-->
स्वातंत्र्याची कमाई

स्वातंत्र्याची कमाई

संपादकीय पान सोमवार दि. १५ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
स्वातंत्र्याची कमाई
आज देशाचा ६९वा स्वातंत्र्य दिवस. दिडशे वर्षाच्या ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून आपण १५ ऑगस्ट १९४७ रोजी मुक्त झालो. आज मागे वळून पाहत असातना आपण अनेक आघाडीवर चांगली कामगिरी केली आहे असे दिसते. मात्र याहून आपण चांगली कामगिरी करु शकलो असतो याचीही खंत आपल्याला आहेच. पंडित नेहरुंनी स्वातंत्र्यानंतरच्या आपल्या पहिल्या भाषणात देशाला लोकशाही, प्रजासत्ताक, समाजवादी, सर्वधर्मसमभाव जपणारे राष्ट्र म्हणून स्वीकारण्याचे जाहीर केले. गेल्या ६८ वर्षातील आपली सर्वात महत्वाची कमाई म्हणजे आपल्याकडील लोकशाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण मोठ्या दिमाखात आज मिरवीत आहोत, परंतु त्याची पाळेमुळे ही स्वातंत्र्यानंतर रोवली गेली. आपल्या देशात लोकशाही केवळ रुजली नाही तर ती फोफावली आहे. लोकशाहीच्या माध्यमातून या जनतेला सत्ताधार्‍यांना उखून टाकण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे व जनतेने आपला इंगा वेळोवेळी सत्ताधार्‍यांना दाखविलाही आहे. अशा प्रकारे आपल्याकडे रक्तहिन क्रांती घडली आहे. त्याउलट आपल्याच जोडीने स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानात मात्र लोकशाही रुजली नाही. फक्त गेल्या पाच वर्षात तेथे लोकशाही मार्गाने निवडजून आलेल्या सरकारने आपला कालावधी पूर्ण करण्याची पहिल्यांदा घटना घडली. बहुतांशी वेळा लष्कराचेच वर्चस्व राहिले आहे. आपल्या शेजारच्या बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ या देशात लोकशाही फारशी रुजलेली नसताना आपण मात्र लोकशाहीची पाळेमुळे घट्ट केली आहेत. हा आपल्या देशातल्या सर्वसामान्य जनतेचा वैचारिक विजय आहे. स्वातंत्र्यानंतर आपण लोकशाही स्वीकारीत असताना संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. हे देखील पंडित नेहरुंच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे शक्य झाले. कारण त्यावेळी जग हे दोन विभागात म्हणजे भांडवलशाही व समाजवादी यात विभागले गेलेेले होते. भारताने स्वातंत्र्यानंतर आपल्या गोटात सामिल व्हावे असे अमेरिकनधार्जिण्या भांडवशाहीच्या समर्थक देशांना वाटत होते. परंतु त्यावेळी नेहरु हे समाजवादाच्या दिशेने झुकलेले असल्याने त्यांनी यातून सुवर्णमध्ये काढून संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आपले परराष्ट्र धोरण हे कुणाच्याही बाजुला झकलेले नसावे व तिसर्‍या जगाचे आपण नेतृत्व करावे यासाठी म्हणून अलिप्त राष्ट्र संघटनेची चळवळ उभारली. अर्थातच याला त्यावेळच्या सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखालील समाजवादी देशांचा पूर्ण पाठिंबा होता. अशा प्रकारच्या जागतिक वातावरणात आपण आपली स्वातंत्र्यानंतरची वाटचाल सुरु केली. स्वातंत्र्यानंतर आपण पुढील चार दशकात तीन युध्दांना सामोरे गेलो. एक तर आपली अर्थव्यवस्था नुकतीच कुठे उभारी घेत होती त्यात युध्दाच्या झळा अनुभवाव्या लागल्या. त्याचबरोबर पूर, भूकंप यासारखी नैसर्गिक संकटांचा आपण वेळोवेळी मुकाबला करीत आलो. स्वातंत्र्यानंतर ९१ सालानंतर जगाची सर्व सुत्रेच बदलण्यास सुरुवात झाली. सोव्हिएत युनियनसह समाजवादी देशांच्या जगांच्या अर्थव्यवस्था कोसळू लागल्या. सोव्हिएत युनियनची शकले झाली व जगाच्या नकाशावरुन हा देश फुसला गेला. आपल्या अर्थव्यवस्थेत एक प्रकारची शिथीलता आली होती. देशातील एकूणच मरगळ झटकण्याची आवश्यकता होती. सार्वजनिक क्षेत्राच्या प्रबल्यामुळे व स्पर्धेच्या अभावामुळे ही शिथीलता आली होती. त्यामुळे यातून देशाला सावरण्यासाठी आपण आपली अर्थव्यवस्था खुली करण्यास सुरुवात केली. हळूहळू आपण बाजारपेठीय अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करु लागलो. समाजवादी जग विखुरले गेल्यामुळे आपल्याला अमेरिकेशी दोस्ती वाढविणे हाच एकमेव पर्याय होता. आपण आपली अर्थव्यवस्था खुली केल्यामुळे आपला विकास झपाट्याने होतो आहे असे दिसू लागले. मात्र आता दोन दशकानंतर आपण विकास जरुर केल्याचे दिसते. मात्र हा विकास असमतोल पध्दतीने झाला आहे. देशातील दारिद्य निश्‍चितच कमी झाले, परंतु अजूनही देशात गरीबी आहे. श्रीमंत ज्या गतीने आणखी श्रीमंत झाले त्यातुलनेत गरीबांना त्यांच्या उत्पन्न गटातून झपाट्याने वर काढणे आपल्याला काही शक्य झाले नाही. त्यामुळे विकासाची फळे ही ठराविक वर्ग चाखत असल्याचे दिसते आहे. देशापुढे आता सात दशकांच्या स्वातंत्र्यानंतर हेच मोठे आव्हान शिल्लक आहे. आपल्याकडे अजूनही देशातील ४० टक्के जनतेला एक वेळचे खाणे मिळत नाही एवढी गरीबी आपल्याकडे आहे. आपण शिक्षणात प्रगती चांगली केली असली तरीही अजूनही मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहातात. त्यामागचे सर्वात महत्वाचे कारण हे आर्थिकच आहे. यात मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. दुसरीकडे शहरात शिक्षणाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. आपण आपली लोकसंख्या १०० कोटी पार केली असून आपल्याला एक किंवा दोन मुलांचा प्रत्येक कुटुंंबाला पर्याय स्वीकारावा लागणार आहे. यासाठी सक्ती नको तर प्रबोधनातून आपण लोकसंख्या नियंत्रणात ठेवू शकतो. एकेकाळी आपल्याला अन्नधान्य आयात करावे लागत असे आता आपण आपल्या जनतेला पुरेल एवढ्या धान्याचे उत्पादन तर करतोच शिवाय निर्यातही करतो. आरोग्यबाबतीत आपल्याला बरीच मोठी मजल मारावयाची आहे. मात्र पोलियो, प्लेगसारखे रोग आपण देशातून हद्दपार केले आहेत. अशा प्रकारे गेल्या सात दशकात आपण मोठी कमाई केली असली तरीही आपल्याला भविष्यात फार मोठी मजल मारावयाची आहे. यातील पहिले उद्दिष्ट हे गरीबी संपविण्याचे असेल. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे कॉँग्रेस सत्तेत आली व आजवर विचार करता सर्वाधिक काळ कॉँग्रेसच सत्तेत राहिली. देशात सर्वात प्रथम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उजव्या विचारसारणीचे सरकार सत्तेत आले. अर्थात त्यांनी देशातील सध्याची सर्वधर्मसमभावाची चौकट विस्कळीत करण्याचा जरुर प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना अजूनतरी यश आलेले नाही. भविष्यातही त्यांना देशाची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना बदलून हिंदुत्ववाद्यांचे राजकारण पुढे रेटता येणार नाही, याचा आम्हाला विश्‍वास वाटतो.
-------------------------------------------------------------

0 Response to "स्वातंत्र्याची कमाई"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel