-->
व्याजदर स्थिरच

व्याजदर स्थिरच

संपादकीय पान बुधवार दि. १० ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
व्याजदर स्थिरच
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी कारकिर्दीतील शेवटचा पतधोरण आढावा सादर केला. यात अपेक्षेनुसार व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट ६.५० टक्क्यांवर व रिव्हर्स रेपो रेट ६ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. तसेच सीआरआर ४ टक्के आणि एसएलआर २१.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. मॉन्सूनची कामगिरी चांगली असली तरी चलनवाढीचा दर वाढल्याने द्वैमासिक पतधोरणात व्याजदर जैसे थेच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. विद्यमान गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या कारकिर्दीतील हे अखेरचे पतधोरण होते. यापुढील पतधोरण हे ४ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून त्यावेळी नवीन गव्हर्नर आलेले असतील. २०२१ पर्यंत महागाईचा दर ४ टक्क्यांवर नियंत्रित करण्याचे धोरण सरकारने गेल्याच आठवड्यात जाहीर केले. परंतु महागाई जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत व्याजदरात कपात होणे काही शक्य वाटत नाही. सरकार अशा अनेकदा घोषणा करते परंतु त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात करणे ही काही सोपी बाब नसते. त्यामुळे सरकारचे अनेक अंदाज कोसळत असतात. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना स्वतंत्रपणे काम करण्याची मुभा दिली गेली पाहिजे. रघुराजन हे स्वतंत्र बाण्याचे होते त्यामुळे कोणतेही दबाव पत्करुन राजकीय फायद्यासाठी निर्णय घेणे त्यांना पसंत नव्हते. अशा पार्श्‍वभूमीवर त्यांनी राजीनामा दिल्याने नाराजी व्यक्त झाली आहे. यातून एक चुकीचा संदेश मोदी यांच्या सरकारबद्दल गेला. मात्र रघुरामन आता लवकरच पायउतार होणार असले तरीही त्यांनी आखलेली धोरणे सरकारला चालूच ठेवावी लागणार आहेत. सध्या सरकारच्या जमेची बाजू म्हणजे यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्याचबरोबर खनिज तेलाच्या किंमती ६० डॉलरच्या आसपास स्थिरावल्या आहेत. जगात मंदी असली तरीही आपल्याकडे त्याची फारशी झळ पोहोचलेली नाही. यंदा चांगल्या पावसाळ्यामुळे पिक चांगले आल्यामुळे खरेदीचा ओघ वाढणार आहे, अशा स्थितीत चलनवाढ रोखणे सरकारसाठी मोठी कसोटी ठरणार आहे. सध्या व्याजदर स्थिर असले तरी भविष्यात या दरात काही मोठी घसरण होण्याची अपेक्षा नाही.

0 Response to "व्याजदर स्थिरच"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel