-->
संपादकीय पान मंगळवार दि. १३ मे २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
चीनचा तंत्रज्ञानविषयक चमत्कार
--------------------------
आपल्या शेजारचा लाल चीन पुढील दोन-तीन दशकात जागतिक महासत्ता होणार यात काही शंका नाही. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात चीनने आपले प्रभूत्व गाजविण्यास सुरुवात केली आहे. दोन वर्षापूर्वी चीनने अलिंपिकचे आयोजन उत्कृष्टरित्या भरवून आपण कोणताही जागतिक सोहळा यशस्वीरित्या भरवू शकतो हे दाखवून दिले होते. चीनच्या कंपन्यांनी तर जागतिक बाजारपेठेच मुसंडी मारावयास सुरुवात केली असून या कंपन्या जग हीच आपली बाजारपेठ आहे असे निश्चित करुन जगातील बाजारपेठा काबीज करण्यास निघाल्या आहेत. चीनचा हा आक्रमकपणा त्यांना महासत्ता होण्याच्या त्यांच्या उदिष्टांपर्यंत नेऊ शकतो. तंत्रज्ञानात तर चीनने डोळे दिपून टाकतील अशी प्रगती केली आहे. कम्युनिस्ट जगाची सवर्त्र पिछेहाट झाली असताना चीनची ही भरारी अमेरिकेची झोप उडवून टाकीत आहे. आता तर जगातील सर्वात मोठा व तंत्रज्ञानांना एक मोठे आव्हान ठरेल असा अवाढव्य रेल्वे प्रकल्प चीन उभारत आहे. ही रेल्वे चीनमधून निघून पार पॅसिफिक समुद्र पार करुन अमेरिकेत १३ हजार अंतर पार करुन अमेरिकेत पोहोचणार आहे. बरे या मार्गावरुन बुलेट ट्रेन धावणार असल्यामुळे केवळ दोन दिवसात हे अंतर पार होईल. पॅसिफिक समुद्रातून २०० कि.मी.अंतर पार करण्यासाठी समुद्रातून बोगदा तयार केला जणार आहे. अलास्का, कॅनडा मार्गे ही रेल्वे अमेरिकेत पोहोचेल. सध्या असलेल्या ट्रान्स सैबेरियन रेल्वेपेक्षा हा मार्ग तीन हजार कि.मी. जास्त असेल. केवळ अमेरिकेत जाण्याचाच मार्ग नव्हे तर चीनमधून आफ्रिकेत जाण्यासाठी रेल्वे मार्ग कसा आखता येईल याची तयारी सध्या चीनमध्ये सुरु आहे. चीनमधून अमेरिकेला जाण्याचा हा रेल्वे मार्ग रशियातून जाणार आहे. चीनमध्ये रेल्वे हे एक प्रवासाचे मोठे साधन म्हणून ओळखले जाते. तसेच रशियातही रेल्वेचे जाळे फार मोठे आहे. त्यामुळे चीनची ही कल्पना रशियाने एका झटक्यात उचलून धरली. सध्या आन्तरराष्ट्रीय पातळीवर या मार्गाची चर्चा सुरु झाली असून याला मान्यता मिलण्यात काही अडचणी येतील असे चीनला काही वाटत नाही. गेल्या दोन दशकात चीनने आपल्या देशात रेल्वेचे मोठे जाळे विणले आहे. चीनमध्ये सध्या हाय स्पीड रेल्वेचे सुमारे ११ हजार कि.मी. लांबीचे मार्ग उभारण्यात आले आहेत. तर येत्या काही वर्षात आणखी १२ हजार कि.मी. लांबीचे हाय स्पीड मार्ग उभारले जातील. चीनने पाकिस्तान व भारत या देशांना हाय स्पीड रेल्वेने जोडणारी रेल्वे उभारण्याची इच्छा यापूर्वीच व्यक्त केली आहे. अरुणाचलप्रदेशाच्या सीमेपर्यंत चीनने आपली रेल्वे आणून ठेवलीच आहे. त्यामुळे भारत सरकारने हिरवा कंदील दिल्यास चीन-भारत रेल्वे प्रवास सुरु होण्यास काही विलंब लागणार नाही. तसेच चीनने हाती घेतलेला महत्वाकांक्षी ट्रान्स-एशियन रेल्वे प्रकल्पाचे काम आता पुढील महिन्यापासून सुरु होत आहे. हा मार्ग सुरु झाल्यावर चीन आपल्या देशातून म्यानमार, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड, मलेशिया, सिंगापूर हे देश रेल्वे मार्गाने जोडणार आहे. हा रेल्वे मार्ग उभारणे हे देखी चीनच्या दृष्टीने तंत्रज्ञान विषयक एक मोठे आव्हान ठरणार आहे. चीनने म्यानमारहून गॅस व तेलाची पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण केले आहे. ट्रान्स-एशियन रेल्वे मार्ग हा १८ देशातून जाणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावरही ते एक तंत्रज्ञानातील मोठा अविष्कार असेल. आपण कोकण रेल्वे उभारल्यावर त्याची जगाने नोंद घेतली होती. त्यानंतर काश्मिरातून रेल्वे मार्ग टाकण्याचे अवघड कामही आपण पूर्ण केले. मात्र चीनने हाती घेतलेली रेल्वेची कामे पाहता चीन आपल्यापेक्षा कितीतरी पुढे गेला आहे हे आपल्याला जाणवते. चीन रेल्वे मार्गाच्या माध्यमातून जगात आपला शिरकाव करीत आहे. कारण कोणत्याही मालाची ने-आण करण्यासाठी समुद्र मार्गाच्या खालोखाल रेल्वेचा मार्ग हा फायदेशीर ठरतो. अशा प्रकारे चीनची सर्व पावले जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने पडत आहेत.
-------------------------------


Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel