-->
आता बांबूपासून इथेनॉल

आता बांबूपासून इथेनॉल

संपादकीय पान शुक्रवार दि. १५ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आता बांबूपासून इथेनॉल
सध्याच्या महागड्या इंधनाला पर्याय शोधण्यास जगात अगोदरच सुरुवात झाली आहे. त्यातील सर्वात महागडे इंधन पडते ते प्रवासासाठी. परंतु त्याला पर्याय कसा शोधणार असा प्रश्‍न होता. पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून सी.एन.जी. तसेच एल.एन.जी. या वायूचा विचार झाला. परंतु या वायूंवर वाहने चालली तरी ते तो पर्याय म्हणून काही पुढे येऊ शकत नाही. कारण त्यावर चालणारी वाहने ही तेवढ्या गतीने चालू शकत नाहीत. त्याचबरोबर या इंधनाच्या वापरामुळे वाहानाचेही नुकसान होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे सध्याच्याच इंधनात म्हणजे डिझेलमध्ये जर इथेनॉल मिसळल्यास डिझेलचा दरही कमी होईल व सध्याचा असलेला हा साठा आपल्याला पर्यायाने जास्त काळ वापरता येईल. त्यादृष्टीने जागतिक पातळीवर डिझेलमध्ये इथेनॉल काही प्रमाणात मिसळण्यास सुरुवात करण्यात आली होती. पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाची परवानगी आहे. मात्र, इथेनॉलच्या कमतरतेमुळे कंपन्या २ टक्केच वापर करतात. १० टक्के मिश्रणासाठी कंपन्यांना दरवर्षी २६० कोटी लिटर इथेनॉल हवे. आपल्या देशात फक्त २५० कोटी लिटर इथेनॉलचेच उत्पादन होते. सध्या आपल्याकडे इथेनॉल बनविण्यावर मर्यादा आहेत. कारण सध्या आपण उसाळ्या मळीपासून प्रामुख्याने इथेनॉल तयार करतो. आता झालेल्या नव्या संशोधनानंतर बांबूपासूनही इथेनॉल तयार करता येते व ते सर्वात जास्त प्रभावी आहे. कारण आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. बांबूंपासून तयार जैविक इंधन म्हणजेच इथेनॉलची लवकरच बाजारात विक्री सुरु केली जाईल. आसामच्या नुमालीगड रिफायनरीमध्ये सध्या या प्रकल्पावर काम सुरू असून फिनलंडच्या केमपोलिस या कंपनीचे तंत्रज्ञान यासाठी वापरण्यात आले आहे. नुमालीगड रिफायनरीने यासाठी केमपोलिसशी एक सामंजस्य करार केला आहे. याच अनुषंगाने फिनिश तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी या रिफायनरीचा एक चमू फिनलंडला रवाना झाला.
नुमालीगड रिफायनरीची निर्मिती भारत पेट्रोलियम, ऑइल इंडिया आणि आसाम सरकारच्या भागीदारीत करण्यात आली आहे. केमपोलिससोबत त्यांचा १ हजार कोटींचा प्रकल्प असून यात दरवर्षी सुमारे ४९ हजार टन इथेनॉलवर प्रक्रिया होईल. नव्या रिफायनरी दोन वर्षांमध्ये तयार होण्याची शक्यता आहे. उसाची मळीच्या बरोबरीने मक्यापासून अनेक वर्षांपासून इथेनॉल तयार केले जात आहे. मात्र, बांबूंपासून प्रथमच बनवले जाईल. फिनिश कंपनीसोबत २०१४ मध्ये करार करण्यात आला होता. मागच्या वर्षी या सरकारी कंपनीने अरुणाचल बांबू रिसोर्स डेव्हलपमेंट एजन्सीसोबत सामंजस्य करार केला होता. या करारानुसार रिफायनरी दरवर्षी तीन लाख टन बांबू खरेदी करणार आहे. नागालँडच्या बांबू विकास संस्थेनेही वार्षिक दोन लाख टन बांबू खरेदीसाठी करार केलेला आहे. आसामच्या कर्बी अंगलोंग आणि दमा हसाओसारख्या भागांत बांबूंचे घनदाट जंगल आहेत. मका उत्पादनात उर्वरकांचा उपयोग होतो. मात्र, बांबूंसाठी नाही. इथेनॉल बनवण्यासाठी विशेष जातीच्या बांबूंचा वापर होतो. शिवाय यास पडीक जमीनही चालते. वर्षांत त्याची तीन पिके घेता येतात. मक्याच्या तुलनेत ८ पट अधिक इथेनॉलनिर्मिती बांबूपासून करता येते. त्यामुळे बांबू लागवडीची मोठी संधी चालून येणार आहे. त्यात कोकण आघाडी घेऊ शकते. त्यामुळे सरकारने यासाठी प्रयत्न करुन शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.
--------------------------------------------------------------

0 Response to "आता बांबूपासून इथेनॉल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel