने सुरु होईल कारण येथील बहुतांशी जमीन यापूर्वीच सरकारने ताब्यात घेऊन काम सुरुही केले होते. सध्या हे काम थांबले असले तरी ते पुन्हा लवकरच सुरु होईल अशी अपेक्षा आहे. अशा स्थितीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र दुपदरीकरणाला काही जणांनी विरोध केला आहे. अर्थात हा विरोध विरोधासाठी विरोध नाही. तर शेतकर्‍यांचे काही प्रश्‍न आहेत. ते सोडवावे लागणार आहेत. महामार्ग चौपदरी करताना ज्यांची जमीन सरकार खरेदी करणार आहे, ज्यांची दुकाने जाणार आहेत, ज्यांच्या वर्षानुवर्षाच्या व्यवसायावर गदा येणार आहे, अशा रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंच्या हजारो नागरिकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. यासाठी ग्रामस्थांच्या मनात ज्या शंका आहेत त्याचे निकारण करण्याची आवश्यकता आहे. ५०० किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे चौपदरीकरण करताना अनेक अडचणी येणार आहेत, हे मान्य आहे. परंतु चर्चेने अनेक प्रश्‍न सुटू शकतात. कोणत्याही विभागाचा विकास नको, अशी भूमिका कोणालाही घेता येणार नाही पण ग्रामस्थांच्या सर्व प्रश्नांचे निराकरण, त्यांच्या शंकांचे समाधान, सरकार ताब्यात घेणार्‍या जमिनींना मिळणारा योग्य भाव आणि ज्यांचे व्यवसाय नष्ट होणार आहेत त्यांना व्यवसायासाठी पर्यायी जागा या चार मुद्यांवर चर्चा करून सर्वाना मान्य होईल, असा प्रस्ताव तयार करणे,याबाबत सरकारने विचार करण्याची आवश्यकता आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाले पाहिजे, याबद्दल कोणाचेही दुमत नाही. गेल्या दहा वर्षातील या मार्गावरील वाढलेली वाहतूक चौपदरीकरणाशिवाय सुलभ होणार नाही. तसेच या महामार्गावर होत असलेल्या अपघातांचे प्रमाण पाहता चौपदरीकरण ही काळाची गरज आहे. कोकणातील नैसर्गिक परिस्थितीमुळे, विविध घाटांमुळे, अरुंद वळणांमुळे हा मार्ग धोक्याचाही आहे. चौपदरीकरणामुळे वाहतूक दुतर्फा होईल. वळणे रुंद होतील. जो कठीण घाट आहे तो तोडला जाईल व मुंबई-गोवा हा प्रवास बराचसा सुखकारक होईल. जुना असलेला मुंबई-गोवा महामार्ग हा राज्यातील हा सगळयात जुना महामार्ग. १९५२ साली बाळासाहेब देसाई सार्वजनिक बांधकाममंत्री असताना त्यांनी या रस्त्याचा प्रकल्प तयार केला आणि त्याला मंजुरी दिली. त्यावेळी ३५० मैलाचा हा महामार्ग होता आणि तो सिमेंट कॉंक्रीटचा होता. मुंबई-पुणे महामार्ग असो किंवा मुंबई-बंगलोर महामार्ग हे केव्हाच चौपदरी झाले आहेत. खरे तर यापूर्वीच मुंबई-गोवा हा माहामार्ग चौपदरी व्हायला पाहिजे होता. कोकण रेल्वे सुरु झाली तरीही या मार्गावरील वाहतुकीचा बोजा काही कमी झालेला नाही. त्यामुळे हा रस्ता तातडीने मार्गी लागणे गरजेचे आहे. तसेच अर्धवट झालेला कोकणातील सागरी माहामार्गही तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. यामुळे कोकणाचे चित्र पालटू शकते. पर्यटन हा कोकण व गोव्याचा कणा ठरीत आहे. हा कणा जर मजबूत करावयाचा असेल तर रस्ता हा उत्तम असण्याची गरज आहे. सर्व काही सुरळीत झाल्यास हा महामार्ग येत्या दोन वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन वर्षांनी कोकणातील चाकरमनी गणपतीला वेगाने आपल्या घरी पोहोचेल, सध्यासारखी त्याची रखडपट्टी होणार नाही, अशी अपेक्षा करुया.
-------------------------------------------------------------

0 Response to "चौपदरीकरणाला वेग द्या"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel