-->
नारायाणअस्त्र सक्रिय

नारायाणअस्त्र सक्रिय

संपादकीय पान शुक्रवार दि. २२ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
नारायाणअस्त्र सक्रिय
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विधीमंडळाच्या प्रवेशाचा पहिला दिवस त्यांनी गाजविला. आपल्या आक्रमक शैलीत व चिमटे काढीत सत्ताधार्‍यांची काही काळ बोलती बंद केली. अर्थात नारायणरावांचा जवळपास पावणे दोन वर्षे विधीमंडळात असलेला विजनवास त्यांचा विधानपरिषदेत प्रवेश झाल्याने थांबला. राणे विरोधात असो किंवा सत्ताधारी बाकांवर त्यांचा आक्रमकपण कायम राहिला आहे. त्यांच्याकडे अनेक खात्यातील माहितीची मोठी जंत्री असते. आजवर अनेकदा त्यांनी विधानसभेत काम करताना ही जंत्री उघडून अनेकांना घायाळ केले आहे. आता त्यांचा विधानपरिषदेतील पहिला दिवस त्यांनी गाजविला. विधानपरिषद हे ज्येष्ठांचे सभागृह. तेथे अनेक दिग्गज अभ्यास करुन मैदानात चर्चेसाठी उतरतात. विधानसभेतील कामकाज व परिषदेतील कामकाज यात काहीसा फरक आहे. तेथे पुरावे नसताना आरोप करण्याचा मोह अनेक जण टाळतात. कारण या सभागृहाची जी संस्कृती आहे ती पाहता येते केवळ बेछूट भाषणे करण्यापेक्षा अभ्यासपूर्ण भाषणे करण्यावर भर दिला जातो. नारायण राणेंनी या ज्येष्ठांच्या सभागृहात बोलण्याचे अनेक संकेत धुडकावून लावले. अर्थात त्यांच्या स्वभावाला साजेसे ते बोलले. मात्र त्यामुळे सरकारला प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांना त्याची दखल घ्यावी लागली. अर्थात नारायण राणेंनी जे आरोप, मग सरकारच्या सागंण्यानुसार ते बेछूट होते त्याला काही उत्तरे दिली नाहीत. यातच नारायण राणेंचे यश आहे असे म्हणावे लागेल. यातील सर्वात मोठा गंभीर आरोप होता तो म्हणजे एका मंत्र्यांने सचिवालात एका महिला अधिकार्‍याचा केलेला विनयभंग. खरे तर मुख्यमंत्र्यांनी या आरोपाची दखल घेऊन तातडीने चौकशीचे आदेश दिले पाहिजे होते. मात्र तसे झाले नाही, हे दुदैवी आहे. या चौकशीतून काय निष्पन्न होते, त्यावर राणे खरे की खोटे हे ठरु शकले असते. त्याचबरोबर त्यांनी ताजमहाल हॉटेलमधून दहा कोटी रुपये कोणाकडे गेले? राकेश मारिया यांच्याकडे राणेंचा अंगुलीनिर्देश होता. यासंबंधीही मुख्यमंत्र्यांनी मौन पाळले. त्यामुळे या मौनात बर्‍याच बाबी अडकल्या आहेत, असे म्हणायला जागा आहे. मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना राणेंनी यापूर्वी सोनिया गांधींपासून, अहमद पटेल, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख या सर्व नेत्यावर केलेल्या आरोपाची आठवण करुन दिली. मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, राणेंनी त्यावेळी आपल्याच नेत्यांवर केलेले आरोप हे कोणी नाकारत नाही. मात्र त्यानंतरही त्यांना कॉँग्रेस पक्षाने सन्मानाने पक्षात घेतले व मंत्रिमंडळात दोन क्रमांकाचे खाते दिले. सहसा असे कॉँग्रेसमध्ये होत नाही. कॉँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करतो त्याला पक्षात स्थान दिले जात नाही, असा आजवरचा इतिहास आहे. मात्र कॉँग्रेसने राणेंना यातून सूट दिली, हे देखील विसरता कामा नये. आता राणेंवर हक्कभंग दाखल करु असा इशारा भाजपाने दिला आहे. अर्थात राणेंनी केलेले आरोप हे आरोपच राहाणार आहेत. राणेंनी केलेल्या आरोपाची चौकशी करण्याचे धारिष्ट्य मुख्यमंत्री दाखवतील का, हा खरा सवाल आहे.

Related Posts

0 Response to "नारायाणअस्त्र सक्रिय"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel