-->
संपादकीय पान सोमवार दि. १२ मे २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
लोकशाहीच्या सोहळ्याची सांगता
--------------------------------------------
सध्या सुरु असलेल्या १६व्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा शेवटचा टप्पा आज सोमवारी पार पडेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जगातील या सर्वात मोठ्या लोकशाही देशातील एक ऐतिहासिक सोहळ्याचा टप्पा पार पडेल. ८० कोटी मतदारांनी मतदान करण्यासाठी ऐवढी मोठी यंत्रणा उभारण्याची जगातील ही पहिलीच वेळ ठरेल. यंदाच्या निवडणुकीचे वेगळेपण असे की, तिचे संपूर्ण स्वरुपच बदलून टाकले आहे. या बदलाचे प्रणेते म्हणून भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहावे लागेल. परंपरागत प्रचारसाधनांच्या किती तरी अधिक पटीने गुगल, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप अशा सोशल मीडिया नामक माध्यमाने व्हर्च्युअल अर्थात आभासी स्वरूपात यंदा प्रचाराची राळ सर्वत्र उडवून दिली आहे. या माध्यमांच्या वापरकर्त्यांचा निवडणूक काळात अवाढव्य प्रमाणात वाढलेला आकडा विस्मयजनक म्हणावा असाच आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ही सारी किमया म्हणावी लागेल. त्यातून प्रचार तंत्राचा एक नवीन पैलू निर्माण झाला असून त्याच्या परिणामी निवडणुकीची पूर्वीची परिमाणेही बदलत चालली आहेत. सोशल मीडियाची व्याप्ती एवढी व्यापक आणि जलद आहे की, काही तासात त्याचा प्रभाव जनमानसावर दिसायला लागतो. सोशल मीडियातल्या ज्या माध्यमांचा सर्वाधिक वापर निवडणूक काळात आपल्याकडे होत आहे ती सर्व माध्यमे अमेरिकेतील आहेत. गुगल, फेसबुक आणि ट्विटर याद्वारे आपली मते व्यक्त करणे, पक्षाच्या आतल्या गोटातील बातम्या सोयीनुसार फोडणे, परिस्थितीनुरूप वक्तव्ये करणे यावर देशातील तमाम बडे नेते आणि प्रमुख राजकीय पक्षांचा कटाक्ष असल्याचे सध्या पाहावयास मिळते. भारतातील वापरकर्त्यांची संख्या निवडणूक काळात कमालीची वाढल्याचे आकडेवारी सांगते. एकट्या फेसबुकचेच सध्या भारतात तब्बल १० कोटी वापरकर्ते आहेत तर या वर्षीच्या जानेवारीत ट्विटरचे जेवढे वापरकर्ते भारतात होते त्यापेक्षा ही संख्या आता दुप्पट झाली आहे. निवडणुकीच्या सातव्या टप्प्याअखेर निवडणुकीशी संबंधित तब्बल ४.९ कोटी एवढी संभाषणे ट्विटरवर झाली आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी त्यात सर्वात आघाडीवर असून या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर त्यांचे एकट्याचे ३८.९ कोटी फॉलोअर्स आहेत. फेसबुकवरदेखील मोदींचे १.४ कोटी चाहते असून जगभरातील राजकारण्यांपैकी केवळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हेच त्यांच्या पुढे आहेत. निवडणुकीचे वारे पाहता गेल्या वर्षाच्या अखेरीसच या कंपन्यांनी भारतावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. वापरकर्ते वाढल्याने अशा माध्यमांची लोकप्रियतादेखील प्रचंड वाढत असून जाहिराती व अन्य मार्गांनी संबंधित कंपन्या यानिमित्ताने स्वत:चे उखळ पांढरे करून घेत आहेत. या सगळ्यामध्ये नेमकी किती उलाढाल झाली ते व्यावसायिक गुपित आताच उघड करण्यास संबंधित कंपन्या राजी नाहीत. तरीही असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया तसेच इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया या दोन संस्थांचा अंदाज सारखा आहे. त्यानुसार डिजिटल मीडियावर निवडणुकीत झालेला खर्च साधारणत: ४०० ते ५०० कोटी एवढा प्रचंड असेल. अर्थात, केवळ व्यावसायिकतेच्या अथवा फायद्या-तोट्याच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहून चालणार नाही. जनमानसावरचा त्याचा प्रभाव हा घटक त्याहीपेक्षा किती तरी पटीने जास्त परिणामकारक आहे. कारण या माध्यमांची व्याप्ती जबरदस्त आहे. त्याद्वारे अत्यंत प्रभावीपणे एकाच वेळी हजारो-लाखो जणांशी संवाद तर साधता येतोच, शिवाय या माध्यमांचे स्वरूप हे बंदिस्त किंवा एकमार्गी नसून खुले आणि परस्परसंवादी आहे. त्याचप्रमाणे संगणक आणि मोबाइलमार्फत ते प्रत्येकाच्या घराघरांत आणि हाताहातांत पोहोचले आहे. म्हणजेच एक प्रकारे प्रत्येक वापरकर्त्याच्या हाती हे नवे साधन आले आहे. त्याचा वापर जो तो आपापल्या पद्धतीने करतो. समविचारी मंडळी या व्यासपीठावर सहजपणे मोठ्या संख्येने एकत्र येऊ शकतात. एकदा असे नेटवर्किंग झाले की, त्यातून बसल्या बसल्या प्रचार-अपप्रचाराचा धुरळा उडवून देणे फारच सोपे जाते. अनेक जण तर केवळ गंमत म्हणून वा उपचार म्हणून असे संदेश, छायाचित्रे किंवा चित्रफिती फॉरवर्ड करत असतात. त्यातून कळत-नकळत एखाद्याचा प्रचार अथवा अपप्रचार होत असतो. असाच अप्रत्यक्ष प्रचार वृत्तवाहिन्यांमार्फतदेखील होत असल्याची बाब अलीकडच्या उदाहरणांनी अधोरेखित झाली आहे. कारण काही प्रमुख नेत्यांच्या सभा विशिष्ट ठिकाणी होत असल्या तरी थेट प्रक्षेपणामुळे त्या घराघरांत जाऊन पोहोचलेल्या असतात. विशेषत: मोदींचे लाइव्ह कव्हरेज हा यंदा वादविषय बनला आहे.  मोदींचा रोड शो आणि एकुणातच ही सगळी इव्हेंट मॅनेजमेंट अगदी कटाक्षाने करण्यात आली होती. साहजिकच देशातील जवळपास सर्व वृत्तवाहिन्यांद्वारे त्याचे थेट प्रक्षेपण झाले.  एकीकडे मतदान सुरू असताना दुसरीकडे दिवसभर वाहिन्यांवर त्यासंबंधीच्या बातम्यांचा ओघ सुरू होता. त्या गोष्टींचा त्या दिवशी हे सारे बघून मतदानासाठी बाहेर पडणार्‌या मतदारांवर काहीच परिणाम होणार नाही, असे कोण म्हणेल? मोदींनी निवडणूक जिंको अगर नको त्यांनी मात्र प्रसार माध्यमे व सोशल मिडिया यांचा वापर कशा प्रकारे आपण करु शकतो हे दाखवून दिले आहे. सत्ताधारी कॉँग्रेस पक्षाला हातात सत्ता असताना जे शक्य झाले नाही ते मोदींनी प्रसिध्दी माध्यमाला हाताशी घेऊन करुन दाखविले. त्याची या देशाच्या इतिहासात नोंद निश्‍चितच होईल.
-------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel