-->
टाटांना बंगाली दणका

टाटांना बंगाली दणका

संपादकीय पान शनिवार दि. ०३ सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
टाटांना बंगाली दणका
पश्चिमबंगालमधील सिंगूरचे शेतकरी १० वर्षांनंतर पुन्हा आपल्या शेतीचे मालक बनले आहेत. टाटाच्या नॅनो प्रकल्पासाठी केलेले त्यांच्या एक हजार एकर शेतीचे भूसंपादन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. राज्य सरकारला आता १२ आठवड्यांत मूळ मालकांना जमीन परत करावी लागेल. पश्चिम बंगालच्या तत्कालीन बुद्धदेव भट्टाचार्य सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाल आहे. तत्कालीन डाव्या सरकारने सन २००६ मध्ये हुगळी जिल्ह्यात हे भूसंपादन केले होते. न्यायमूर्ती व्ही. जी. गौडा आणि न्यायमूर्ती ए. के. मिश्रा यांच्या न्यायपीठाने म्हटले की, सरकारने शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकले नाही आणि योग्य मोबदलाही दिला नाही. शेती हिसकावून घेतल्यामुळे मागील दहावर्षांत शेतकर्‍यांच्या उपजिविकेचे साधनच नष्ट झाले होते. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांनी मोबदला घेतलेला आहे, त्यांच्याकडून तो वसूल केला जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. विशेष म्हणजे ७० टक्के शेतकर्‍यांनी भूसंपादनाचा मोबदला घेतला होता. सिंगूरचे शेतकरी या भूसंपादनाच्या विरोधात एकवटले होते. याचे नेतृत्व विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जीयांच्याकडे होते. खरे तर हे आंदोलन म्हणजे त्यावेळी सत्तेत असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची राज्यातून अस्ताची सुरुवात करणारे व ममता दीदींच्या सत्तेच्या दिशेने वाटचाल करणारे ठरले. त्यानंतर टाटांनी नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये हलवला. मात्र कंपनी सिंगूरची जमीन अन्य प्रकल्पासाठी ठेवू इच्छित होती. २०११ मध्ये मुख्यमंत्री बनल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी हे भूसंपादन रद्द केले होते. टाटांच्या याचिकेवर कोलकाता उच्च न्यायालयाने भूसंपादन योग्य ठरवले होते. त्याविरोधात शेतकरी सर्वोच्च न्यायालयात गेले होते. डाव्या आघाडीच्या तत्कालीन सत्तेत असलेल्या सरकारने टाटांनी जमीन देताना फार घाई केली होती व त्यासाठी राज्य सरकारने अनेक कायद्यांचे उल्लंघनही केल्याचे आढळले आहे. डाव्या आघाडीचा हा प्रकल्प राज्यात आणण्यासाठी उद्देश केव्हाही चांगलाच होता, परंतु त्यांनी त्यासाठी जे जनमत तयार करणे आवश्यक होते ते केले नाही. त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात दीदींनी आंदोलन उभारले आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. अर्थात यात डाव्या आघाडीचे नुकसान झाला व टाटांनाही बंगाली दणका मिळाला.

0 Response to "टाटांना बंगाली दणका"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel