-->
खड्डे कधी बुजविणार?

खड्डे कधी बुजविणार?

संपादकीय पान मंगळवार दि. ०९ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
खड्डे कधी बुजविणार?
सावित्री नदीच्या दुर्घटनेला आता आठवडा होईल. अजूनही सर्व मृतदेह हाताशी लागलेले नाहीत. सरकारने या घटनेची न्यायालयीन चौकशीची घोषणा केली खरी मात्र या घटनेची चौकशी कालबध्द व्हायला पाहिजे व त्यातील जबाबदार व्यक्तींवर शासन व्हायला पाहिजे. त्याचबरोबर हा पूल वाहतुकीस योग्य आहे असे सांगणार्‍या ऑडिटरवर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. सरकारचा ढीसाळपणा या प्रकरणी वारंवार दिसत आहे. प्रशासन व पालकमंत्री हे दोघेही सुस्त आहेत. या दुदैवी घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आता गणपती येत आहेत. खरे तर गणपतीला आता एक महिनाही शिल्लक राहिलेला नाही. मात्र जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था पाहता हे सरकार सावित्री नदीसारखी एखादी खड्यांच्या संदर्भात दुर्घटना होण्याची वाट पाहते आहे की, काय अशी शंका वाटू लागली आहे. मुंबईतील चाकरमनी गणपतीला दरवर्षी आपल्या कोकणातील गावची वाट धरतो. दरवर्षी प्रमाणे यंदाही त्याला खड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे. कारण सध्याची मुंबई-गोवा महामार्ग असो किंवा कोणत्याही गावातील रस्ता असो सगळेच सध्या खड्यात आहेत. खरे तर रस्त्यावर खड्डे नाहीत तर खड्यात रस्ते गेले आहे असेच म्हणणे संयुक्तीक ठरेल. काही ठिकाणचे खड्डे पाहिले तर या रस्ते बांधणार्‍या कंत्राटदारावर सरकार का कारवाई करत नाही असा प्रश्‍नही पडतो. याचा अर्थ स्पष्ट आहे, कंत्राटदार-नोकरशाही हे हातात हात घालून रस्त्याच्या कामात आपला हात मारीत आहेत. सर्वसामान्य जनतेला ही बाब समजत नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र जनता आपला हिशेब हा पाच वर्षांनी करते, याचे भान राखण्याची आवश्यकता आहे. प्रशासन सध्या आहे की नाही असाच हे खड्डे पाहिल्यावर प्रश्‍न पडतो. याच खड्यातून हे सर्व प्रवास करीत असतात. याच रस्त्यावरुन रायगडच्या जिल्हधिकारी जातात. परंतु असे खड्डे का पडले? त्याला कोण जबाबदार आहे? ही काने केलेल्या कंत्राटदारांना काळ्या यादीत घालण्याचे धाडस हे जिल्हाधिकारी का दाखवित नाहीत, असा सर्वसामान्य जनतेचा प्रश्‍न आहे. पंतप्रधान योजनेतील रस्त्यांचे काम उत्कृष्ट होते. कारण त्यासाठी कडक नियम आहेत. तसेच हे काम करणार्‍या कंत्राटदारास पाच वर्षे रस्ता दुरुस्त करावा लागतो. अशा प्रकारचे कडक नियम का नाही अन्य रस्त्यांच्या बाबतीत लावले जात नाहीत? मुंबई-गोवा महामार्गांच्या बाबतीत तर बोलण्याचीच सोय नाही. एक तर अरुंद रस्ता, त्यात खड्डे त्यामुळे हा महामार्ग म्हणण्याच्या लागकीचा रस्ता राहिलेला नाही. त्यातच गेले काही वर्षे रस्ता चौपदरी करण्याचे गाजर दाखविले जात आहे. मात्र हे प्रत्यक्षात कधी उतरणार हे काही सांगता येत नाही. येत्या दोन वर्षात हा रस्ता पूर्ण करणार असा सरकारने वादा जरुर केला आहे, मात्र त्यादृष्टीने पावले पडताना काही दिसत नाहीत. चौपदरी होईल तेव्हा होईल, मात्र सध्याच्या रस्त्यावरील खड्डे बुजवणे हे पहिले प्रधान्य असले पाहिजे. निदान कोकणातील रस्ते तरी गणपतीच्या अगोदर चांगले केल्यास मुंबईत येणार्‍या लोकांचा प्रवास सुखकारक होईल.

0 Response to "खड्डे कधी बुजविणार?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel