-->
चौकशी आवश्यकच / आर्थिक विषमता वाढतेय

चौकशी आवश्यकच / आर्थिक विषमता वाढतेय

बुधवार दि. 23 जानेवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
चौकशी आवश्यकच
देशात वापरल्या जाणार्‍या मतदान (ईव्हीएम) यंत्राच्या संदर्भात दररोज नवनवीन शंका उपस्थित होत आहेत. आता अमेरिकास्थित सायबर तज्ज्ञ सय्यद शुजा याने केलेल्या आरोपामुळे या शंकांना बळकटी मिळत आहे. मात्र यासंबंधी झालेल्या सर्व आरोपांचे निराकरण होण्याची आवश्यकता आहे. निवडणूक आयोगाने या आरोपांचे खंडन तातडीने केले असले तरी याने समाधान होणार नाही. त्यासाठी परिपूर्ण चौकशी करण्याची गरज आहे. परंतु ही चौकशी करण्याचे दारिष्ट्य सध्याचे सरकार दाखविल का, हा सवाल आहे. ईव्हीएम हॅक होऊ शकते. गेली 2014 मधील लोकसभा निवडणूक ईव्हीएमममध्ये फेरफार करून जिंकण्यात आली होती. इतकेच नव्हे तर भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना या गैरव्यवहाराची कल्पना होती, म्हणून त्यांची हत्या झाली, असा खबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर तज्ज्ञाने केल्याने अनेक शंका उपस्थित होतात. शुजाने स्काइपद्वारे लंडन येथे पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. या पत्रकार परिषदेला देशातील सर्वच पक्षांना बोलाविण्यात आले होते, मात्र काँग्रेसचे नेते कपिल सिब्बलच केवळ उपस्थित होते. त्यामुळे या आरोपांना एक नवाच रंग मिळाला आहे. पत्रकार परिषदेवेळी शुजा तोंडावर फडके बांधूनच अमेरिकेत बसला होता आणि ही पत्रकारपरिषद लंडनमध्ये घेण्यात आली. इंडियन जर्नलिस्ट्स असोसिएशनने (युरोप) ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. माझ्या सहकार्‍यांवर हल्ले झाले होते. काही सहकार्‍यांचे खून झाल्यानंतर घाबरून जाऊन मी 2014 मध्ये परदेशात पळून गेलो, असा दावा शुजाने केला. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॅक करण्यासाठी रिलायन्स जिओने भाजपला कमी तरंगलांबीचे सिग्नल पुरवले. जर ही यंत्रे हॅक केली जातात तर कॉँग्रेसने नुकत्याच झालेल्या तीन राज्यांच्या निवडणुका कशा जिंकल्या असा प्रश्‍न उपस्थित होतो. मात्र, भाजपचे प्रयत्न आमच्या टीममने हाणून पाडले नसते तर राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूकही भाजपने जिंकली असती, असा दावाही शुजा याने केला. फक्त भाजपच नाही तर इतर पक्षांनाही ईव्हीएम गैरव्यवहार कसा करतात हे ठाऊक आहे. दिल्लीतील 2015 मधल्या निवडणुकीतही घोळ होणार होता, परंतु वेळीच दुर्घटना रोखली आणि आम आदमी पक्षाने 70 पैकी 67 जागा जिंकल्या अन्यथा भाजपने निवडणूक जिंकली असती. ईव्हीएमचा आराखडा तयार केलेल्या इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (ईसीआय) संघात आपण होतो, असा शुजाचा दावा आहे. मतदान यंत्रे हॅक कशी करता येतील हे दाखवू शकतो, असा दावाही शुजाने केला आहे. मतदान यंत्र कसे हॅक केले जाऊ शकते, याचे प्रात्यक्षिक बघण्यासाठी निवडणूक आयोग, तसेच इतर राजकीय पक्षांनाही बोलावण्यात आले होते. मात्र कपिल सिब्बल वगळता इतर कोणीही या कार्यक्रमाला आले नाही. शुजाने केलेल्या या आरोपात कितपत तथ्य आहे ते तपासण्याची हीच योग्य वेळ असून त्यासंबंधी सरकारने चौकशीचे आदेश देण्याची गरज आहे.
आर्थिक विषमता वाढतेय
आपल्याकडे गरीब व श्रीमंतांतील आर्थिक विषमतेची दरी वाढत चालली असून ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. गेल्या वर्षभरात देशभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत दरदिवशी तब्बल 2200 कोटींची भर पडली आहे. आपल्याकडे 10 टक्के श्रीमंतांकडे देशातील एकूण संपत्तीच्या 77.4 टक्के संपत्ती आहे. तर, दुसरीकडे एक टक्के श्रीमंतांच्या संपत्तीत 39 टक्क्यांची वाढ झाली आहे. 50 टक्के गरिबांच्या संपत्तीत केवळ तीन टक्क्यांची वाढ झाली. चिंताजनक बाब म्हणजे भारतातील 13.6 कोटी लोक 2004 पासून कर्जदार आहेत आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीत विशेष बदल झालेला नाही. एकंदरीत श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखी गरीब ही स्थिती देशात तयार झाली आहे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्सॅम या संस्थेने हा अहवाल प्रसिध्द केला आहे. या अहवालातून भारतातील गरीब आणि श्रीमंतांमधील दरी मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचे स्पष्ट झाले आहे. जागतिक पातळीचा विचार करता, मागील वर्षात अब्जाधीशांच्या संपत्तीत 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गरिबांच्या संपत्तीत 11 टक्क्यांनी घट झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांची संपत्ती सध्या 112 अब्ज डॉलर्स असून इथिओपिया या देशाशी तुलना करता त्यांच्या संपत्तीच्या फक्त एक टक्का म्हणजे संपूर्ण इथिओपियाचे आरोग्य बजेट आहे. भारताचा विचार करता, एकूण अब्जाधीशांची संख्या 119 वर पोचली असून त्यांच्याकडे एकूण 28 लाख कोटींची संपत्ती आहे. तर, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींची संपत्ती 2.8 लाख कोटी इतकी आहे. जी भारत सरकारच्या वैद्यकीय, सार्वजनिक स्वास्थ्य, स्वच्छता आणि पाणी पुरवठा या विभागांच्या केंद्र तसेच राज्यांच्या बजेटपेक्षा देखील जास्त आहे. भारतातील ही वाढती विषमता चिंतादायक असून त्यावर सरकार कोणते उपाय योजते हे पहावे लागेल. कारण ही वाढती विषमता देशाच्या आर्थिक व सामाजिक आरोग्यास योग्य नाही.
---------------------------------------------------------

0 Response to "चौकशी आवश्यकच / आर्थिक विषमता वाढतेय"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel