-->
निर्णायक कृती कधी?

निर्णायक कृती कधी?

संपादकीय पान मंगळवार दि. २० सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------- 
निर्णायक कृती कधी?
जम्मू काश्मीरमधील उरीत येथील दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या जवानांची संख्या आता २० वर पोहोचली आहे. शहीद झालेल्या जवानांमध्ये तीन जण महाराष्ट्रातील आहेत. उरी येथील लष्करी तळाला रविवारी पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते.या हल्ल्यातील काहींची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींना श्रीनगरमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील खडांगळीतील संदीप सोमनाथ ठोक, सातार्‍यातील जाशीतील लान्सनायक जी शंकर आणि अमरावतीच्या नांदगावमधील शिपाई जानराव उईके यांचा समावेश आहे. नाशिकमधील खडांगळीत राहणारे संदीप ठोक हे अवघे २२ वर्षांचे असून दोन वर्षांपूर्वीच ते सैन्यात भरती झाले होते. शेतकरी कुटुंबातून आलेल्या ठोक यांना दोन बहिण आणि एक भाऊ आहे. केंद्रात भाजपाचे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून पाकिस्तानातून घुसून आलेल्या अतिरेक्यांनी केलेला हा तिसरा हल्ला आहे. डिसेंबर २०१४ साली काश्मीरमध्ये मोहरा येथे लष्करी छावणीवर हल्ला करण्यात आला होता, यात १० जवान ठार झाले होते. त्यानंतर जानेवारी २०१६ साठी पठाणकोट येथील हवाई तळावरील हल्ल्यात सात जवान ठार झाले होते. तर आता उरी येथे झालेला हा तिसरा मोठा हल्ला आहे. त्याशिवाय अधून-मधून लहान हल्ले हे सीमेवर दररोज होत आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून अवघ्या काही किमी अंतरावर असलेल्या उरी येथे लष्कराचा मोठा तळ आहे. या तळावर रविवारी पहाटे जैशच्या चार दहशतवाद्यांनी हल्ला केला. बेछूट गोळीबार आणि ग्रेनेडचा वापर करत दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. ग्रेनेड हल्ल्यामुळे तळावरील तंबूंना आगी लागल्या व क्षणार्धात ही आग संपूर्ण बराकीत पसरली. लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चारही दहशतवादी ठार झाले. तब्बल तीन तास ही चकमक चालली होती. उरी येथे लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर आता भारतानेही पलटवार करण्याची तयारी केली आहे, अशी चर्चा आहे. मात्र अजूनही ठोस उत्तर भारतीय सैनिक कशा प्रकारे देणार ते काही समजू शकलेले नाही. या घटनेचा बदला घेण्यासाठी कुठे हल्ला करायचा याची एक यादीच तयार केली जात असून यात नियंत्रण रेषेजवळील जिहादी दहशतवाद्यांच्या तळांपासून ते घुसखोरांना मदत करणार्‍या पाकिस्तानी सैन्याच्या चेक पोस्टचाही समावेश केला जाणार आहे, अशी चर्चा आहे. या हल्ल्यानंतर केंद्र सरकार आता तरी पाकविरोधात कठोर भूमिका घेईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या अध्यक्षतेखाली गुप्तचर यंत्रणा आणि सैन्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी पंतप्रधानांसमोर कोणकोणते पर्याय मांडता येतील याची माहिती घेतली. सैन्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैन्याने विशेष दलांच्या मदतीने नियंत्रण रेषेवरील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्याची योजना आखली आहे. यात गुप्तचर यंत्रणांचीही मदत घेतली जाणार आहे. तसेच घुसखोरीत मदत करणार्‍या पाकिस्तानी चौक्यांनाही या कारवाईत लक्ष्य केले जाईल असे सांगितले जाते. याशिवाय वेळप्रसंगी सीमेपलीकडे जाऊन कारवाई करण्याची तयारीही सैन्याने केली आहे. रविवारी गुप्तचर यंत्रणा, रिसर्च अँड ऍनेलिसीस विंग, लष्करी मोहीमांचे महासंचालक या बैठकीला उपस्थित होते, यातील एका अधिकार्‍यंाने सांगितले, आपल्या जवानांच्या हत्येचा बदला घेणारच आहोत. योग्य वेळी बदला घेऊ. दबावाखाली येऊन घाई करणार नाही असेही सैन्यातील अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. अर्थात ही सर्व प्रशासकीय तयारी झाली, मात्र याचा राजकीय निर्णय पंतप्रधानांना घ्यावयाचा आहे. हल्ल्यापूर्वी गुप्तचर यंत्रणांना दहशतवाद्यांमधील संभाषणही मिळाले आहे. त्यानुसार, हल्ल्यात लष्कर ए तोयबाचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले आणि मिसाईलव्दारे हल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र त्यात कितपत यश मिळेल याबाबत सुरक्षा दलाने शंका व्यक्त केली आणि शेवटी मनमोहन सिंग यांना ही योजनाच गुंडाळावी लागली. याबाबत ठोस राजकीय निर्णय मनमोहनसिंग सरकार घेऊ शकले नव्हते. आता मात्र नरेंद्र मोदी यासंबंधीचा निर्णय घेणार का, असा सवाल आहे. कारण निवडणुकांपूर्वी मोदी यांनी पाकिस्तान जर एैकत नसेल तर त्यांच्यावर थेट कारवाई करण्याची तयारी दाखविली होती. मात्र त्यावेळी ते विरोधात होते. आता सत्तेत आल्याने त्यांना आता हे करुन दाखवायचे आहे. सरकारने संयम दाखविण्याचे दिवस आता संपले असून निर्णायक पाऊल उचलण्याची वेळ आली आहे, अशी आक्रमक प्रतिक्रिया भाजपचे सरचिटणीस आणि जम्मू-काश्मीरची जबाबदारी असणार्‍या राम माधव यांनी व्यक्त केली आहे, ही प्रतिक्रीया फार बोलकी आहे. उरी हल्ल्यामागे असलेल्यांना सोडणार नाही, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे. जर दहशतवाद हे दुर्बल आणि भेकडांचे हत्यार असेल तर सातत्याने होणार्‍या हल्ल्यानंतरही संयम बाळगणे ही अकार्यक्षमता ठरेल. त्यामुळे आता भारताने संयम दाखवू नये, प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे ठरणार आहे. मात्र पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनीदेखील पाकच्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर न देणे भ्याडपणाचे ठरेल, असे म्हटले आहे. त्यामुळे सरकार पाकला चोख उत्तर देण्याची योजना आखत आहे असेच दिसते. मात्र यासंबंधीचा राजकीय निर्णय सरकारने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावयाचा आहे. पुन्हा एकदा कारगील युध्दासारखे एखादे युध्द किंवा एखादे छुपे युध्द पाकिस्तानसोबत करुन त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे.
--------------------------------------------------------------------------

0 Response to "निर्णायक कृती कधी?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel