-->
बालमृत्यू, कुपोषण कधी संपणार?

बालमृत्यू, कुपोषण कधी संपणार?

संपादकीय पान शुक्रवार दि. २२ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
बालमृत्यू, कुपोषण कधी संपणार? 
मुख्यमंत्री ज्या विदर्भातून आलेले आहेत त्या विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्या जशा वाढल्या आहेत तसेच बालमृत्यू, कुपोषण याचे प्रमाणही वाढले आहे. याला सर्वस्वी जबाबदार सरकार व सरकारी अधिकारी आहेत. शेवटी त्याची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षावर येतेच. शासकीय पातळीवरील उदासीनता, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी न होणे आणि आरोग्यसेवेचा लाभ गरजवंत स्थानिक जनतेपर्यंत न पोचणे यामुळे विदर्भात बालमृत्यू, कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. मेळघाटात एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत ११९ बालमृत्यू झाले. यवतमाळात एकट्या जून महिन्यात ३३ बालमृत्यूंची नोंद झाली. एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या गेल्या वर्षभरात यवतमाळ जिल्ह्यात हा आकडा १३९ एवढा होता. विदर्भाच्या टोकाला असलेल्या उमरखेड तालुक्यात सर्वाधिक १७ मृत्यू झाले आहेत, तर दुसर्‍या स्थानावर  असलेल्या यवतमाळ तालुक्यातील आकडा १६ आहे. वणी, महागाव, पांढरकवडा, नेर या तालुक्यांतही बळींची संख्या दोनआकडी आहे. जूनमधील ३३ मृत्यूमध्ये तर एकट्या पांढरकवडा तालुक्यातील १४ बालकांचा समावेश आहे. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातही तीव्र कमी वजन असलेली ४०५ बालके आहेत. ती सारीच कुपोषित श्रेणीत मोडणारी आहेत. त्यात भंडारा तालुक्यात सर्वाधिक ९० बालके आहेत. त्यापाठोपाठ लाखांदूर ८०, पवनी ७१, लाखनी ५५, मोहाडी ३९, तुमसर ३९, साकोली ३१ अशी कुपोषित बालकांची संख्या आहे. यवतमाळ जिल्ह्यात तर गेल्या वर्षभरात ३९ मातामृत्यूंची नोंद झाली आहे. त्यातील २८ मातांचा मृत्यू सरकारी रुग्णालयात झाला आहे. ही सर्व परिस्थिती पाहता शासकीय आरोग्य यंत्रणा किती निष्काळीपणाने काम करते व कोणत्याही योजनेचा गरजवंताला फायदा होत नाही हेच दिसते. अनेक रुग्णालयात किंवा आरोग्य केंद्रात डॉक्टरच नसतात. प्रामुख्याने बालमृत्यू व कुपोषणग्रस्त भाग असलेल्या ठिकाणी तरी डॉक्टरांची प्राधान्यतेने नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे. अनेक रुग्णालयात बालरोगतज्ज्ञच नाही. पद आहे पण डॉक्टरच नाही. एक्स- रे मशीन आहे, मात्र तंत्रज्ञाचा पत्ता नाही. त्यामुळे मशीन बंद स्थितीत धूळ खात पडून आहे. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकार्‍यांच्या व अन्य कर्मचार्‍यांच्या जागा गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. अशा सर्व सरकारी लाल फितीच्या कारभारामुळे बालमृत्यू व कुपोषणाचे प्रमाण वाढत चालले आहे. आपल्याकेड शेतकर्‍यांच्या आत्महत्येची जोरात चर्चा होते मात्र याबाबत फारशी चर्चा होत नाही. कुपोषणासारखी भावी पिढी आपल्याकडे निर्माण झाल्यास आपल्या देशाचे भवितव्य शून्य आहे. आरोग्यासारखी मूलभूत सेवा अशा प्रकारे बेभरवशावर सुर आहे. याची सरकार दखल घेणार किंवा नाही असा सवाल आहे.
-----------------------------------------------

Related Posts

0 Response to "बालमृत्यू, कुपोषण कधी संपणार? "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel