-->
हे कसले आपत्ती व्यवस्थापन?

हे कसले आपत्ती व्यवस्थापन?

संपादकीय पान गुरुवार दि. ११ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
हे कसले आपत्ती व्यवस्थापन?
महाडच्या सावित्री नदीवरील दुर्घटनेस आठवडा लोटला आहे. तरी देखील अजून सर्व मृतदेह हाती लागलेले नाहीत. माणूस जीवंत मिलण्याची आशा आता संपली आहे परंतु त्यांचे मृतदेह तरी मिळावेत अशी नातेवाईकांची रास्त इच्छा आहे. मात्र आपल्याकडील प्रशासन ही इच्छा अजून काही पूर्ण करु शकलेले नाही. मृतांच्या नातेवाईकांच्या भावनांचा कडेलोट आता झाला आहे. ही घटना घडून गेल्यानंतर पावसाचा जोरही आता ओसरला आहे अशा वेळी जादा मनुष्यबळ वाढवून या आपत्तीवर मात करण्यासाठी प्रशासन खरे तर पुढे सरसावले पाहिजे. मात्र असे काही झालेले नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन हेच की काय असा सवाल आहे. यात नेमके किती लोक मरण पावले याचाही ठोस आकडा हाती नाही. नेमक्या किती गाड्या यात वाहून गेल्या याचा मागमूसही नाही. सगळेच बे भरवशाचे काम झाले आहे. सध्या फक्त मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी येथे येऊन दर्शन घेऊन जात आहेत. मात्र यामुळे तपास कार्यात अडथळेच वाढत आहेत. कारण त्यांच्या सुरक्षिततेसाठी ताफा वापरावा लागत आहे. सेल्फीचा छंद असणार्‍यासंाठी ही चांगली संधी असली तरीही त्यामुळे प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे आता या ठिकाणी व्ही.आय.पी.नी जाणे टाळावे हे उत्तम. आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे, असे सांगण्यात येत असले तरी, ठोस काही होत नाही असे का, असा सवालही आपद्ग्रस्तांनी केला आहे व त्यांचा हा सवाल रास्तच म्हटला पाहिजे. शोधकार्यातील कर्मचारी आपापल्या परीने काम करीत आहेत. त्यांची चांगली व्यवस्था ठेवली जात नाही. अथक काम केल्याने त्यांचे पाय सुजले आहेत. थकलेल्या यंत्रणेच्या जागी केंद्रीय स्तरावरून आणखी मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे. नदीतून पार समुद्राच्या तोंडापर्यंत शोध कार्य करणे ही बाब सोपी नाही. त्यासाठी सध्याचे मनुष्यबळ अपुरे पडत असेल तर ते वाढविण्याची गरज आहे. गेले आठवडाभर काम करणार्‍यांना थोडी विश्रांती दिल्यास नवीन लोक अधिक जोमाने काम करु शकतील. एकीकडे शासकीय पातळीवर शोधकार्य सुरु असताना मृतांच्या नातेवाईकांसाठी व शोध मोहिमेत सहभागी झालेल्यांसाठी अंजुमन दर्दमंदाने तालीम ए तरक्की या ट्रस्टने राहण्याची व जेवण्याची सोय केली आहे. गेले आठवडाभर या संस्थेच्या वतीने दररोज सुमारे ५०० ते ६०० लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली जाते. नातेवाईक, शोधकार्यातील जवान, पोलिस, शासकीय कर्मचारी यांच्यासाठी जेवणापासून ते नाश्ता व राहाण्याची व्यवस्था करणे ही काही सोपी बाब नाही. अशा या संकट काळी या संस्थेने केलेल्या कार्यामुळे जाती-धर्माच्या भिंती सहजरित्या गळून पडल्या आहेत. यापूर्वी देखील या संस्थेने अशी कामे केली आहेत. ही दुर्घटना घडल्यानंतर केवळ अर्ध्या तासात या संस्थेचे कार्यकर्ते तेथे पोहोचले व त्यांनी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या लोकांसाठी बिस्किटे व पाण्याची व्यवस्था केली. खरे तर तोपर्यंत शासकीय यंत्रणाही इथपर्यंत पोहोचली नव्हती. अंजुमनचा हा भाईचारा सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरावा.  

0 Response to "हे कसले आपत्ती व्यवस्थापन?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel