-->
महागाईचा तडका

महागाईचा तडका

संपादकीय पान शुक्रवार दि. १६ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
महागाईचा तडका
दुष्काळाच्या झळा सोसल्यावर आता चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे यंदा भाज्या स्वस्त होतील अशी सर्वसामान्य ग्राहकांची आशा अपेक्षा काही अजून पूर्ण झालेली नाही. कारण सध्या अनेक बाजारपेठांमध्ये भाज्यांचे दर आपला नवनीन विक्रम स्थापन करीत आहेत. व्यापारी, अडते यांच्या आंदोलनामुळे ही महागाई होती अशी चर्चा सुरु आहे. परंतु यात काही तथ्य नाही. कारण आता भाज्या विकताना व्यापारी व अडते यांना कात्री लावण्यात आली आहे, त्यामुळे जर थेट माल विकला जात आहे तर तो महाग होण्याची शक्यताच नाही. काही ठिकाणी अती पावसामुळे थोड्याफार प्रमाणात भाज्यांचे नुकसान झालेले आहे, हे आपण एकवेळ मान्य करु. परंतु त्यामुळे सरसकट सर्वच भाज्या महाग होणे कुणालाही परवडणारे नाही. पंजाबात आणि हरियानात पहिल्या पावसानंतर आवक घटल्यामुळे सिमला मिरची, हिरव्या मिरच्या, टोमॅटो यांचे किलोमागे ७०च्या घरात जाऊन पोचले होते. अनेक भाज्या थेट दुपटीहून जास्त महाग होणे म्हणजे यात काही तरी नक्कीच काळेबेरे आहे असे म्हटले पाहिजे. दोन वर्षापूर्वी भाजपाचे सरकार सत्तेत आल्यावर डाळींचे दर ८० रुपयावरुन थेट २००च्या घरात पोहोचले होते. हे भाव नेमके कशामुळे वाढले याविषयी कोणच बोलत नाही. आता हे भाव १०० रुपयांच्यावर स्थिरावले आहेत. म्हणजे हाच दर आता सर्वांच्या अंगवळणी पडला आहे. दरवेळी सरकार म्हणत होते की, आयात आल्यावर हे दर कमी होतील. परंतु आयात झाली तरीही हे दर काही ना काही कारणाने चढतेच राहिले. आता भाज्यांचे तसे होणार नाही ना अशी भीती ग्राहकांच्या मनात आहे. सरकारने प्रामुख्याने नरेंद्र मोदींनी अच्छे दिन येण्याची ग्वाही सर्वांना दिली होती. आता हे अच्छे दिन गेले कुठे असे म्हमण्याची पाळी आली आहे. कारण जीवनावश्यक सर्व बाबी महाग झाल्या आहेत, परिणामी सर्वसामान्यांचे जीवन कठीण झाले आहे. सरकारमध्ये कुणी विदेशात जातोय तर कुणी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळतोय, अशा स्थितीत सरकारकडे जनतेच्या प्रश्‍नाकडे लक्ष आहे कुठे? कॉँग्रेसपेक्षा आम्ही वेगळे असू असे सांगणारे भाजपाचे नेते हे कॉँग्रेसहून वेगळे कसे, असा सवाल आहे. सरकारने कोणताही पर्यायाचा अभ्यास व विचार न करता कृषी उत्पन्न बाजार समित्या एका झटक्यात संपुष्टात आणल्या. परंतु शेतकरी आपल्याकडील माल कुठे विकणार या प्रश्‍नाचे उत्तर सरकारला लवकरच द्यावे लागणार आहे. व्यापार्‍यांच्या संपामुळे भाज्यांचे दर वाढले असे जर सरकारचे मत असेल तर अडते व व्यापारी हे संपुष्टात आल्यावर कायमच भाज्या महाग राहाणार की काय असा सवाल आहे. एकूणच सरकारचे धोरण पाहता महागाईचा तडका काही कमी होणारा नाही असेच दिसते.
-----------------------------------------------------------

0 Response to "महागाईचा तडका"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel