-->
पॅरिस हादरले

पॅरिस हादरले

संपादकीय पान सोमवार दि. १६ नोव्हेंेबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पॅरिस हादरले
मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटाची आठवण यावी अशी घटना शनिवारी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये घडली. पॅरिस शहराच्या प्रमुख सहा ठिकाणी बॉम्बस्फोट होऊन त्यात १३०हून जास्त लोक ठार झाले आहेत. दहा महिन्यांपूर्वी एका साप्ताहिकाच्या कार्यालयावरही असाच हल्ला झाला होता. मात्र कालच्या बॉम्बस्फोटाचे स्वरुप भीषण होते. मानवतेला काळीमा लावणारी ही घटना होती. याची जबाबदारी अपेक्षेनुसार आयसिस या इस्लामी संघटनेने स्वीकारली आहे. सहा ठिकाणी बॉम्बस्फोट व काही ठिकाणी थेट गोळीबार असा मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला आहे. दुसर्‍या महायुध्दानंतरचा फ्रान्समधील हा सर्वात मोठा हल्ला आहे. फ्रान्सने तातडीने आणीबाणी जाहीर केली असून राष्ट्राध्यक्ष होलँद यांनी हे आमच्यावर लादलेले युध्दच आहे. कोणतीही आम्ही दयामाया न दाखविता या दहशतवाद्यांविरुध्द कारवाई करु अशी घोषणा केली आहे. या घटनेचा जगातून निषेध व्यक्त होत आहे. पॅरिसमध्ये येत्या पंधरवड्यात जागतिक पातळीवर पर्यावरणविषयक परिषद भरणार आहे. अतिरेक्यांनी या परिषदेचा मुहूर्त गाठून हा हल्ला केला आहे. त्यावरुन हा हल्ला किती नियोजित होता हे समजते. या परिषदेच्या पार्शभूमीवर पॅरिसमध्ये चोख बंदोबस्त असताना सहा ठिकाणी बॉम्ब पेरुन ठेवणे व थेट गोळीबारच करणे ही घटना म्हणजे फ्रान्स सरकारला व त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेला दिलेले एक मोठे आव्हानच म्हटले पाहिजे. आयसिस या दहशतवादी संघटनेने पॅरिसचीच या हल्यासाठी का निवड करावी, असा प्रश्न उपस्थित होतो. सीरिया व लिबियामध्ये आयसिस या दहशतवादी संघटनेने घातलेल्या धुमाकुळावर अंकुंश ठेवण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या सशस्त्र कारवाईला फ्रान्सने पाठिंबा दिला आहे. त्याला प्रत्यूत्तर
देण्यासाठी आयसिसने हा मोठा हल्ला करुन घबराट माजविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पॅरिस हे शहर जगातिक पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाते. या शहरावर हल्ला करणे म्हणजे संपूर्ण युरोपाला इशारा देणे व पर्यटन केंद्रावर हल्ला झाल्याने फ्रान्सची अर्थव्यवस्थाही धोक्यात आणणे असे विविध उद्देश असल्याने पॅरिसची निवड आयसिसने केली आहे. गेल्या दोन वर्षापासून आयसिसच्या रडारवर फ्रान्स हा देश होता. अमेरिका व नाटोच्या फौजांनी इराक, सीरिया यांच्या ३५ टक्के भूभाग व्यापलेल्या आयसिसवर सध्या लक्षकेंद्रात केले आहे. जोरदार हल्ले करुन आयसिसचे कंबरडे मोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आयसिसने फारन्सला लक्ष्य
केले होते. अर्थात यासाठी बाहेरचे भाडेकरु मारेकरी असण्यापेक्षा फ्रान्समधील काही मुस्लिमांची माथी भडकावून त्यांच्या हाती शस्त्र दिली गेली असल्याची शक्यता जास्त आहे. आखातातून फ्रानसमध्ये आलेले निर्वासित मोठ्या संख्येने आहेत. संयुकत राष्ट्र संघटनेच्या करारानुसार फ्रान्स अशा प्रकारच्या निर्वासितांना वार्‍यावर सोडूनही देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना कायद्याने निर्वासितांना आपल्या घरात घेऊन सन्मानाने सोयीसुविधा देणे भाग आहे. सध्या युरोपात मंदीची लाट असल्याने या निर्वासितांना रोजगार नाही, असलेला रोजगार गेला आहे, अशा वेळी ते सैरभैर मनस्थितीत आहेत. खुद्द पॅरिस शहराच्या बाहेर अशा निर्वासितांच्या मोठ्या वस्त्या आहेत. यात अर्थातच मुस्लिम निर्वासितच आहेत. हाताला काम नाही, रोजगार नाही अशा स्थितीत हे मुस्लिम तरुण आयसिसच्या जाळ्यात सहजरित्या ओढले जातात. धर्माच्या नावावर आयसिस या तरुणांची माथी भडकाविण्याचे काम करते. निर्वासित म्हणून आलेल्यांमध्ये गरीबी आहे त्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. याचाच फायदा आयसिस उचलत आहे. दहशतवाद हा जागतिक प्रश्न आहे. सुरुवातीला हा प्रश्न गरीब व विकसनशील देशांपुरता मर्यादीत असेल अशी विकसीत देशांची समजूत होती. परंतु अमेरिकेवर हल्ला झाला व ही समजूत संपुष्टात आली. त्यामुळे दहशतवाद हा जागतिक प्रश्न आहे व त्याचा मुकाबला हा जगाने एकत्रित करावयाचा आहे. केवळ एका वर्षाच्या आत पॅरिसवर दुसरा हल्ला व्हावा व त्याने संपूर्ण जगाला हादरा बसावा ही घटना जगाच्या दृष्टीने विचार करावयास लावणारी आहे. भारताने
दहशतवाद अनुभवला आहे त्याचे परिणाम आपण गेली दोन दशकाहून जास्त काळ पाहत आहोत. दहशतवादाचा चेहरा हा भयानक आहे. दहशतवाद फैलावण्यामागे केवळ गरीबी हेच एकमेव कारण नाही तर जगातील धर्मांधवाद हे प्रमुख कारण आहे. एक धर्म धर्मांध आहे म्हणून आम्हीही त्यांचा बदला घेण्यासाठी त्यांच्या पावलावर पाऊल टाकणार असे म्हणणारेही जगाला दहशतवादाच्या खाईत आणखीन जोमाने लोटत आहेत. सध्याची ही परिस्थीती इतकी भीषण आहे की या अतिरेक्यांच्या हाती जर अण्वीक शस्त्रे लागली तर ते जगाचाही नायनाट करु शकतात. यासाठी जगातील प्रत्येक देशाने पूर्ण विचाराअंती पुढील पावले टाकली
पाहिजेत.
-------------------------------------------------------------------------

0 Response to "पॅरिस हादरले"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel