-->
कौशल्याने पास

कौशल्याने पास

संपादकीय पान शुक्रवार दि. ११ सप्टेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कौशल्याने पास
आपल्याकडे शिक्षणविषयक काही ठराविक समजुती आहेत. उच्च शिक्षण एखाद्या मुलाने घेतले की तो हुशार आणि तोच आयुष्यात चांगले करिअर करु शकतो ही आपल्याकडे सर्वांचीच धारणा आहे. त्यात पालकांपासून शिक्षकांचाही समावेश आहे. अशा प्रकारच्या गैरसमजुतीचे बळी ठरतात ते बिचारे विद्यार्थी. आपण शाळेतल्या अन्य विद्यार्थ्यांप्रमाणे काही हुशार नाही त्यामुळे आपले भवितव्य कठीण आहे, अशी या विद्यार्थ्यांचीही ठाम समजूत होते व हे विद्यार्थी आपला आत्मविश्‍वास गमावून बसतात. परंतु असे अनेक विद्यार्थी असे आहेत की, शालांत परिक्षा नापास झाले होते परंतु त्यांनी भविष्यात आपले करिअर उत्तम केले. जगात वान कमविले. महाराष्ट्र सरकारने आता एक महत्वाचा निर्णय घेतला आहे की, दहावी नापास होणार्‍या विद्यार्थ्याला नापासचा शिक्का बसवू दिला जाणार नाही. त्याचा कल तपासून कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. सरकारचा हा निर्णय सर्वात महत्वाचा व स्वागतार्ह आहे. सरकारच्या या निर्णयाचे सर्व थरातून स्वागत झाले पाहिजे. समजा एखादा विद्यार्थी दहावीच्या परिक्षेत नापास झाला तर त्याला लगेचच पुढील महिन्यात दुसरी परिक्षा देण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. या दुसर्‍या प्रयत्नातही तो जर उत्तीर्ण होऊ शकला नाही तर त्याच्यात असलेल्या अंगभूत कौशल्याचा अभ्यास करुन त्याला प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्याचा कल पाहून त्याला कौशल्याचे प्रशिस्तिपत्रक येत्या शैक्षणिक वर्षापासून दिले जाणार आहे. दहावी अनुत्तीर्ण झाला म्हणजे त्याचे सर्व काही आयुष्यातील करिअर संपले ही जी धारणा आहे त्याला आऴा बसेल. सदर विद्यार्थ्यात असलेल्या कौशल्याचा योग्यरित्या विकास केल्यास तो आयुष्यात आपली प्रगती झपाट्याने करु शकतो. सध्या आपल्याकडे अनेक कौशल्य असलेल्या क्षेत्रात मनुष्यबळाची वानवा आहे. यासाठी यातून मोठे मनुष्यबळ आयते उभे राहू शकते. सरकार आता कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरु करण्याचे महत्वाकांक्षी जे पाऊल उचलत आहे त्याचे स्वागत केले पाहिजे व त्याला देशातील विविध उद्योगधंदांनी पाठबळ दिले पाहिजे. कारण भविष्यात येथूनच चांगले मनुष्यबळ अनेक कंपन्यांना सहजरित्या उपलब्ध होईल. आजवर आपल्याकडे केवळ पास होणार्‍या विद्यार्थ्यांचाच किंवा त्यातही चांगले मार्क्स घेऊन उत्तीर्ण होणार्‍यांचाच विचार केला जातो. मात्र जे अनुत्तीर्ण होतात त्याचा विचार करायला कुणी पुढे येत नाही, ही दुदैवाची बाब आहे. राज्यातील शिक्षण खात्याने याबाबत जो पुढाकार घेतला आहे हे चांगले आहे. वेल्डिंग, पब्लिंग, वैद्यकीय व्यवसायाला लागणारे सहाय्यक अशी दहा क्षेत्रे तयार करण्यात आली आहेत. त्यात सदर विद्यार्थ्याच्या आवडीनुसार त्याचे समुपदेशन केले जाणार आहे. राज्यात सुमारे १५ लाख विद्यार्थी दरवर्षी दहावीच्या परिक्षेला बसतात. त्यातील सुमारे ९० टक्के मुले पहिल्या टप्प्यात पास होतात. यंदा घेण्यात आलेल्या फेर परिक्षेला अडीज लाख विद्यार्थी बसले होते. यातील समजा ७० टक्के विद्यार्थी पास झाले असे गृहीत धरले तरी सुमारे ७५ हजार विद्यार्थी कौशल्याच्या चाचणीसाठी व प्रशिक्षणासाठी सज्ज होतील. आपल्याकडे दरवर्षी लाखो लोक कौशल्याच्या अभावी काम करु शकत नाहीत. मुलींना ब्युटी पार्लर पासून ते शिवणकामाचे लहान अभ्यासक्रम शिकविल्यास घरोघरी रोजगाराच्या मोठ्या संधी तयार होतील. कौशल्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे  या मुलांना काही काळ नोकरी केल्यावर ते आपला स्वयंरोजगारही थाटू शकतात. गावोगावी टायरचे पंक्चर काढणारा साधा दुकानदारही दररोज सहजरित्या ५०० रुपये कमवितो. त्याउलट आपण आपल्या सध्याच्या शिक्षणपध्दतीतून केवळ कारकुनांची म्हणजे बाबू लोकांची पैदास तयार करीत आहोत. कारकूनही आपल्याला पाहिजे आहेत. मात्र त्यांची संख्या मर्यादीत असली पाहिजे कारण त्यांची गरज तेवढीच आहे. अर्थात आपल्याला सध्याच्या शिक्षण पध्दतीत लक्षणीय बदल करावे लागणार आहेत. कोणत्याही अभ्यासक्रमातून मुलांची बुध्दीमत्ता वाढली पाहिजे. त्यांच्या बौध्दीक क्षमतेचा जास्तीत जास्त वापर कसा होईल याचे प्रतिबिंब शिक्षणव्यवस्थेत उमटले पाहिजे. मग ज्यांची बौध्दीक क्षमता कमकुवत असेल त्यांचा विकास हा श्रमाच्या आधारावर गेला पाहिजे. अशी शिक्षणव्यवस्था एका वर्षात येऊ शकणार नाही. त्यासाठी काळ लागेल. मात्र सध्या कौशल्याच्या आधारावरील शिक्षणाच्या सुरु केलेल्या प्रयोगाचे स्वागत झाले पाहिजे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रयत्नातून सुरु झालेल्या या अभियानाचे स्वागत व्हावे. तावडे यांनी मंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यापासून अनेक उपक्रम शिक्षण क्षेत्रात राबविले आहेत. यात त्यांनी मुलांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतर शिक्षम सम्राटांना हादरे देणारे अनेक निर्णय घेतले. आता कौशल्यावर आधारित शिक्षणप्रणाली तयार केली आहे. शिक्षण क्षेत्रातील या बदलांचे स्वागत व्हावे.
---------------------------------------------------------  

0 Response to "कौशल्याने पास"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel