-->
अस्वस्थ पाकिस्तान; भारतात राजकीय धुमाळी

अस्वस्थ पाकिस्तान; भारतात राजकीय धुमाळी

संपादकीय पान शनिवार दि. ०८ ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------- 
अस्वस्थ पाकिस्तान; भारतात राजकीय धुमाळी
पाकिस्तानातील पाकव्याप्त काश्मिर भागात जाऊन भारतीय सैनिकांनी तेथील अतिरेक्यांना कंठस्थान घातल्याच्या घटनेनंतर पाकिस्तान अस्वस्थ आहे. भारतीय सैन्याने एक महत्वाची व मोलाची कामगिरी बजावली. मात्र यानंतर पाकिस्तानची नाचक्की झाली व पाकिस्तान हा देश अतिरेक्यांचे आश्रयस्थान होऊ नये असे तेथील नागरिकांनाही वाटते. तेथील अनेक विचारवंत, पत्रकार त्याविषयी भाष्य करीत असतात. त्याचबरोबर या कारवाईनंतर जागतिक नकाशावर पाकिस्तान एकाकी पडला आहे. त्यांना कोणत्याही देशाने उघडपणे पाठिंबा दिलेला नाही. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी तर काही जागतिक पत्रकारांना घटनास्थळी नेऊन तेथे काहीच झालेले नाही असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु त्यातूनही शरीफ यांनी काही साधले नाही. पाकिस्तानात सरकार विरुध्द लष्कर हा संघर्ष नेहमीच होत आला आहे. मात्र नवाझ शरीफ हे लष्कराला सांभाळण्याचा प्रयोग सतत करीत असल्याने त्यांना लष्कराने कधी पदच्यूत केले नाही. अर्थात पाकिस्तानात लष्कराचेच वर्चस्व नेहमीच राहिले आहे. अशा वेळी नवाझ शरीफ हे तारेवरची कसरत करीत असतात. आता देखील बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांना पाठिशी न घालण्याचा आदेश पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांच्या लष्कराला दिला असून, मुंबई आणि पठाणकोट हल्ल्याबाबतही वेगाने चौकशी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. मात्र त्यांचे हे आदेश लष्करातील अधिकारी किती जुमानतील हा प्रश्‍नच आहे. असे असले तरीही नवाझ शरीफ यांना जगात तोंड दाखविण्यासाठी असे करावे लागत आहे. गेल्या दोन दिवसांत पंतप्रधान शरीफ यांनी लष्कर आणि इतर नेत्यांबरोबर अनेक बैठका घेतल्या. पंतप्रधान शरीफ यांनी विचारपूर्वक निर्णय घेत लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांना दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचा स्पष्ट आदेश दिल्याचेही सांगण्यात आले आहे. आदेश देताना पंतप्रधान शरीफ यांनी बंदी घातलेले दहशतवादी असा उल्लेख टाळून व्यक्ती असे म्हटले आहे. बैठकी दरम्यान लष्कराने किमान दोन वेळा कठोर कारवाई करण्याचे मान्य केले आहे. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांवर आणि त्यांच्या म्होरक्यांवर सरकारने कारवाई सुरू केल्यास लष्कराच्या नियंत्रणाखालील गुप्तचर संस्थांनी त्यामध्ये हस्तक्षेप करू नये, असे सांगण्यासाठी आयएसआयचे महासंचालक रिझवान अख्तर आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासीर जन्जुआ हे देशभर दौरा करणार आहेत. याशिवाय, पठाणकोट हल्ला प्रकरणाची चौकशी तातडीने संपवावी आणि मुंबई हल्ल्याबाबतची थांबलेली सुनावणी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, असे आदेशही पंतप्रधान शरीफ यांनी दिले आहेत. शरीफ यांच्या नव्या भूमिकेमुळे अनेक पातळ्यांवर प्रामुख्याने लष्करात नाराजी व्यक्त होत असल्याचे वृत्त आहे.आजवर पाकिस्तानच्या भूमिकेला चीनने वरकरणी पाठिंबा दिला असला, तरी पाकिस्तानने चीनला याबाबत कायम स्वरुपी गृहीत धरु नये असे चीनचे म्हणणे आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज चौधरी यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान शरीफ यांच्यासह काही निवडक लोकांसमोर जागतिक पातळीवर पाकिस्तानच्या स्थितीची माहिती दिली. जगासमोर पाकिस्तान मांडत असलेल्या भूमिकेला प्रमुख देशांचा विरोध असल्याने राजनैतिक स्तरावर पाकिस्तान एकटा पडत चालला असल्याची वस्तुस्थिती चौधरी यांनी मांडली. अमेरिकेबरोबरील संबंध वेगाने बिघडत असून, दहशतवादी हक्कानी नेटवर्कवर कारवाईची अमेरिकेची मागणी कायम असल्याने हे संबंध आणखीनच बिघडण्याची दाट शक्यताही वर्तविण्यात आली. एकीकडे पाकिस्तान अस्वस्थ असताना भारतातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. प्रामुख्याने सत्ताधारी पक्षाने सैनिकांच्या या बलिदानाचे भांडवल करुन त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा जो प्रयत्न सुरु केला आहे, त्याचा निषेध होत आहे. लष्कराच्या या कारवाईचे श्रेय पूर्णपणे लष्करालाच दिले गेले पाहिजे, याचा फायदा राजकीय पक्षाने उठविणे चुकीचे आहे. यालाच अनुसरुन भाजपा राष्ट्रवाद व राष्ट्रप्रेमाच्या ज्या व्याख्या बदलू पाहत आहे, ते धोकादायक आहे. माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी यापूर्वीच्या कॉँग्रेसच्या आघाडी सरकारने चार वेळा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्याचबरोबर त्यांनी अशा प्रकारच्या कारवाया केल्या जातात मात्र त्या जाहीर करणे अनेकदा देशाच्या हिताच्या नसतात, असे म्हटले आहे. शरद पवारांच्या म्हणण्याला निश्‍चितच महत्व आहे. कारण याचा गवगवा करुन राजकीय फायदा उठविणे चुकीचे आहेच शिवाय त्याचे पडसाद कसे भविष्यात उमटतील याचाही विचाक करणे क्रमपाप्त ठरते. मोदी सरकारने याचा विचार केलेला नाही असे दिसते. कमी वेळात झटपट लोकप्रियता मिळविण्यात माहिर असणारे नरेंद्र मोदी व भाजपा यांनी याचा विचार केला होता का? असा प्रश्‍न निर्माण होतो. कॉँग्रसने यापूर्वी केलेल्या अशा कारवाईची जाहीर घोषणा न करुन झटपट प्रसिध्दी कमविण्याचा मोह का टाळला, याचाही विचार झाला पाहिजे. आज जे अनेक लष्करी अधिकारी या घटनेची तारीफ करीत आहेत त्यांनी याविषयी जाणीवपूर्वक मौन पाळलेले आहे असेच दिसते. कारण लष्करी तज्ज्ञांनी अशा घटना जाहीर करणे हे देशाच्या हिताचे आहे की नाही याचे योग्य विश्‍लेषण करण्याची आवश्यकता आहे. सध्या पाकिस्तानात जशी अस्वस्थता आहे तसेच भारतातही या प्रश्‍नावरुन राजकीय धुमाळी सुरु आहे. भाजपा याचा राजकीय फायदा उठविण्याचा जो प्रयत्न करीत आहे ते चुकीचे आहे, हे मात्र नक्की.
---------------------------------------------------

0 Response to "अस्वस्थ पाकिस्तान; भारतात राजकीय धुमाळी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel