-->
कहीं खुशी, कहीं गम

कहीं खुशी, कहीं गम

संपादकीय पान शुक्रवार दि. ०७ ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------- 
कहीं खुशी, कहीं गम
नगरपालिकांच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने यावेळच्या नगराध्यक्षपदाच्या जागा कोणासाठी नेमक्या राखीव होणार याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले होते. या निकालांकडे एक नजर टाकली असता एक स्पष्टपणे जाणवते की, भल्याभल्या राजकारण्यांना यातून धक्का बसला आहे. त्यामुळे रायगड असो किंवा रत्नागिरीत आता राजकारण्यांसाठी कहीं खुशी कहीं गम अशी स्थिती झाली आहे. आला अपवाद काय तो अलिबागच्या विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचा. यावेळी अलिबागमध्ये ओ.बी.सी. खुला हे आरक्षण जाहीर झाल्याने विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचा पुन्हा एकदा मार्ग खुला झााला आहे. अलिबागमध्ये प्रशांत नाईक यांची लोकप्रियता एवढी आहे की, आत्तापासूनच ते विजयी झाल्याचा जल्लोष अलिबागकर करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील एकूण नऊ नगरपालिकांपैकी पाच नगरपालिकांत महिलांसाठी आरक्षित झाल्याने जिल्ह्यात आता महिलाराज अवतरणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये नगरपालिकांची मुदत संपत असून त्यांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. खरे तर जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या निवडणुका होणार होत्या. मात्र त्यातील पनवेल आता महानगरपालिका झाल्याने त्यांची निवडणूक थोडी उशीरा होईल. बहुदा राज्यातील आगामी महानगपालिकांच्या निवडणुकांसोबत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. आता जाहीर झालेल्या आरक्षणानुसार, उरण नगरपालिकेसाठी ओ.बी.सी. महिला, खोपोली नगरपालिकेसाठी अनुसुचित जाती महिला, पेण नगरपरिषदेसाठी खुला प्रवर्ग, मुरुड-जंजीरा नगरपालिकेसाठी खुला प्रवर्ग, रोहा नगरपालिकेसाठी खुला प्रवर्ग, श्रीवर्धनसाठी खुला प्रवर्ग, महाड महिला खुला प्रवर्ग, माथेरान महिला खुला प्रवर्ग यांचे आरक्षण झाले आहे. या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे पत्ते साफ झाले आहेत. अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, पेण या नगराध्यक्षांसाठी पडलेले आरक्षण विद्यमान नगरसेवकांशी फायद्यात पड़ले आहे. सत्ताधार्‍यांसाठी ही लॉटरी लागली आहे. तर महाड, खोपोली, मुरुड-जंजीरा, माथेरान, उरण येथीव इच्छुकांच्या आशांवर या आरक्षणामुळे पाणी पडले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या अगोदर चिपळूण,खेड आणि राजापूर येथे काही वर्षे महिलाराज होते मात्र या आरक्षणामुळे चिपळूण वगळता रत्नागिरी,खेड,राजापूर या शहरांमध्ये पुरुषांना सुद्धा नशीब आजमावण्याची संधीं मिळणार आहे. चिपळूनमध्ये आमदार भास्कर जाधव विरुद्ध माजी आमदार रमेश कदम यांच्या एकाच पक्षातील म्हणजेच राष्ट्रवादीत चुरस होणार आहे. या दोघांमधील वैर अजून संपले नाही. रत्नागिरीत राष्ट्रवादीकडून एकच उमेदवार आहे मात्र सेनेकडून चारजण ,इच्छुक असल्याने आमदार उदय सामंत यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण राहुल पंडित हे खासदार विनायक राऊत यांच्या गटातील तर बंड्या साळवी ,मिलिंद किर हे उदय सामंत यांच्या गटातील आहेत. खेडमध्ये यापूर्वी माहिलराज होते मात्र मागासप्रवर्ग पुरुषांसाठी आरक्षण पडले आहे. राजापूर नगरपालिका लहान असली तरी याठिकाणी आमदार राजन साळवी यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. येथील कॉंग्रेस उमेदवाराला नेहमीच नारायण राणे यांचे पाठबळ मिळत असतो. तर राष्ट्रवादीला येथे खंबीर नेतृत्वच नाही त्यामुळे इथे कॉंग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत अपेक्षित आहे. चिपळूण नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुल्या वर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने इच्छुक पुरुष उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. नगराध्यक्षपद महिलेसाठी राखीव असले तरी निवडणुकीच्या रिंगणाबाहेर आमदार भास्कर जाधव विरुद्ध माजी आमदार रमेश कदम असाच सामना रंगणार आहे. रत्नागिरीच्या नगराध्यक्ष पदासाठी पंचरंगी निवडणूक होणार हे आता निश्चित झाले आहे.  रत्नागिरी शहर हे जिल्ह्याचे राजकीय घडामोडींचे केंद्र आहे. इथल्या राजकीय गणितावर अन्य ठिकाणची राजकीय हालचाली होत असतात. त्यामुळे रत्नागिरीत कोण इच्छुक आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांनी यापूर्वी चार वेळा नगराध्यक्षपद भूषविताना झपाट्याने शहर विकास केला होता. शहरात त्यांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने उमेश शेट्ये यांचे नाव निश्चित केले आहे. उमेश शेट्ये यांचे जनमत चांगले असल्याने इतर पक्षाच्या उमेदवराना हि निवडणूक सोपी नाही. भाजप मधून विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर आणि माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर हे दोघे इच्छुक आहेत. मात्र भाजपची शहरातील मते महत्वाची असली तरी त्यापैकी पक्ष म्हणून त्यांना पक्षाची किती मते पडतील.? हे पाहणे महत्वाचे आहे. केवळ समाजाच्या मतावर त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे. शिवसेनेत मात्र फासे उलटे पडणार आहेत. कारण राहुल पंडित, मिलिंद कीर, बंडया साळवी हे तिनही उमेदवार तगडे आहेत मात्र तिघांचेही गट वेगळे आहेत.गटांचे ग्रहण सेनेला त्रासदायक ठरणार हे निश्चित आहे. त्यामुळे आमदार उदय सामंत यांना निर्णय घेणे तितके सोपे नाही. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार तानाजी दुडये हे इच्छुक आहेत. शहरात प्रथमच बहुजन विकास आघाडी निवडणूक लढवत असली तरी परिणाम जनावण्याइतपत मते आघाडीकडे आहेत त्यामुळे सर्वांनाच बहुजन विकास आघाडीची मनधरणी करावी लागणार आहे. पंधरा वर्षांपूर्वी सरकारने थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची पध्दत सुरु केली होती. मात्र त्यात बराच गोंधळ उडाले. अनेक ठिकाणी पक्षाला बहुमत आहे मात्र विरोधकांचा नगराध्यक्ष अशी स्थिती निर्माण झाली होती. आता देखील तसेच होऊ शकते. मात्र यावेळी नगराध्यक्षांसाठी राखीव २५ टक्के निधी देण्याचे सरकारने मान्य केले आहे. अर्थात यातूनही अनेक ठिकाणी गोंधळ होऊन विकास कामांना खीळ बसण्याचा धोका नाकारता येत नाही. सध्या तरी या सोडतीवर लक्ष टाकले असता कहीं खुशी कहीं गम अशी स्थिती राजकारण्यांची झाली आहे, असेच म्हणावे लागेल.
------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "कहीं खुशी, कहीं गम"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel