
आकाशात चार दिवस राहू शकणारे बोइंगचे नवीन विमान ‘फँटम आय’
आकाशात चार दिवस राहू शकणारे बोइंगचे नवीन विमान ‘फँटम आय’ Published on 04 Nov-2011 KIMAYA प्रसाद केरकर, मुंबई |
जगातील विमान निर्मिती उद्योगातील अव्वल कंपनी बोइंगने एका अत्याधुनिक विमानाचा शोध लावला आहे. हे विमान आकाशात तब्बल चार दिवस राहू शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आकाशात 65 हजार फुटांच्या उंचीवर हे विमान आपले वास्तव्य करून राहील. त्यामुळे सध्या जगाला भेडसावत असलेल्या अतिरेक्यांच्या कारवायांपासून हे विमान पूर्णत: अलिप्त राहील. अतिरेक्यांच्या टप्प्यात हे विमान कधीच येणार नाही. त्यामुळेच या विमानाला अतिशय सार्थक असे नाव देण्यात आले आहे ‘फँटम आय’. जगात सध्या ‘बोइंग’ ही अमेरिकन कंपनी व युरोपियन कंपनी ‘एअरबस’ या दोनच कंपन्यांचे विमान निर्मिती उद्योगावर साम्राज्य आहे. अर्थात त्याव्यतिरिक्त ज्या विमान उत्पादन करणार्या कंपन्या आहेत त्या छोटी विमाने तयार करतात. त्यामुळे मोठय़ा प्रवासी विमान तयार करणार्या बाजारपेठेवर बोइंग व एअरबस यांच्यात जबरदस्त स्पर्धा असते. अर्थातच त्यांच्यात बोइंग कंपनी नेहमीच र्शेष्ठ ठरली आहे. गेल्या काही वर्षांत बोइंगच्या संशोधन विभागात एखादे विमान जास्तीत जास्त काळ आकाशात किती काळ राहू शकते त्यावर संशोधन सुरू होते. सध्याची विमाने जास्तीत जास्त 16 तास हवेत राहू शकतात; परंतु याहून जास्त काळ हवेत राहणार्या विमानाचा शोध लावण्याचे काम बोइंगने युद्धपातळीवर हाती घेतले होते. आता मात्र या संशोधनात त्यांना यश आले असून तब्बल चार दिवस हवेत राहू शकणारे विमान त्यांनी तयार केले आहे. या विमानाविषयी विस्तृत माहिती अद्याप बोइंगने दिलेली नाही. मात्र, हे विमान अवाढव्य असेल. सध्याच्या विमानाच्या चौपट जास्त प्रवासी नेण्याची त्याची क्षमता असेल. त्याचबरोबर प्रवाशांची विशेष सुरक्षा यात केली जाणार आहे. या विमानाचे पंख 150 फूट लांब आहेत, तर याची सर्व यंत्रणा हायड्रोजनवर कार्य करील. याची चाचणी लवकरच घेतली जाणार आहे. प्रत्येकी 150 हॉर्सपॉवरची चार सिलिंडर्स इंजिन यात असतील. कंपनी दरवर्षी संशोधनावर अब्जावधी रुपये खर्च करीत असते. याच संशोधनातून कंपनी सातत्याने आपल्या विमानांच्या मॉडेलमध्ये बदल करीत असते. बोइंगने अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या सहकार्यानेही या क्षेत्रात मोठे संशोधन केले आहे. कंपनीने 30 सप्टेंबर 1968 रोजी पहिले विमान बाजारात आणले. त्यानंतर कंपनीने आपल्या विमानांमध्ये बरेच बदल केले आहेत. त्याकाळी संशोधनावर कंपनीने सुमारे एक अब्ज डॉलर खर्च केले होते. तिथून ते आजवर विमान उद्योगात आमूलाग्र बदल झाले आहेत. 2001 मध्ये न्यूयॉर्क ते टोकियो हे अंतर थेट कापण्यासाठी त्यांनी खास विमान तयार केले. यात एकाच वेळी सव्वाचारशे प्रवासी बसण्याची व्यवस्था आहे. 2001 मध्ये कंपनीने सध्या सेवेत असलेल्या 747 या जातीच्या विमानांमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती. या घोषणेचाच एक भाग म्हणून कंपनीने आता हे नवीन विमान तयार केले आहे. मात्र, याचे व्यापारी उत्पादन कधी सुरू करणार, यासंबंधी मौन पाळण्यात आले आहे; परंतु हे विमान बाजारात येण्यासाठी अजून किमान दोन वर्षे लागतील. त्याहून सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे विमान म्हणजे विमान उद्योगातील एक मैलाचा दगड ठरावा. Prasadkerkar73@gmail.com |
0 Response to "आकाशात चार दिवस राहू शकणारे बोइंगचे नवीन विमान ‘फँटम आय’"
टिप्पणी पोस्ट करा