-->
बलुची अस्त्राची घाई?

बलुची अस्त्राची घाई?

संपादकीय पान गुरुवार दि. १८ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
बलुची अस्त्राची घाई?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लाल किल्यावरील भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख केला आणि त्यावरुन आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अर्थात अशी प्रतिक्रिया उमटणे अपेक्षितच होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी आपल्या भाषणात याचा उल्लेख केल्याने ते बलुचास्तानचा उल्लेख करणारे पहिले पंतप्रधान आहेत, असा मोदी भक्तांनी प्रचार सुरु केला. मात्र हा प्रचार काही खरा नाही. यापूर्वी पंतप्रधानपदी असताना संसदेत डॉ. मनमोहनसिंग यांनी बलुचिस्तानचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता आणि त्याला त्यावेळी भाजपाने आक्षेप घेतला होता, हे देखील विसरता येणार नाही. असो. भाजपाची सत्तेत असताना व विरोधात असताना प्रत्येकवेळी भूमिका बदललेली आहे. आता बलुचिस्ताबाबतही असेच झाले आहे. इराण, पाकिस्तान व अफगाणिस्तान यांची सीमा असलेला व सध्या पाकिस्तानात असलेला बलुचिस्तान हा पाकिस्तानात कधीच मनाने एक झाला नाही. कारण १९४७ साली ब्रिटीशांनी भारताची फाळणी केली त्यावेळी बलुचिस्तानाला पाकिस्तानात विलीन व्हायचे नव्हते. आम्हाला भारतात समाविष्ट करा किंवा स्वतंत्र देश म्हणून द्या, पाकिस्तानात रहायचे नाही, अशी त्यांची त्यावेळी स्पष्ट भूमिका होती. मात्र ब्रिटीशांनी त्यांचे काही एैकले नाही. बलुचि नेते खान अब्दुल गफार खान यांनी तर पाकिस्तानात सामिल होण्यास शेवटपर्यंत नकार दिला होता. सध्या हा बलुच प्रांत हा पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत आहे. पाकिस्तानच्या ४१ टक्के भूभाग त्यांनी व्यापला असून जेमतेम दीड कोटी लोकसंख्या आहे. आर्थिकदृष्टया या प्रांताचे महत्व म्हणजे पाकिस्तानातील एकूण उपलब्ध गॅसच्या ६० टक्के हिस्सा बलुचमध्ये आहे. त्यामुळे हा प्रदेश पाकिस्तानच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. बलुचिस्तानची मागणी ही फार जुनी आहे, मात्र फाळणीच्यावेळी ती प्रकर्षाने बाहेर आली. अर्थात सध्या बलुचिस्तानात याबाबत संघर्ष नसला तरी यातील स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करमारे नेते हे बाहेरच्या देशातून आपली मागणी पुढे रेटत असतात. पाकिस्तानने येथे केलेल्या अत्याचाराचा पाढा गेल्याच महिन्यात अमेरिकन सिनेटमध्येही वाचण्यत आला होता. पाकिस्तान मात्र यथे स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी रुजूच देत नाही. त्यामुळे येथील लोकांवर अत्याचार करण्याचे सत्र सुरु आहे. अर्थात त्यामुळे स्वतंत्र बलुचिस्तानचा लढा हा विदेशातून लढविला जात आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख केल्याने हा प्रश्‍न जगाच्या चव्हाट्यावर आला आहे. मात्र असे केल्याने पाकला चाप बसेल की आपल्यावरच हे बुंगरँग उलटेल, हे भविष्यात पहावे लागेल. सध्या पाकिस्तानचा आपल्याकडे घुसखोरीचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारे एक छुपे युध्दच लढविले जात आहे. आपले सीमेवरील सैनिक दररोज धारातीर्थी पडत आहेत. याासठी पाकला वचक बसण्यासाठी म्हणून मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख करुन पाकला चाप लावण्याचा प्रयत्न केला आहे की, खरोखरीच भारताला बांगला देशाच्या धर्तीवर पाकपासून बलुचिस्तान वेगळा काढावयाचा आहे? ज्या प्रकारे बांगला देश स्वतंत्र करुन त्याकाळी इंदिरा गांधी हिरो झाल्या होत्या त्याधर्तीवर मोदींना बलुचिस्तान वेगळा काढून सध्याच्या काळातील हिरो व्हायचे आहे, या प्रश्‍नांची उत्तरे सध्या तरी शोधणे अवघड ठरणार आहे. मात्र बांगला देश व बलुचिस्तान यांच्याशी तुलना करता येणार नाही. कारण या दोन्ही प्रश्‍नांचे स्वरुप वेगळे आहे. पूर्व पाकिस्तान पासून तोडून बांगला देश स्वतंत्र करण्यात आला, त्यामागची कारणे पाहिली पाहिजेत. एक महत्वाचे कारण म्हणजे बांगला देशाची सीमा आपल्याला जोडून आहे. तशी बलुचिस्तानची सीमा आपल्याला लागून नाही. बांगला देशातील निर्वासित आपल्याकडे आले होते व त्यांचा मोठा प्रश्‍न आपल्याला भेडसावित होता. पर्यायाने त्यांच्या निर्वासितांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर ताणही आला होता. सध्या बलुचिस्तानात अशी काही परिस्थिती नाही. सध्या तेथे स्वतंत्र बलुचिस्तानचे आंदोलन पूर्णपणे थंडावले आहे. तसेच आपल्याकडे त्यांचे निर्वासितही आलेले नाहीत. इंदिरा गांधीनी बांगला देश स्वतंत्र्य करण्यासठी जागतिक पातळीवर मोहीम हाती घेतली होती. तो त्यांच्या राजकारणाचा एक भाग होता. त्यासाठी त्यांनी आपले कट्टर राजकीय विरोधक जयप्रकाश नारायण यांना भारताची बाजू मांडण्यासाठी विविध देशात पाठविले होते. जागतिक स्तरावर अशा प्रकारे पाठबळ मिळविल्यावर इंदिरा गांधींनी हे धाडसी पाऊल उचलले होते. तीच परिस्थीती बलुचिस्तानाची नाही, त्यामुळे मोदींनी तसे धाडस केल्यास ते देशाच्या आंगलटी येऊ शकते. खरे तर लाल किल्ला हा जागा अशा प्रकारचे प्रश्‍न उपस्थित करण्याची जागा नव्हे. त्यामुळे मोदींचे पाऊल पहिलेच चुकीचे पडले आहे. आपली परराष्ट्र निती ही विविध बाबीचा विचार करुन आखली जाते. त्यात केवळ पाकिस्तानला धडा शिकविणे हे एकमेव ध्येय असू शकत नाही. पाकिस्तानात सैन्य घुसवा ही घोषणा लोकप्रिय असू शकते परंतु त्यात आपले हसेच होण्याची शक्यता आहे. एक तर मोदी आल्यापासून त्यांनी आपल्या प्रत्येक शेजार्‍याला म्हणजे नेपाळ, श्रीलंका, म्यानमार यांना दुखावले आहे. भारत हा मोठा भाऊ असला तरी आपल्या शेजारच्या लहान राष्ट्रंना ताकद देत चुचकारायचे असते त्यांच्यावर दादागिरी केल्यास त्यांना चीन आपल्याबाजूने खेचू शकतो, हे आपण आता पाहिले आहे. त्यामुळे आपले परराष्ट्र धोरण हे जागतिक राजकारण, अर्थकारण, व्यापार-उदीम यांचा विचार करीत आखले गेले पाहिजे. त्यात सर्वात महत्वाचा म्हणजे पंचशिल तत्वातील पहिले महत्वाचे कलम म्हणजे कोणताही प्रश्‍न दोन राष्ट्रंनी चर्चेने सोडवायचा आहे, त्यात तिसर्‍या प्रामुख्याने कोणत्याही बड्या राष्ट्राचा हस्तक्षेप असता कामा नये, हे कलम सर्वात महत्वाचे आहे. बलुचिस्तानचा प्रश्‍न आपण जर हाती घेतला तर त्यात अमेरिका येणारच आहे, त्यामुळे आपण आपल्या धोरणाला हरताळ फासणार आहोत. त्यामुळे पाकला धमकाविण्यासाठी बलुचि अस्त्र मर्यादीत स्वरुपात उपयोगी ठरु शकते मात्र स्वतंत्र बलुचिस्तान करण्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर आपल्या आंगलटी येऊ शकते.
------------------------------------------------------  

0 Response to "बलुची अस्त्राची घाई?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel