-->
संपादकीय पान शुक्रवार दि. १४ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
------------------------------------
युतीतील मानापमान
-----------------------
रायगड जिल्ह्यातील उमेदवारीवरुन इंदिरा कॉँग्रेसमध्ये नाराजीचा तीव्र सूर उमटलेला असताना तिकडे शिवसेना, भाजपा, रिपब्लिकन महायुतीतील महत्वाचा घटक असलेल्या भाजपामध्येही मानापमान नाटक सुरु झाले आहे. सध्या हे मानापमान नाटक भाजपापुरते मर्यादीत असले तरीही त्याचे सर्व पडसाद महायुतीत उमटणार आहेत. भाजपा नेते नितीन गडकरी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यापासून एक काहूर राज्यातील राजकारणात उठले आहे. या भेटीनंतर नाराज झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची समजूत काढण्यासाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यापासून राजनाथ सिंग यांना धावपळ करावी लागली, अशी चर्चा होती. यातले खरे किती खोटे किती हे समजण्यास काही मार्ग नाही. परंतु उध्दव ठाकरे यांची नाराजी सध्यातरी भाजपाला परवडणारी नाही. त्यामुळे नरेंद्रभाईंनी उध्दवजींना फोन केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत हे प्रकरण आता मिटले व महायुतीचा घोडा चौफेर उधळेल अशी अपेक्षा होती. परंतु पुन्हा एकदा या घोड्याला लगाम लागला आहे. आता यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना केंद्रीय नेतृत्वाने नाराज केले आहे. भाजपाचे राज्य प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी महाराष्ट्र भाजपाचे निर्णय यापुढे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीसच घेतील असे म्हटल्याने गोपीनाथ मुंडे नाराज होणे स्वाभाविकच होते. याचा परिणाम म्हणून भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला मुंडे अनुपस्थित राहिले. आपण मराठवाड्यातील गारपीटग्रस्त भागातील शेतकर्‍यांच्या पहाणी दौर्‍याला जात असल्याचे मुंडेंनी निमित्त केले. मात्र यामागची त्यांची नाराजी काही लपली नव्हती. त्यामुळे गारपीटग्रस्तांचे निमित्त जरी मुंडेंनी सांगितले असले तरीही यामागचे मुख्य कारण उघड होते. नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यापासून शिवसेना नेतृत्व भाजपावर व गडकरींवर प्रचंड प्रमाणात नाराज होते. महाराष्ट्रातील पक्षाचे निर्णय नेमके कोण घेणार हे स्पष्ट करा असे स्पष्टपणे खुलासा करण्यास शिवसेनेने बजावल्यावर भाजपाची मोठी गोची झाली होती. त्यामुळे शेवटी उध्दव ठाकरेंची नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्र भाजपाला अधिकार असलेल्या एका व्यक्तीच्या नावाची घोषणा करणे भाग होते. आजवर भाजपातील मुंडे-गडकरी यांच्यातील मतभेद काही लपलेले नाहीत. अनेकदा या वादांनी उफाळून तोंड वर काढले होते. यातून मुंडे राजीनामा देण्यापर्यंत यापूर्वी पोहोचले होते. शेवटी मुंडेंसारखा नेता भाजपाला गमावणे अशक्य होते, त्यातून मुंडेना थंड करण्यात यश आले असले तरी मुंडे व गडकरी यांच्यातील वाद हे उफाळून वर येतच असतात. आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष फडणवीस असले तरी मुंडे यांचे राज्यात वजन आहे आणि तेच मोठे नेते आहेत. लोकसभा निवडणुकांची राज्यातील सर्व जबाबदारी गोपीनाथरावांवर सोपविण्यात आली आहे. महायुतीत नवीन साथीदार आणण्याची जबाबदारीही मुंडेनी यशस्वीरित्या पार पाडली होती. त्यामुळे केवळ भाजपातच नव्हे तर महायुतीतील मुंडे हे एक मोठे आधारस्तंभ आहेत. असे असतानाही मुंडेंचा पत्ता कापीत फडणवीस यांचे नाव केंद्रीय निरिक्षकांनी पुढे करावे याबद्दल मुंडे नाराज होणे यात काही चुकले नाही. त्यातच उध्दव ठाकरे यांनी आपले वजन मुंडेच्या बाजूननी टाकले आहे. त्यामुळे सध्याच्या या वादात एकीकडे गडकरी तर दुसरीकडे उध्दव ठाकरे व मुंडे आहेत असे चित्र आहे. एैन निवडणुकीच्या तोंडावर ही फाटाफूट होत असल्याने महायुतीच्या उमेदवारांच्या पोटात गोळा उभा राहिला आहे. अर्थात या सर्व गेममध्ये मनसेच्या अध्यक्षांनी खरी काडी टाकली आणि ते मात्र निर्धास्तपणे आता गंमत पाहात बसले आहेत. त्यामुळे .ा सर्व मानापमान नाटकाचे कर्तेकरविते राज ठाकरे आहेत. असे असले तरीही ते यात सहभागी नाहीत. मात्र सर्व काही त्यांच्या भोवती लक्ष्य केंद्रीत झाले आहे. राज ठाकरे यांच्या राजकीय कौशल्याचे हेच खरे गमक म्हणाले लागेल. महायुतीतील हे मानापमान नाटक एवढ्यात काही थांबणारे नाही. जशी निवडणूक जवळ येईल तसे हे नाटक आणखी रंगात येईल आणि त्याचा सर्वाधिक फटका हा महायुतीला बसणार आहे. मनसे अध्यक्षांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून मान्यता दिल्यामुळे तिकडे बिहार व उत्तरप्रदेशातील मते भाजपाला गमवावी लागणार आहेत असे राजकीय निरिक्षकांचे मत चुकणारे नाही. त्यामुळे मोदी एकीकडे बेरीज करीत असताना दुसरीकडे वजाबाकी करीत आहेत. बरे बजाबाकी जास्तच होत असल्यामुळे मोदी यांना दिल्लीचे तख्त जिंकणे दिवसेंदिवस कठीणच होईल, यात काहीच शंका नाही. ज्या नागपुरातून गडकरी उभे राहाणार आहेत त्याच नागपुरातले फडणवीस आहेत आणि त्यांना गडकरींमुळे तेथे दुय्यम स्थानावर राहावे लागते. अर्थात यावेळी गडकरींना दिल्लीला निवडून जायचे आहे कारण त्यांचा डोळा पंतप्रधानपदावर आहेच. भाजपाला २०० जागा कशाबशा मिळणार आहेत, अशा वेळी जो अन्य पक्षांना जवळ करु शकेल व ज्याला संघाचा आशिर्वाद लाभेल तो पंतप्रधान होईल. त्यामुळे दिल्लीत निवडणुकांनंतर जी काही स्थिती उद्भवेल त्यानुसार दावा मांडावयाचा गडकरींचा डाव आहे. महायुतीचे मुख्यमंत्रीपद मिळविणे हे मुंडेंचे लक्ष्या आहे. अशा वेळी हे मानापमान नाटक रंगल्यास महायुतीला सर्वात मोठा फटका बसेल हे यातील सर्व कलाकार विसरत आहेत.
---------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel