-->
कोकणाची पश्चिम महाराष्ट्राला साद

कोकणाची पश्चिम महाराष्ट्राला साद

संपादकीय पान बुधवार दि. १७ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कोकणाची पश्चिम महाराष्ट्राला साद
कोकणाने आता कोकण रेल्वेच्या माध्यमातून पश्‍चिम महाराष्ट्राला साद घालण्याचे ठरविले आहे. आजवर कोकणातून पश्‍चिम महाराष्ट्राला जाण्यासाठी रस्ते होते. परंतु आता चिपळूण-कराड हा मार्ग होऊ घातल्याने खर्‍या अर्थाने कोकण आता पश्‍चिम महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे. चिपळूण आणि कराड दरम्यान १०३ कि. मी. लांबीच्या व सुमारे ३१९५.६० कोटी रुपये प्रकल्प मूल्य असलेल्या नवीन रेल्वे मार्ग योजनेला गती देण्यासाठी कोकण रेल्वे व शापूरजी पालनजी कंपनी यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी रविवारी सह्याद्री अतिथीगृहात झाल्या आणि यामुळे कोकण व पश्‍चिम महाराष्ट्र जवळ येण्यास मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर विकासाचे एक नवे पर्व या रेल्वेच्या माध्यमातून सुरु होऊ शकते. कोकणचे सुपुत्र व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकल्पाबाबत विशेष रस घेतल्यानेच आता हा मार्ग उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याबद्दल सुरेश प्रभू यांचे विशेष आभार मानावयास हवेत. रत्नागिरी जिल्ह्यातून ३७ किमी, तर सातारा जिल्ह्यात ६६ किमीचा मार्ग जाणार आहे. या मार्गावर कराड, चिपळूणसह विहाले, मुंढे, कोयना रोड, पाटण, शेडगेवाडी, खोडशी ही रेल्वे स्थानके असतील. अशा प्रकारे सह्याद्री पर्वतरांगांतून जाणार्‍या या मार्गामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल. चिपळूण ते कराड हे आताचे रेल्वेचे ४२५ किमीचे अंतर कमी होणार असल्याने प्रवासाचा एक मोठा टप्पा कमी होईल. पर्यावरणाला हानी न पोहोचवता एकूण ४६ किमी लांबीचे अनेक बोगदे येथे तयार केले जाणार आहेत, हे या रेल्वेचे आणखी एक वैशिष्ट्य ठरेल. या प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात अनेक नवे रेल्वे मार्ग आकारास येत आहे. वडसा (देसाईगंज) ते गडचिरोली हा नक्षलग्रस्त भागातील मार्ग, वर्धा- यवतमाळ- नांदेड हा शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रदेशातील मार्ग, तसेच मराठवाडा- प. महाराष्ट्र यांना जोडणारा नगर-बीड हा मार्गही लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे या प्रदेशातील उद्योग, व्यापार व रोजगार वाढून या परिसराच्या विकासाला गती मिळेल. रेल्वेमुळे विकासाला मिळणारी चालना लक्षात घेऊन राज्य शासनाकडून विविध प्रकल्पांसाठी सुमारे १० हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. सध्या राज्य असो की केंद्र सरकार कोणत्याही मोठ्या प्रकल्पासाठी पैसा सरकार देऊ शकत नाही. मात्र हे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी खासगी क्षेत्राचे सहकार्य घेणे आवश्यक ठरते. त्यानुसार, खासगी क्षेत्र, तसेच राज्यांच्या सहकार्याने रेल्वे मार्गांचा विकास हे धोरण स्वीकारत राज्य व केंद्र शासनाच्या सहकार्याने एक कंपनी स्थापन करण्यात येईल. समतोल विकासासाठी राज्यातील प्रत्येक विभागात प्रकल्प सुरु करण्यात येतील. मुंबईसाठी ४० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची सुरुवात झाली आहे. रोहा- मंगलोर हा कोकण रेल्वेचा महत्वाकांक्षी प्रकल्प जनतेच्या सहकार्याने विक्रमी वेळेत पूर्ण झाला. त्याप्रमाणे कराड- चिपळूण प्रकल्पाचे काम लवकर पूर्णत्वास गेले पाहिजे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या रिफायनरीचे काम लवकरच गुहागर येथे सुरु होईल. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूरचा अणूूउर्जा प्रकल्प येथील जनतेचा विरोध मावळून मार्गी लागला आहे. या सर्व प्रकल्पांसाठी रेल्वे मार्गाचा मोठा उपयोग होईल व कोकणच्या विकासाला गती प्राप्त होईल. कोकण रेल्वे सुरु होईन आता पाव शतक लोटले आहे. मात्र येथील कोकणी माणसाने प्रवासाव्यत्रिक्त या रेल्वेचा फारसा फायदा घेतलेला नाही. आता कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आवश्यक ठरले आहे. त्याच जोडीला विद्युतीकरण झाल्यास रेल्वेचा खर्चही कमी होईल. तसेच कोकणाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने ते केव्हाही फायदेशीर ठरेल. कोकण रेल्वे सुरु होऊन पाव शकत लोटले आहे. खरे तर एवढ्यात रेल्वेचे दुपरीकरण व्हायला पाहिजे होते. कोकण रेल्वे ही काही तोट्यात नाही. प्रामुख्याने या मार्गावर होणार्‍या रो-रो सेवेमुळे ही रेल्वे चांगलीच फायद्यात आली. त्यामुळे आता कोकण रेल्वेला अन्य मार्गांशी जोडले जाणे गरजेचे आहे. यातील कोकणातील बंदरे या मार्गाशी जोडली जाणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे घाटमाथ्याशी हा मार्ग जोडला गेल्यास विकासाला वेग येईल. पश्‍चिम माहाराष्ट्रातील अनेक भाग हे विकसीत आहेत. येथून तयार झालेले उत्पादन हे निर्यात करण्यासाठी रेल्वेच्या मार्गाने थेट कोकणातील बंदरात पोहोचू शकते. तसेच बंदरातून आयात झालेला माल या रेल्वेच्या माध्यमातून पश्‍चिम माहाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर नेला जाऊ शकतो. तसेच मुंबई-दिल्ली या कॉरिडॉरचा समारोप हा जवाहरलाल नेहरु बंदरात करण्यात येणार आहे. यातील एक मार्ग देखील कोकण रेल्वेला जोडल्यास येथील विकासाला चालना मिळू शकते. गेल्या काही वर्षात कोकणाने आपल्याकडे आलेल्या प्रकल्पांना विरोधच करण्याचे काम केले. त्यामुळे कोकणी माणसाची भूमिका ही नवीन प्रकल्पांबाबत नकारात्मक आहे अशी एक सर्वसाधारण भूमिका तयार झाली आहे. आता जर कोकणाचा विकास करावयाचा असेल तर या भूमिकाला छेद दिला पाहिजे. अर्थात कोकण रेल्वेचा कोकणी माणसाला अजून अपेक्षित फायदा झालेला नाही. प्रामुख्याने येथे तयार होणारी काजू, आंबा, नारळ ही तयार होणारी पिके मुंबईच्या बाजारपेठेत झपाट्याने पोहोचविण्यासाठी प्रयत्न झालेले नाहीत. त्याचबरोबर येथे काही फुलांची निर्मिती करुन त्याची उलाढाल रेल्वेने करुन शेतकर्‍याला नगदी पिकाचा पर्याय उभा करुन देण्यात आपण यशस्वी ठरलेलो नाही. अजूनही वेग गेलेली नाही. आपण यात बरेच काही करु शकतो. चिपळूण-कराड या नवीन मार्गामुळे घाटमाथा आता कोकणाच्या जवळ आला आहे. यामुळे येथील विकासाला निश्‍चित हातभार लागेल.
---------------------------------------------------------

0 Response to "कोकणाची पश्चिम महाराष्ट्राला साद"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel