-->
दहिहंडीला वेसण

दहिहंडीला वेसण

संपादकीय पान शुक्रवार दि. १९ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
दहिहंडीला वेसण
मुंबई उच्च न्यायलयाने दिलेला दहिहंडीबाबतचा निर्णय अखेर सर्वोच्च न्यायलयाने कायम ठेवल्याने आता दहिहंडीला यंदा चांगलीच वेसण लागणार आहे. १८ वर्षाखालील मुलांना दहिहंडी खोळण्यासाठी प्रतिबंध तसेच २० फुटाहून जास्त उंचीचे मनोरे उभारण्यास मनाई हे नियम आता लगू झाल्याने अनेक गोविंदांची मंडळे आता नाराज झाली आहेत. परंतु सर्वसामान्य जनता या निर्णयाचे स्वागतच करील. याचे महत्वाचे कारण म्हणजे सध्या दहिहंडीला एक तर बाजारी स्वरुप आलेले आहे व त्यामुळे उंच मनोरे उभारण्याच्या स्पर्धेत अनेक गोविंदाचे जीव जातात किंवा अनेक गोविंदा कायम स्वरुपी अपंग होतात. अशा गोविंदाची जबाबदारी घेण्यास कोणीच पुढे येत नाही असे अनेकदा आढळले आहे. मध्यंतरी काही गोविंदानी विमा काढण्याचे जाहीर केले होते परंतु त्याचे प्रत्यक्षात काहीच घडले नाही. सरकारही त्यांना वार्‍यावरच सोडते. अशा वेळी या उंच मनोर्‍यांवर बंदी घालणे हाच एकमेव उपाय ठरतो. सध्याच्या न्यायालयाच्या निर्णयानुसार, वीस फुटांपेक्षा जास्त उंचीचे मनोरे उभारता येणार नाहीत. म्हणजे केवळ चारच थर उभारता येतील. एवढा मनोरा उभारण्यात फारसा धोका नाही. त्याचबरोबर १८ वर्षाखालील मुलांना यात सहभागी होण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जे सात-आठ थर उभारतात त्यांच्या मनोर्‍याच्या टोकावर हे बाल गोविंदा असतात व त्यांच्या अपघाताच्या शक्यता जास्त असतात. अशा प्रकारे बाल गोविंदांच्या जीवाशी खेळून ही स्पर्धा करण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागतच झाले पाहिजे. गेल्या वर्षी सरकारने गोविंदा हा साहसी खेळ म्हणून जाहीर केला. याची फक्त घोषणाच केली. पुढे काहीच झाले नाही. सरकार जर या खेळाला साहसी खेळ म्हणते व त्याला खेळाचा दर्ज्या देऊ इच्छिते तर त्यासाठी तशी तयारी करुन घेण्याची आवश्यकता आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जर हा साहसी खेळ आहे तर तो खुल्या मैदानात खेळला गेला पाहिजे, तो रस्त्यात खेळण्याची जागा योग्य नव्हे. तसेच या खेळाच्या प्रशिक्षणासाठी सरकारने काही खास प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सध्याचे या उत्सवात डी.जे लावून जे विभत्सीकरण होते आहे ते साहसी खेळ म्हणून जाहीर केल्यावर तसेच चालू ठेवायचे का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. कारण एका त्याला खेळ म्हणून संबोधिले की या सर्व बाबी थांबल्या पाहिजेत. अर्थात सध्याच्या खेळाकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे तर दहिहंडिच्या बाबतीत सरकार काय लक्ष घालणार हा प्रश्‍न उरतोच. अनेक मंडळांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करणे स्वाभाविक आहे, परंतु या खेळाला चांगल्या शिस्तीची गरज आहे, जेवढे उंच थर तेवढा हा खेळ चांगला ही समजूत आधी काढून टाकली पाहिजे. हे काम विविध गोविंदा मंडळे व राजकीय कार्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे.

0 Response to "दहिहंडीला वेसण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel