-->
उत्तरप्रदेशातील आव्हान कोण पेलणार?

उत्तरप्रदेशातील आव्हान कोण पेलणार?

रविवार दि. २४ जुलै २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
उत्तरप्रदेशातील आव्हान कोण पेलणार?
-----------------------------------------
एन्ट्रो- उत्तरप्रदेशात कॉँग्रेसने शीला दिक्षीत यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केले आहे. शीला दिक्षीत यांचे नाव जाहीर करण्यामागे कॉँग्रेसची अनेक उद्दिष्ट आहेत. एक तर त्या मूळच्या उत्तरप्रदेशातील असून त्यांचे सासरे हे हे माजी मुख्यमंत्री होते. दीक्षीत ब्राह्मण असल्याने कॉँग्रेसला आपली जुनी व्होट बँक पुन्हा एकदा मिळवू असा विश्‍वास वाटतो. त्याचबरोबर शीला दिक्षीत या जन्माने खत्री आहेत, त्यामुळे या जातींनाही त्या आपल्याकडे खेचू शकतात. एक महिला असल्यामुळे मायावतींना एक पर्याय देण्याचा यातून प्रयत्न होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे शीला दिक्षीत या दिल्लीच्या तीनवेळा मुख्यमंत्री होत्या व त्यांनी दिल्लीत चांगली कामे केली आहेत. देशाच्या या राजधानीत त्यांनी अनेक पायाभूत सुविधांची कामे केली. त्यांच्यादृष्टीने त्यांच्या विरोधात जाणार्‍या बाबी म्हणजे त्यांचे वय ७८ वर्षे आहे व दिल्लीतील कॉमनवेल्थ गेम्सच्या काळातील भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर आरोप झाले आहेत. परंतु दिल्लीतील विकासाचे मॉडेल त्यांनी जे विकसीत केले ते उत्तरप्रदेशातील लोकांपुढे ठेवता येऊ शकते...
------------------------------------------------------
देशातील आकारमानाने सर्वात मोठे असलेले राज्य उत्तरप्रदेशातील आगामी काळात येऊ घातलेल्या निवडणुकांनी देशातील राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपा असो किंवा कॉँग्रेस तसेच उत्तरप्रदेशातील सध्याची सत्ताधारी समाजवादी पार्टी किंवा विरोधी पक्ष असलेल्या बहुजन समाज पार्टीच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे. भाजपाला गेल्या वेळी भरभरुन मते व जागा या राज्यातून जिंकता आल्या होत्या. यावेळी देखील त्यांना हा कल कायम ठेवता येईल का असा सवाल आहे. भाजपासाठी यावेळी मात्र राज्यात आव्हानाची स्थिती आहे. कारण खुद्द पंतप्रधानांच्या मतदारसंघात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला सपाटून मार खावा लागला होता. त्यामुळे पंतप्रधानानांची लोकप्रियता घसरली आहे. भाजपा यातून कितपत यशस्वी होतो हे पहावे लागेल. तसेच गेली २७ वर्षे राज्यात सत्तेत नसलेल्या कॉँग्रेस पक्षाची सध्या उत्तरप्रदेशात दयनीय अवस्था आहे. यात सुधारणा होण्यासाठी त्यांनी आखलेली रणनिती यावेळी खरोखरीच कामी येईल का, असा प्रश्‍न आहे. कॉँग्रेससाठी राज्यातील ही अस्तित्वाची लढाई आहे. कॉँग्रेससाठी एकेकाळी हा बालेकिल्ला होता. नरसिंहराव व मनमोहनसिंग बगळता कॉँग्रेसचे सर्व पंतप्रधान हे या राज्यातून आलेले आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या समाजवादी पक्षाला पुन्हा सत्तेत येणे अवघड वाटत आहे कारण कामाच्या जोरावर ते सत्तेत येऊ शकत नाहीत. अर्थातच त्यांनी नजरेत भरेल अशी काही कामगिरी केलेली नाही. त्यामुळे समाजवादी पक्षासाठी ही निवडणूक अवघड जाणार आहे. मायावतींच्या बहुजन समाज पक्षासाठी यावेळी अनुकूल परिस्थिती असल्याची चर्चा जोरात आहे. मायावतींनी राज्यात यापूर्वी दलित-मुस्लिम-ब्राह्मण यांची मोट बांधून सोशल इंजिनिअरिंगचा एक चांगला प्रयोग केला होता व त्यात त्यांना यश लाभले होते. तोच प्रयोग ते यावेळी राबवतील असा अंदाज आहे. यावेळी कॉँग्रेसने या निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांना निवडणुकीची व्यूहरचना आखण्यासाठी नियुक्त केले आहे. याच प्रशांत किशोर यांनी भाजपासाठी मध्यवर्ती निवडणुकीत व बिहारमधील निवडणुकीत नितीश कुमार यांच्यासाठी काम केले होते. या दोघांनाही यशाच्या शिखरावर नेऊन ठेवण्यात किशोर हे यशस्वी ठरले होते. आता कॉँग्रेसला त्यांच्यामुळे यश कितपत मिळते ते पहावे लागेल. असो. कॉँग्रेसने यावेळी सर्वात प्रथम मुख्यमंत्रीपदाचा आपला उमेदवार जाहीर म्हणून शीला दिक्षीत यांचे नाव जाहीर करुन सर्वच पक्षात बाजी मारली आहे. कॉँग्रेसच्या इतिहासात अशा प्रकारे मुख्यमंत्री घोषीत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी दिक्षीत यांचे नाव जाहीर होण्याअगोदर राहूल गांधी, प्रियांका गांधी यांची नावेही चर्चेत होती. परंतु या नावाला बगल देण्यात आली. शीला दिक्षीत यांचे नाव जाहीर करण्यामागे कॉँग्रेसची अनेक उद्दिष्ट आहेत. एक तर त्या मूळच्या उत्तरप्रदेशातील असून त्यांचे सासरे हे हे माजी मुख्यमंत्री होते. दीक्षीत ब्राह्मण असल्याने कॉँग्रेसला आपली जुनी व्होट बँक पुन्हा एकदा मिळवू असा विश्‍वास वाटतो. त्याचबरोबर शीला दिक्षीत या जन्माने खत्री आहेत, त्यामुळे या जातींनाही त्या आपल्याकडे खेचू शकतात. एक महिला असल्यामुळे मायावतींना एक पर्याय देण्याचा यातून प्रयत्न होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे शीला दिक्षीत या दिल्लीच्या तीनवेळा मुख्यमंत्री होत्या व त्यांनी दिल्लीत चांगली कामे केली आहेत. देशाच्या या राजधानीत त्यांनी अनेक पायाभूत सुविधांची कामे केली. त्यांच्यादृष्टीने त्यांच्या विरोधात जाणार्‍या बाबी म्हणजे त्यांचे वय ७८ वर्षे आहे व दिल्लीतील कॉमनवेल्थ गेम्सच्या काळातील भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर आरोप झाले आहेत. परंतु दिल्लीतील विकासाचे मॉडेल त्यांनी जे विकसीत केले ते उत्तरप्रदेशातील लोकांपुढे ठेवता येऊ शकते. उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्येच्या १० टक्के आणि एकूण मतदारांच्या वीस टक्के मतदार ब्राह्मण आहेत. भाजपचा पर्याय ठसठशीतपणे पुढे आल्यानंतर कॉंग्रेसचे हे पारंपरिक मतदार भाजपकडे वळले. मात्र भाजपाची ही मते गेल्या काही वर्षात घसरत आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची ब्राह्मण मतं कमी झाली आहेत. २००२, २००७, २०१२ या निवडणुकांमध्ये ती अनुक्रमे ५०, ४४ आणि ३८ टक्क्यांवर घसरली आहेत. २०१२ च्या निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टी आणि बसपला प्रत्येकी १९ टक्के ब्राह्मण मतं मिळाली होती. यामुळे कॉंग्रेसने या मतदारांवर लक्ष केंद्रित करावं असा सल्ला कॉंग्रेसला प्रशांत यांनी दिला आहे. कॉंग्रेसमध्ये यावर गंभीरतेने विचार झाला. त्याचबरोबर कॉँग्रेस यावेळी प्रियांका गांधींना प्रचारात सक्रियपणे उतरविणार आहे. लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघात राहुल गांधींना ४,०८,६५१ मतं मिळाली असली तरी स्मृती इराणींना ३,००,७४८ मतं मिळाली होती ही बाब नजरेआड करता येणार नाही. आता भाजपाला मागचीच मते शंभर टक्के मिळणार नाही हे खरे असले तरी भाजपा-कॉँग्रेस-समाजवादी पार्टी-बहुजन समाज पार्टी यांच्यांतील लढत मोठी आकर्षक ठरणार आहे. यात बाजी कोण मारणार हा सवाल आहे. कॉँग्रेस या राज्यात सत्तेवर येण्यापेक्षा आपले स्थान किमान दोन क्रमांकावर कसे राहिले हे पाहाण्याचा प्रयत्न करील. तसे जर प्रत्यक्षात उतरले तर कॉँग्रेससाठी एक मोठी कमाई ठरु शकते. मायावती व कॉँग्रेसचे भावी सरकार येथे येऊ शकते. अर्थात या जर तर च्या गोष्टी झाल्या. अजून घोडामैदान बरेच पुढे आहे. सध्यातरी उत्तरप्रदेशातील निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे.
-------------------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "उत्तरप्रदेशातील आव्हान कोण पेलणार?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel