-->
भाजपाचा हनिमून संपला / निर्लेपची बदललेली ओळख

भाजपाचा हनिमून संपला / निर्लेपची बदललेली ओळख

गुरुवार दि. 21 जून 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
भाजपाचा हनिमून संपला
भाजपा व पीडीपी यांचा जम्मू-काश्मीरातील सत्तेचा हनिमून तीन वर्षानंतर आता अखेर संपला आहे. मुळातच हे लग्न केवळ सत्तास्थापन करणे या हेतूने झालेले असल्यामुळे तसेच हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता करणे हेच मुळात अनैसर्गिक असल्यामुळे अनेकांना आश्‍चर्य वाटले होते. परंतु प्रदीर्घ काळ असा हा हनिमून चालला. शेवटी अतिरेक्यांचा हैदोस आवाक्याबाहेर गेल्यावर आपण बदनाम होण्यापेक्षा येथून आता सत्ता सोडून यातून पावित्र झालेले बरे अशी शहजोगपणाची भूमिका घेत अखेर भाजपाने या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता तेथे राज्यपालांची राजवट आली आहे. नव्याने अन्य कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होणे सध्या तरी अशक्य वाटत आहे. कारण सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तरीही त्यांची सत्ता स्थापण्याचे संख्याबळ होत नाही. त्यासाठी त्यांना पीडीपीमध्ये फूट पाडावी लागेल. परंतु त्यासाठी काही काळ जाण्याची आवश्यकता आहे. कदाचित काही कालांतराने नव्याने निवडणुका घेण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो. आता तेथे भाजपा आपण सत्तेत असलो तरी कसे वेगळे आहोत, आपण अतिरेक्यांच्या कारवायंच्या विरोधात कसे निर्णय घेण्यास सांंगितले होते, असे पसरवून आपली यातून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करील. परंतु काश्मिरमधील हे अपयश केवळ राज्य सरकारचेच नाही तर केंद्रातील सरकारचेही आहे. यात भाजपा सरकारचे अपयश कितीही लपविले गेले तरी त्यांना लपविता येणार नाही. कारण या संवेदनाक्षम राज्यात सत्तेत असणे ही एक मोठी जबाबदारी आहे. व ही केवळ राज्य सरकारची जबाबदारी नाही तर केंद्र सरकारही त्याला तेवढेच जबाबदार ठरणार आहे. रमझानच्या काळात शस्त्रसंधी करण्याची योजना ही मुख्यमंत्री मेहबुबा सईद यांची असली तरीही भाजपाने त्याला नाईलाजास्तव मुक संमती दिली होती. त्यामुळे हा निर्णय संयुक्तरित्या घेतला होता. त्याची जबाबदारीही आता संयुक्तरित्या भाजपाने घेतली पाहिजे. आपल्या तेथे झालेल्या चुका प्रांजळपणे मान्य केल्या पाहिजेत. काश्मिरची परिस्थिती कशा प्रकारे हाताळायची याचा कालबद्द कार्यक्रम आखण्याची आवश्यकता होती. त्यासाठी आवश्यकता भासल्यास देशविघातक शक्तींनाही चर्चेसाठी आमंत्रित करावे लागते. इंदिरा गांधींनी ज्याप्रकारे पंजाबमध्ये अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी वेळ पडल्यावर लष्कराचाही वापर केला, मात्र नंतर त्यांना चर्चेला आमंत्रित करुन प्रश्‍न सोडविण्याच्या दिशेने पावले टाकली. अर्थात त्यासाठी इंदिराजींसारखे समर्थ, कणखर नेतृत्व असे धाडसी निर्णय घेऊ शकते. आता तसे काही छप्पन इंचाची छाती असणारे मोदी करतील अशी अपेक्षा होती. मात्र हा प्रश्‍न सुटण्याएवजी काश्मिर प्रश्‍नाचा पूर्णपणे विचका झाला आहे. 
 
निर्लेपची बदललेली ओळख
नॉनस्टिक भांडी उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी तसेच मराठी माणसाची कंपनी अशी दुहेरी ओळख असलेली निर्लेप आता आपली ही ओळख गमावून बसणार आहे. कारण जी.एस.टी. व वाढती स्पर्धा यामुळे ही कंपनी विकण्याचा निर्णय या कंपनीचे प्रवर्तक भोगले कुटुंबाने घेतला. ही कंपनी सुमारे शंभर कोटी रुपयांना बजाज इलेक्ट्रीकल्स या कंपनीला विकण्यात आल्याची बातमी आली आणि अनेकांनी हळहळ व्यक्त केली. खरे तर व्यवहारिक दृष्टीकोन पाहिल्यास ही कंपनी भविष्यात अनेक आर्थिक अडचमींना सामोरे गेली असती व त्यानंतर ती विकणे कठीण गेले असते. मात्र त्यापूर्वी विकण्याचा धूर्त निर्णय घेतला गेला. केवळ भावनेच्या आहारी न जात व्यावसायिक दृष्टीकोन या कुटुंबाने घेतला त्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. यंदा हे कंपनीचे स्थापनेचे पन्नासावे वर्ष होते. जगभर नॉनस्टिक कुकवेअरची नवी बाजारपेठ आकारास येत असताना मराठी माणसाने स्वत:च्या उत्पादनासाठी संधी निर्माण करणे हे काम सोपे नव्हते; परंतु हे आव्हान नानासाहेब भोगले आणि निर्लेप परिवाराने लीलया पेलले आणि हा वारसा राम भोगले यांनी पुढे चालवला. या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देत युरोपात आपली उत्पादने निर्यात करणारी निर्लेपही या क्षेत्रातील पहिली भारतीय कंपनी ठरली. निर्लेपकडे मराठी माणसाने घडवलेला ब्रँड म्हणून घराघरात आजही आत्मीयतेने पाहिले जाते. प्रत्येक कुटुंबातील किमान तीन पिढ्यांचे तरी निर्लेपशी भावनिक सख्य निर्माण झालेले आहे. गृहिणांमधील हा एक लोकप्रिय ब्रँड होता. गेले तीन पिढ्या भोगले कुटुंबाने ही कंपनी वाढविली. परंतु आता जागतिककरणाच्या युगात गणिते पार बदलली आहेत. या क्षेत्रात विविध उत्पादनांची वाढलेली स्पर्धा व जी.एस.टी.सारखी नवीन कर प्रणाली यात अनेक लहान व मध्यम उद्योगांचा जीव गुदमरत चालला आहे. त्यातून निर्लेप हा ब्रँड देखील सुटला नाही. शेवटी यातून वेळीच बाहेर पडण्याचा निर्णय प्रवर्तकांनी घेतला. सध्याच्या आर्थिक वातावरणात अनेक लहान व मध्यम आकारातील कंपन्यांना स्पर्धेच्या वातावरणात व्यवसाय करणे कठीण जात आहे. अशा वेळी त्यांना कोणत्यातरी मोठ्या उद्योगाशी विलीन होणे किंवा त्यांच्याशी सहकार्य करार करुन एकत्रित काम करणे गरजेचे ठरले आहे. कॅम्लिन या दांडेकर समूहाच्या कंपनीने देखील सत्तर वर्षाचा प्रवास पार केल्यावर जपानच्या कोकियो समूहाशी करार करुन त्यांना आपले बहुतांशी भांडवल विकून आपल्या कंपनीतील भागीदारी दिली होती. आता निर्लेपवर हीच पाळी आली आहे.
--------------------------------------------------------

0 Response to "भाजपाचा हनिमून संपला / निर्लेपची बदललेली ओळख"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel