-->
कॉँग्रेसचा हुकमी एक्का!

कॉँग्रेसचा हुकमी एक्का!

गुरुवार दि. 24 जानेवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
कॉँग्रेसचा हुकमी एक्का!
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेस पक्षाने आपला हुकमी एक्का म्हणजे प्रियांका गांधी राजकारणात आणल्या आहेत. आता कॉँग्रेस विरोधक प्रामुख्याने भाजपा त्यावर घराणेशाहीचा आरोप करतील. परंतु त्या आरोपात काहीच अर्थ नाही. कारण प्रियांका या गांधी घराण्यातील असल्या तरी त्या रितसर निवडणूक लढविणार आहेत व लोक त्यांना आपल्या प्रतिनिधी म्हणून निवडून देतील. ही घराणेशाही म्हटली असती तर प्रियांका गांधी यांना निवडणूक लढविण्याची आवश्यकता नव्हती. त्या काही थेट संसदेत जाणार नाहीत, त्यामुळे त्या लोकशाही मार्गाने संसदेचे दार ठोठावतील. कॉँग्रेस पक्ष आज नव्हे तर स्वातंत्र्यानंतरची गेली किमान पाच दशके गांधी घराण्याच्या सावलीखाली वावरत आहे, वाढत आहे, काही अपवादात्मक परिस्थितीत त्याची घसरणही झाली आहे. गांधी घराण्याचा कॉँग्रेसजनांना अभिमानच वाटत आला आहे. पक्षात कितीही गोंधळ, भांडणे असली तरी केंद्रीय नेतृत्वपदी गांधी घराण्याची व्यक्ती असली की या पक्षाला नेहमीच सुरक्षितता वाटत आली आहे. अर्थात कोणत्याही पक्षाकडे अशा प्रकारचे खमके नेतृत्व लागते. आज भाजपामध्ये देखील नरेंद्र मोदी यांचे एकाधीकारशाहीचे नेतृत्व आहे. याची लाज भाजपा नेत्यांना वाटत नाही. मग कॉँग्रेसजनांनी निविर्वादपणाने गांधी घराण्याचे नेतृत्व स्वीकारले आहे, हे वास्तव आहे. जनतेने देखील त्यांच्या या नेतृत्वाला दाद दिली आहे. जेव्हा या नेतृत्वाने जनता विरोधी कामे केली त्यावेळी इंदिरा गांंधींसारख्या नेत्यांनाही लोकसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. अशी ही आपली लोकशाही जरी व्यक्ती केंद्रीत असली तरीही वास्तववादी आहे. 2004-2014 अशी दहा वर्षे सत्तेत राहिल्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची पूर्णपणे वाताहत झाली. कधी नव्हे एवढ्या कमी जागा म्हणजे पन्नासच्या आतच खासदार निवडून आले. यानंतर काँग्रेस पुन्हा उभारी घेईल की नाही असे प्रश्‍न उपस्थित झाले. भाजपाच्या नेत्यांनी तर कॉँग्रेस संपविण्याची घोषणा केली. सव्वा वर्षापूर्वी सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद सोडून राहुल गांधी यांच्यावर जबाबदारी सोपविली. राहुल गांधी यापूर्वी उपाध्यक्षपद संभाळत असले तरी त्यांच्याकडे पक्षाची पूर्णपणे जबाबदारी नव्हती. नेतृत्व स्वीकारल्यानंतर राहुल गांधींनी गुजरातमध्ये भाजपला जोरदार लढत दिली. खरे तर तेथे कॉँग्रेसचीच सत्ता यायची, परंतु भाजपाचा निसटता विजय झाला. कर्नाटकात जमता दलाच्या साथीने सरकार स्थापन केले आणि त्यानंतर तर मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या हिंदी पट्ट्यात काँग्रेसचा झेंडा रोवला. राहुल गांधींनी यंग ब्रिगेड तयार करण्याची सुरवात केली. मात्र त्याचबरोबरीने ज्येष्ठांनाही सन्मान दिला, त्यांना पूर्णपणे डावलले नाही. यात राहूल गांधींची खरी कसोटी लागली. या यंग ब्रिगेडमध्ये राजीव सातव यांच्याकडे गुजरात, सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधिया या सारख्या युवा नेत्यांकडे राजस्थान, मध्य प्रदेशची जबाबदारी होती. आता याच रांगेत राहुल गांधी यांची बहिण प्रियंका गांधी यांचे नाव आले. त्यांच्यावर उत्तरप्रदेशातील पूर्वेकडील भागाचे प्रभारीपद देण्यात आले आहे. तसेच अशीही चर्चा आहे की, प्रियांका गांधी या वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवतील. तसे झाले तर या लढतीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागेल. सध्या दिल्लीत आणखी एक गॉसिप रंगत आहे व ते म्हणजे, राहूल यांचे चुलत भाऊ वरुण गांधी कॉँग्रसमध्ये प्रवेश करणार असून उत्तरप्रदेशातून कॉँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवतील. त्यांच्याबरोबरीने भाजपाचे दीड डझन खासदार कॉँग्रेसमध्ये येतील. हे जर झालेच तर देशातील सर्वच राजकीय समिकरणे बदलतील. उत्तर प्रदेशमधील विजयाची गणिते देशाची गणिते ठरविते, असे म्हणतात ते काही चुकीचे नाही. 2014 मध्ये भाजपने उत्तरप्रदेशात एक हाती जागा जिंकून देशभरात कमळ फुलविले होते. आता याच उत्तर प्रदेशने काँग्रेसने आपला हुकुमी एक्का उतरवत भाजपसह समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष यांना खुले आव्हान दिले आहे. सप आणि बसपने आघाडी करत काँग्रेसला दूर ठेवले होते. खरे तर त्यांनी कॉँग्रेसला सोबत घेणे गरजेचे होते, परंतु भाजपाला लाभ करण्याच्या हेतून ही जोडी एकत्र आली आहे. याला उत्तर म्हणून काँग्रेसने प्रियंका गांधींना सरचिटणीस पद देऊन पूर्व उत्तर प्रदेशचे प्रभारी केले आहे. गेल्या दोन तपाहून जास्त काळ कॉँग्रेसची उत्तरप्रदेशात सत्ता नाही. एकेकाळी बालेकिल्ला असणार्‍या या राज्यात कॉँग्रेस आता अतिशय दुबळी झाली आहे. अशा स्थितीत कॉँग्रेसचे पूर्णपणे पुनरुजीवन करण्याचे आव्हान प्रियंका गांधी यांच्याकडे असेल. प्रियांका गांधींमध्ये जागतिक नेत्या इंदिरा गांधींना पाहणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांना उत्तर प्रदेशात लढण्यासाठी नवे बळ मिळेल, यात काहीच शंका नाही. उत्तरप्रदेशात कॉँग्रेसवगळून सपा-बसपा युती घडवून आणून सेक्युलर मतांची फोडाफोड करणार्‍या भाजपाच्या स्वप्नांना यातून तिलांजली मिळेल का, हा देखील सवाल आहे. या सर्व हालचाली पाहता कॉँग्रेस यावेळी भाजपाला सत्ताभ्रष्ट करण्यासाठी पूर्णपणे ताकदीने उतरणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यासाठीच त्यांनी आपला हुकमी एक्का राजकारणात उतरविला आहे.
------------------------------------------------------

0 Response to "कॉँग्रेसचा हुकमी एक्का!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel