-->
आजारी महाराष्ट्र

आजारी महाराष्ट्र

संपादकीय पान बुधवार दि. २१ सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------- 
आजारी महाराष्ट्र
डेंग्यू व मलेरियासारख्या साथींच्या आजारांनी मुंबईकरांना व महाराष्ट्राला हैराण करून सोडले होतेच आता त्यात आणखी चिकुनगुनियाची भर पडली. मागील वर्षी देशात या आजाराचे चिकनगुनियाचे ३९१ रुग्ण आढळले होते. यंदा सप्टेंबरपर्यंतच ही रुग्णांची संख्या १,०२४ वर गेली आहे. यामध्ये एकटया महाराष्ट्रात चिकुनगुनियाच्या ४३९ रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारितील राष्ट्रीय विषाणूजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम संस्थेने दिली आहे. ही आकडेवारी पाहता हा रोग आपला पाय आता रोवू लागला आहे. सहसा पावसाळ्यानंतर हा रोगांची लागण सुरु होते. जानेवारी २०१६ मध्ये डेंग्यू, लेप्टो, व मलेरिया आजारांनी मुंबईकरांना सळो की पळो करून सोडले होते. पावसाळ्यात या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनाही करण्यात आल्या. राज्यात ऑगस्ट २०१६ पर्यंत मलेरियाचे १५,९२१ रुग्ण आढळले होते. गेल्या वर्षी ही संख्या ३०,२२३ होती. केवळ मुंबईत १ ते १४ सप्टेंबरमध्ये १,०१० रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने मलेरियाविरोधी मोहिम हाती घेतल्याने या वर्षी मलेरिया रुग्णांच्या संख्येत ४७ टक्के घट झाली आहे. राज्यात डेंग्यूच्या २,५८२ तर मुंबईत १२० रुग्णांची नोंद झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. चिकुनगुनियाची वाढती रुग्णसंख्या पाहता नॅशनल इन्स्टिटयूट व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) संस्था याचा अभ्यास करणार आहे. या संस्थेकडून सर्वेक्षणाद्वारे ज्या भागात चिकुनगुनियाचे अधिक रुग्ण आढळून आले असतील तेथे स्वच्छता व बांधकाम सुरू असलेल्या जागांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या दिल्या आहेत.केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात चिकुनगुनियाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २०१४ मध्ये देशात १६,०४९ संशयित चिकुनगुनियाचे रुग्ण सापडले होते त्यापैकी २,५७१ रुग्णांना आजार असल्याचे निदान झाले होते. यात २२२ रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. तर २०१५ मध्ये २७,५३३ रुग्ण तपासणीत ३,३४२ जण या आजाराने बाधित होते. यातील २०७ रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. तर यंदा महाराष्ट्रात ही संख्या १,०२४ वर पोहोचली आहे. तर कर्नाटकात हीच रुग्णसंख्या ९,४२७ व दिल्लीत १,७२४ इतकी आहे. डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनिया या रोगांचे प्रमाण यंदा झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रात आजारपणाचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर याचा मोठा भार पडत आहे. एकतर डॉक्टरांची कमतरता, जिकडे डॉक्टर आहेत तिकडे औषधे नाहीत अशा अवस्थेत आपल्याकडची सरकारी रुग्णालये आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असल्यमुळे औषधांची बोंबच असते. अशावेळी सर्वसामान्य लोकांसाठी या रोगांवर मात करण्यासाठी ही रुग्णालये उपयोगी पडतीलच असे नव्हे. त्यामुळे त्यांना महागड्या खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. दरवर्षी हे तीनही रोगाच्या साथी एकदमच येतात. मात्र यातून सरकार काही शहाणे होत नाही. हे रोग होऊ नयेत यासाठी जी स्वच्छता बाळगावयास हवी, लोकांमध्ये जागृती करावयास हवी हे केले जात नाही. रोगांची साथ सुरु झाल्यावर सरकारची दरवर्षी धावपळ सुरु होते. यातून ही साथ येऊच नयेत यासाठी काही प्रय्तन होत नाहीत, ही दुदैवी बाब आहे. त्यामुळे राज्यातले हे आजारपण असेच राहाणार असे दिसते.

0 Response to "आजारी महाराष्ट्र"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel