-->
आपण असंवेदनाशील झालो आहोत?

आपण असंवेदनाशील झालो आहोत?

रविवार दि. ०४ सप्टेंबर २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
आपण असंवेदनाशील झालो आहोत?
--------------------------------------
एन्ट्रो- औषधांअभावी मृत्यू होणे, पत्नीचा मृतदेह खांद्यावरुन नेण्याची पाळी येणे, बसमध्ये मृत्यू झाल्यावर तो मृतदेह बाहेर काढणे या सर्व घटना आंगावर काटा आणतात. परंतु जे यात सहभागी असतात त्यांच्या संवेदना का मेल्या आहेत, याचे उत्तर काही सापडत नाही...
------------------------------------------
घटना पहिली- उत्तरप्रदेशातील एका सरकारी रुग्णालयाने कोणत्याही प्रकारची मदत न केल्याने अखेर १२ वर्षाच्या मुलाने पित्याच्या खांद्यावरच आपले प्राण सोडले. सुनील कुमार यांचा मुलगा अंश तापाने फणफणत होता. सुनील कुमार त्याला घेऊन कानपूरच्या लाला लजपत राय रुग्णालयात गेले. पण रुग्णालय प्रशासनाने अंशला दाखल करुन घेण्यास नकार देत त्याला बाल रुग्णलायात जाण्यास सांगितले. अंशची प्रकृती नाजूक असूनही रुग्णालयाने रुग्णवाहिका किंवा स्ट्रेचर अशी कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे सुनील कुमार मुलाला आपल्या खांद्यावर घेऊन रुग्णालयाच्या दिशेने निघाले. मात्र रस्त्यातच अंशने पित्याच्या खांद्यावर प्राण सोडले.
घटना दुसरी-मध्य प्रदेशमध्ये बसमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर असंवेदनशील चालकाने तिच्या पतीला मृतदेहासकट अर्ध्या रस्त्यात खाली उतरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घोघरा गावात ही घटना घडली आहे. रामसिंग यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने ते तिला एका खासगी बसमधून उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र प्रवासातच तब्येच बिघडल्याने त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या ५ दिवसांपूर्वीच तीने एका बाळाला जन्म दिला होता.
रामसिंह यांच्या पत्नीच्या मृत्यूनतंर त्यांना मदत करण्याऐवजी बसचालकाने त्यांना तत्काळ खाली उतरवले. भर पावसात रामसिंग पत्नीच्या मृतदेहासह पावसात भिजत होते. अखेर काही वेळानंतर त्याच मार्गावरून जाणार्‍या दोन वकिलांनी रामसिंग यांना मदत केली. त्यांनी १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांशी संपर्क साधत मदत मागितली. मात्र पोलिसांनीही असंवेदनशीलता दाखवत फक्त त्यांची चौकशी केली व ते निघून गेले. त्यानंतर वकिलांनीच ऍम्ब्युलन्सची सोय करुन महिलेचा मृतदेह घरापर्यंत पोहोचवला.
घटना तिसरी-  ओडिसातील भवानीपाटणा परिसतील जिल्हा रुग्णालयाने दाना माझी या आदिवासी व्यक्तीला मृतदेह घेऊन जाण्यासाठी गाडी उपलब्ध करुन न दिल्याने त्यांना मृतदेह खांद्यावरुन घेऊन जावा लागला. आपल्या पत्नीचा मृतदेह घेऊन ते तब्बल १० कि.मी. चालत होते. ही घटना समोर आल्यानंतर देशभरातून लोकांनी संताप व्यक्त केला होता. दाना माझी यांच्या पत्नी अमंग यांना टीबीचा आजार होता. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी रुग्णालयाकडे मृतदेह घेऊन जाण्यासाठी गाडी देण्याची विनंती केली. पण काहीच मदत मिळत नसल्याचं पाहून त्यांनी चादरीमध्येच पत्नीचा मृतदेह गुंडाळून घेतला आणि आपल्या घरचा प्रवास सुरु केला. त्यांची १२ वर्षाची मुलगीही सोबत चालत होती. रुग्णालयापासून तब्बल ६० किमी अंतरावर असलेल्या कालाहंडी गावात त्यांचं घर आहे. ओडिशा जिल्ह्यातील गरिब आणि मागासलेल्या गावांमधील एक त्यांचं गाव आहे. या घटनेमुळे सारा देश सुन्न झाला. मात्र वाहन नाकारल्याने पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्यास कारणीभूत ठरलेल्या जिल्हा रुग्णालयाला राज्य सरकारने क्लीन चिट दिली आहे. जिल्हाधिकारी ब्रुंधा डी यांनी याप्रकरणी चौकशी केली असता दाना मांझी कोणालाही न सांगता रुग्णालयातून निघून गेल्याचा निष्कर्ष काढला. अशा प्रकारे रुग्णालय कर्मचार्‍यांना क्लीन चिट दिली आहे. मदाना मांझी यांनी पत्नीचं डेथ सर्टिफिकेही घेतलं नव्हते, असे सांगण्यात आले.
गेल्या महिनाभरातील वरील तीनही घटना पाहिल्या तर आपल्याला माणसातील संवेदना संपली आहे की काय असा प्रश्‍न पडावा. या घटनांमुळे एखाद्याचे मन सुन्न होईल परंतु त्यावेळी तेथे असलेले लोक यांच्यासाठी मदतीला धावून आले नाहीत ही अत्यंत खेदाची बाब म्हटली पाहिजे. आता नवीन तंत्रज्ञानामुळे माणसाला अनेक सुविधा प्राप्त झाल्या, परंतु त्या सुविधांचा लाभ केवळ गरीबीपोटी आपल्या देशातील काही जणांना घेता येत नाही. वैद्यकीय सुविधांमुळे लोकांचे आर्युमान वाढले आहे खरे परंतु या सुविधा आजही सगळ्यांना मिळत नाहीत. आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरुन घेऊन जाणारा नवरा पाहून बहारीनच्या पंतप्रधाऩांना वेदना झाल्या व त्यांनी मदत करण्याची तयारी दाखविली. म्हणजे माणुसकीला देशाच्या सीमा नसतात. तसेच माणुसकी जात-पात, धर्माच्याही पलिकडे असते. याच अंकात मदर तेसेसा यांच्याबद्दल लेख प्रसिध्द करण्यात आला आहे. मदर तेसेसा यांनी केलेले समाजासाठीचे काम पाहिले की, या घटना आपल्या शरमेने मान खाली घालावयास लावतात. माणूस माणसापासून अशा प्रकारे का दुरावत चालला आहे? याचा विचार आपण आता केला पाहिजे. एखाद्याच्या मदतीला धावून जाण्याची आपल्याकडे परंपरा आहे. आजही अनेक जण मदतीला धावून जाऊन एखाद्याला कठीण प्रसंगात मदत करतातही. मात्र वरील घटना वाचल्या की माणूस म्हणून आपण असंवेदनाशील झालो आहोत हे नक्की. औषधांअभावी मृत्यू होणे, पत्नीचा मृतदेह खांद्यावरुन नेण्याची पाळी येणे, बसमध्ये मृत्यू झाल्यावर तो मृतदेह बाहेर काढणे या सर्व घटना आंगावर काटा आणतात. परंतु जे यात सहभागी असतात त्यांच्या संवेदना का मेल्या आहेत, याचे उत्तर काही सापडत नाही. आज माणूस जशी आपली प्रगती करतो आहे तसा तो जास्त व्यवहारी होत चालला आहे. जाती-धर्माच्या बंधनात तो जास्तच अडकत चालला आहे. आपला धर्म, आपली जात, आपला समाज, माझे कुटुंब यात अडकत जात तो अधिकच संकुचित होत चालला आहे. माणुसकीचा विचार यातून लोप पावत चालला आहे, असे म्हणण्यास या घटना पुरेशा आहेत. आपल्याला माणूस हा जाती, धर्माच्या, आर्थिक स्तराच्या पलिकडे जाऊन शोधला पाहिजे. माणसातील ही मेलेली असंवेदनशीलता पुन्हा एकदा जागृत केली पाहिजे. माणसाला माणूस म्हणून जगू देण्याचा संदेश प्रत्येकाने पाळल्यास आपल्याला या देशात एक वेगळे चित्र दिसू शकते. या वरील तीन घटना माणूसकीला काळीमा आहेत, अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी आपण प्रत्येकाने झटले पाहिजे. यातूनच माणसातील ही असंवेदनशीलता संपुष्टात येईल.
-----------------------------------------------------------

0 Response to "आपण असंवेदनाशील झालो आहोत?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel